वडवळ नागनाथ,झरी परिसरातील सतरा गावे पंधरा तासांपासून अंधारात / अभियंता आणी कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जीच
वडवळ नागनाथ,दि.१४ (प्रतिनिधी.) : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरामध्ये सोमवारी रिमझिम पावसाने विद्युत वाहिनी मध्ये किरकोळ तांत्रीक बिघाड झाला. हा बिघाड महावितरण कर्मचारी दुरुस्त करु शकत असतानाही गुत्तेदार नंतर इलेक्ट्रिक किट ची वारंटी देणार नाही यामुळे विद्युत वाहिनी नादुरुस्तच ठेवली परिणामी वडवळ नागनाथ, झरी या दोन उपकेंद्रासह सतरा गावे पंधरा तासांपासून अंधारात आहेत. मागील पंधरा दिवसांत दुसर्यांदा ही घटना घडली आहे. यामुळे महावितरण अधिकारी आणि कर्मचारी विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
परिसरात पावसाने झालेल्या किरकोळ बिघाडाकडे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षच झाल्यामुळे वडवळ नागनाथसह परिसरातील, जानवळ,वाघोली, सेवापूर तांडा, ब्रम्हवाडी, शंकरनगर तांडा, झरी खुर्द, झरी बु., फतुनाईक तांडा, रायवाडी, राजेवाडी, रामवाडी, केंद्रेवाडी, महाळंगी, बेलगाव, जढाळा, देवनगर तांडा आदी सतरा गावातील वीजपुरवठा किरकोळ बिघाडामुळे बंदच आहे. यामुळे महावितरण विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसेंदिवस उकाडा अधिक वाढत आहे. अशा वेळी फॅन, कुलर या उपकरणासाठी विजेची नितांत गरज असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सतत विजेचा लपंडाव सुरूच असल्याने ग्राहक आता वैतागले आहेत.
वडवळ नागनाथ येथील महावितरणच्या शाखा कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून मनमानी कारभार सुरू आहे. तसेच अभियंता किंवा एकही कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. मुख्यालयाची जणू कर्मचार्यांना अॅलर्जीच झाली आहे. मुख्यालयी राहत नसल्यामुळेच झालेल्या बिघाडाकडे कोणीही लक्ष देत नाहीत. यात मात्र ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. पून्हा एकदा शिस्त लावण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील ग्रामस्थांतून बोलले जात आहे.