26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*◆शोकांतिका राजकीय भीष्माचाऱ्याची◆*

*◆शोकांतिका राजकीय भीष्माचाऱ्याची◆*

●चर्चा तर होणारच●


■ आता उरलो मनपा निवडणुकीपुरता ■
★ राजेंद्र शहापूरकर ★

औरंगाबाद, : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या महाराष्ट्रीय नेत्याच्या बोटाला धरून राजकारणाचे धडे गिरवले त्या आपल्या ‘जाणत्या राजांनी’ , शरद पवार यांनी आता देशाच्या , राज्याच्या राजकारणापासून फारकत घेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणात स्वतः ला गाडून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आदरणीय शरद पवार मुंबई मनपा निवडणुकीसाठी सक्रिय’ झाल्याची बातमी त्यांच्या ‘मुखपत्रा’तच आज आली असल्याने आता याबाबत कुणी संशय घेऊ शकणार नाही. तसे कारणही संभवत नाही.
शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल , विशेषतः ‘शरदनीती’ विषयी वाद असू शकतो परंतु सलग ५० -५५ वर्षे राजकारणात पाय रोवून उभे असणे कुणा ऎऱ्या-गैऱ्याचे काम नाही हे तेवढेच खरे आहे. देशपातळीवर आज शरद पवार यांच्या इतका अनुभवी राजकारणी दुसरा नाही , यातच त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान अधोरेखीत होते. ‘देशाला नलाभलेला पंतप्रधान’ असे त्यांचे वर्णन ख्यातनाम उद्योगपती राहुल बजाज यांनी केले होते ते उगाच नाही. राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री , विविध महत्वाच्या विभागाचे केंद्रीय मंत्री, राज्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड असणारा नेता , छत्री असताना ती बाजूला सारून पावसात चिंब भिजत जाहीर सभा घेणारा आणि त्यायोगे विधानसभा निवडणुकीत हरलेली बाजी जिंकून आणणारा योद्धा , शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला ‘सिल्व्हर ओक’ वर आणून मुख्यमंत्रीपदाचे पारितोषिक देताना काँग्रेसला काखेत घेत राजकीय चमत्कार करणारा हा जादूगार मुंबई मनपाच्या राजकारणात उतरून वयाच्या ८२ व्या वर्षी स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यास तयार होत असतील तर ही त्यांची अगतिकता मानावी काय असा प्रश्न निर्माण होतो.खरे तर कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याची राजकीय वाटचाल गल्ली , गाव,जिल्हा,विभाग, राज्य आणि देशपातळीवरील राजकारण अशीच असते. अर्थात याला ‘दरबारी’ राजकारणी आणि वारसाहक्काने राजकारणात पडलेली मंडळी अपवाद आहेत. शरद पवारांचे राजकारणही असेच बारामती म्हणजे गाव पातळीवरून होऊन राज्य आणि देशपातळीवर बहरत गेले. अशी समृद्ध राजकीय वाटचाल असलेल्या पवार साहेबांनी राजकारणासाठी आज निवडलेली ही वाट , वहिवाट निश्चितच मानता येणार नाही.


देशाच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत हिरीरीने भाग घेणारे , (कुणाला पटो किंवा ना पटो ) राज्याच्या राजकारणात भाजपच्या घोडदौडीला रोखणारे शरद पवार यांचा उफराटा राजकीय प्रवास राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांसाठी अस्वस्थ करणारा आहे , म्हणून हा प्रपंच !

लेखन : राजेंद्र शहापूरकर

जेष्ठ पत्रकार , औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]