चांगुलपणाचे सर्व्हिस सेंटर…प्रमोद आदनाक
काही लोक भेटल्यावर खूप छान वाटते. का ? कशामुळे ? या प्रश्नांचे उत्तर मिळणे अवघडच असते. ते नित्य सहवासात नसतात पण त्यांच्या नुसत्या आठवणीने मेंदूत चांगुलपणाचे तरंग उमटू लागतात. असे लोक आपल्या आयुष्याची खूप मोठी ठेव असते. काही लोकांच्या बाबतीतर असा अनुभव केवळ एकट्या-दुकट्याला येत नाही तर त्या व्यक्तीच्या सहवासातील प्रत्येकाला पदोपदी जाणवतो. असे लोक हे फक्त गावालाच नव्हे तर अख्ख्या देशाला वेगळे अधिष्ठान प्राप्त करून देतात. बाळू उर्फ प्रमोद आदनाक हे असेच एक लोभस व्यक्तिमत्व.
मी लहानपणी गोटे गुरुजींच्या लिटील फ्लॉवर स्कूल मध्ये पहिलीच्या वर्गात शिकत होतो. त्या शाळेतील केवळ दोनच व्यक्ती आजही माझ्या स्मृती पटलावर साम्राज्य गाजवतात. प्रचंड शिस्तीचे गोटे गुरुजी आणि खूप प्रेमळ असा प्रमोद आदनाक. काळ्या मारुतीच्या पुढील गल्लीत गेले की बाळूचे घर लागे. त्या नंतर १२ वर्षानंतर बाळूचा सहवास लाभला तो मी औरंगाबादला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेल्यावर. बाळू माझ्या पेक्षा एक वर्षाने मोठा. त्याचा मित्र अमोल कुलकर्णी माझा चांगला मित्र. बाळूचे आमच्या हॉस्टेलला येणे सुरु झाले. तशी आमची मैत्री बाळसे धरू लागली. बाळू म्हणजे यारोंका यार. आजही त्याला प्रमोद म्हणणे अवघडच जाते.
महाविद्यालयतील शिक्षण इलेक्ट्रोनिक्स मध्ये घेवून पुण्यातील फिनोलेक्स कंपनीमध्ये प्रमोद काम करू लागला. कामाचे स्वरूप खूप मेहनतीचे होते. सोबत फक्त चार कामगार. त्यांना १० माणसांचे काम करावे लागे. साहेबी थाट दाखून काम करून घेणे अशक्यच होते. प्रमोदने आपल्या मुळातील स्वभावातील प्रेमाचे वंगण सर्वांच्यात ओतले. तो स्वतः शॉपफ्लोवरवर कामगारांच्या बरोबर त्यांच्या पेक्षा जास्त मेहनतीने काम करू लागला. नेतृत्वाच्या या अजब पैलूने काम तर पाहिजे त्यापेक्षाही जास्त होऊ लागले.१९९१ ते १९९७ पर्यंत प्रचंड काम त्याने केले.
शीला वहिनी डॉक्टर तर प्रमोद इंजिनिअर. दोघांचा विवाह झाला. वहिनीचे M.D. चे शिक्षण सुरु झाले म्हणून त्या अंबाजोगाईत तर नोकरीसाठी प्रमोद पुण्याला.वैद्यकीय शास्त्राचा गंध नसणारा प्रमोद मात्र वहिनीसाठी पुस्तके, अभ्यासक्रमाचे संदर्भ साहित्य शोधण्यात पुण्यात भरपूर फिरायचा.
येणारा काळ मात्र खूप संघर्षाचा होता. नेहा म्हणजे दोघांनी पहिली मुलगी. ती पोटात असताना वहिनीच्या स्कूटरला अपघात झाला. त्या दूर फेकल्या गेल्या व पोटावर पडल्या. बाळंतपण आई व लेकरासाठी अवघडच होते. काही खूपच जवळचे होते त्यांनी मात्र धीर दिला. सगळे प्रयत्न सुरु झाले. अंबाजोगाईला सतत येण्यासाठी प्रमोदला रजा मिळत नव्हत्या तर हा पठ्ठ्या आठवड्यातील कित्येकवेळा तीनतीन शिफ्ट सलग करे व अंबाजोगाईत येई. ज्याच्या रोमारोमात चांगुलपणा व प्रेम ठासून भरलेला आहे अशा प्रमोद कडून यापेक्षा वेगळी अपेक्षा अशक्यच. नेहाचा जन्म सुखरूप झाला पण तिला खूप जपावे लागणार होते. त्या कोवळ्या जीवाकडे पाहताच वात्सल्याच्या माऊलीचे रूप असणाऱ्या प्रमोदने सरळ नोकरी सोडून दिली. पुढील आठ महिने तो वहिनी व नेहाची काळजी घेत होता.
दोघींची प्रकृती थोडी स्थिरस्थावर झाल्यावर प्रमोदने ऑटोमोबाईल सर्व्हिस मध्ये काम करायचे ठरवले. मुळात इलेक्ट्रोनिक्समध्ये शिक्षण असलेल्या प्रमोदला आता ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करावयाचे होते.
बाळूचे प्रेम, वात्सल्य,चांगुलपणा,सचोटी, प्रामाणिकपणा ह्या गुणाच्या बाबत जसे मला कुतूहल होते तेवढेच कुतूहल त्याच्या ऑटोमोबाईल सर्व्हिसमधील कामाबद्दल होते. निर्णय झाल्यावर त्याने औरंगाबाद गाठले. मोरे गॅरेजवर तो मदनीस म्हणून बिनपगारी काम करू लागला. त्या गॅरेजच्या मालकाला कल्पनापण नव्हती की हा इंजिनिअर आहे म्हणून. निळ्या रंगाचा, काळ्या ग्रीसचे नक्षीकाम असणारा सदरा. काळ्या रंगात माखलेले ऑटोमोबाईलच्या समस्या सोडवणारे हात. बोलके व प्रेमळ डोळे. प्रचंड आर्जवी व मिठास बोलणे. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ईश्वर समजून त्याचे केलेले आतिथ्य. त्याला धीर व आधार देत त्याच्या वाहनाचा प्रश्न चुटकीसरशी समजून घेणारी त्याची समज. प्रचंड मेहनत व अफाट प्रयत्नांनी भारलेले त्याचे शरीर. रात्रंदिवस स्वतःच्या मेंदूला ऑटोमोबाईल इंजिनिअरींगच्या प्रत्यक्ष कामात भारून टाकणारा प्रमोद म्हणजे अजब रसायन.
अवघ्या दोन वर्षात तो गॅरेजच्या मदतनीसाचा मालक झाला. मालक झाला खरा पण त्याचा जीव मात्र अंबाजोगाईत होता. वहिनींना अंबाजोगाई सोडता येणार नव्हते त्यात नेहा खूपच लहान. प्रमोदने अंबाजोगाईत येऊन सर्व्हिस सेंटर सुरु करण्याचे ठरवले. अनेकांना वाटले की बाळूला वेड लागले. तो बहकला…पण प्रमोदच्या प्रत्येक निर्णयात वहिनीची सक्रिय साथ असायची.
छोटा पत्र्याचा डबा उभा केला. त्यावर पाटी लावली. नेहा सर्व्हिस सेंटर. आठ महिन्यात १० ग्राहक मिळाले. सारेच अवघड होते. एक दिवस शॉपच्या समोर एक मस्त गाडी उभी राहिली. मानवलोकच्या बाबूजींची ती गाडी होती. लातूरमधील मोठ्या सर्व्हिस सेंटरने त्यांना दुरुस्तीचे काही हजार रुपये सांगितले. अनिकेतदादाच्या सांगण्यामुळे प्रमोदला गाडी दाखवायचे ठरले. आपल्या चाणाक्ष परीक्षेतून व चोखंदळ अनुभवाने गाडीची समस्या केवळ काही शे रुपयात प्रमोदने नीट केली. असे एक न अनेक किस्से लोकांना कळू लागले. काही दिवसातच नेहा सर्व्हिस सेंटर अनेकांच्या भरवश्याचे केंद्र बनले.
गेल्या अनेक वर्षात बाळूची अनेक रूपे मी व मित्रांनी अनुभवली आहेत. अजयचा पहिला दिवाळसण बाळूने आपल्या घरी आनंदात साजरा केला. त्याच्यासाठी तर प्रमोद म्हणजे देव माणूस अगदी हनुमंतासारखा. सत्तरीला पोहोचलेल्या मुत्तेपवार सरांसाठी प्रमोद म्हणजे जिवलग मित्र. नीरज व नेहासाठी तर तो फक्त पप्पा न राहता मेंटोर होतो,भाऊ होतो आणि त्याही पुढे जाऊन तो रोलमॉडेल झालाय.वहिनींच्यासाठी मित्र, पतीच्या पुढे जाऊन तो साताजन्माचा सोबती वाटतो. अनेक बेरोजगार तरुणांना कौशल्य शिकवत स्वावलंबी बनवणारा मोठा भाऊ. अर्ध्या रात्री गाडी कुठे बंद पडली तर नक्की मदतीला येऊन समस्या सोडवून पैसे न घेणारा देवदूत वाटतो.त्याच्या क्षेत्रातील लोक त्याला आदराने भैय्यासाब म्हणून ओळखतात.
यंत्रांच्या सहवासात राहून माणसे यंत्रवत,भावनाशून्य,पराकोटीची व्यावहारिक व स्वार्थी बनतात पण बाळू त्यातील नाही. त्याने आपल्यातील चांगुलपणा,प्रामाणिकपणा विलक्षणपणे आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीत संक्रमित केला आहे. त्याचे कुटुंब म्हणजे फक्त घरातील लोकच नाही तर त्याच्या संपर्कात येणारे सर्व जण. मला मात्र बाळू म्हणजे चांगुलपणाचे सर्व्हिस सेंटर वाटतो. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मनाची उद्विग्नता जर वाढत असेल तर प्रमोदशी व त्याच्या कुटुंबाशी संवाद म्हणजे काही काळासाठी अमृताअनुभव…..तो अनुभव आज भरभरून घेतला. आपल्याला पण असा मित्र आयुष्याच्या जगरहाटीत विसावा म्हणून नक्कीच आवडेल.
प्रमोद आदनाक :- 9822197172
Sheela Gaikwad Prashant Adnak
: लेखन
प्रसाद चिक्षे