17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसाहित्यअभिजाततेसाठी गझलेच्या तंत्रात अभिव्यक्तीचे मंत्रसामर्थ्य हवेच

अभिजाततेसाठी गझलेच्या तंत्रात अभिव्यक्तीचे मंत्रसामर्थ्य हवेच

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

छ.संभाजी नगर ता.5 गझल हा कवितेचाच एक प्रकार आहे.त्यामुळे गझल निर्मितीची प्रक्रिया ही कविता निर्मितीची प्रक्रियाच असते. गझल लेखन हा सहजोद्गार वाटत असला तरी तिच्या निर्मितीप्रक्रियेत एक शास्त्र दडलेलं असतं. लेखनाची निर्मिती प्रक्रिया नेहमीच लेखकाच्या जीवनाकडे बघण्याच्या जाणिवेशी, तो जी मूल्यव्यवस्था मानतो तिच्याशी आणि संवेदनशीलतेशी निगडित असते. म्हणजेच जाणीव- नेणीवेशी संबंधित असते. निर्मिती प्रक्रिया ही साहित्य शास्त्रातील एक संकल्पना आहे. अभिजाततेसाठी गझलेच्या तंत्रात अभिव्यक्तीचे मंत्रसामर्थ्य हवेच , असे मत प्रसिद्ध गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

कलाकृती तयार होण्याच्या मानसिक प्रक्रियेचा ती अभ्यास करत असते. गझल या काव्य प्रकाराला पाचशेहून अधिक वर्षाची निर्मिती परंपरा आहे. ती फारसी – उर्दू करीत सर्व भाषेत पोहोचली. मराठीमध्ये शास्त्रशुद्ध गझल अर्धशतकापूर्वी कालवश सुरेश भट यांनी आणली. आज गझल लेखनामध्ये संख्यात्मक व गुणात्मक वाढ होत आहे. तसेच गझल या काव्य प्रकाराची स्वतंत्र संमेलने व कार्यशाळा होत आहेत याचे श्रेय सुरेश भट यांचेच आहे. त्यांच्यामुळेच मराठी गझलेला लोकप्रियता, हृदयप्रियता , कर्णप्रियता आणि नयन प्रियता लाभलेली आहे. गझलेची अभिजातता जपण्यासाठी गझलेच्या तंत्रात अभिव्यक्तीचे मंत्रसामर्थ्य घालत सुरेश भट यांना अभिप्रेत असलेली गझल पुढे नेणे हीच नव्याने लिहिणाऱ्या गझलकारांची जबाबदारी आहे,असे मत जेष्ठ गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी (इचलकरंजी )यांनी व्यक्त केले.ते छत्रपती संभाजी नगर येथील रेणुका गझल मंचच्या वतीने आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत ‘ गझलेची निर्मिती प्रक्रिया ‘ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.स्वागत आत्माराम कदम (मुंबई ) यांनी केले.तर प्रास्तविक रेणुका गझल मंचचे संस्थापक प्रा.डॉ. रेणुकादास भारस्वाडकर (छत्रपती संभाजी नगर )यांनी केले.नरहर कुलकर्णी ( कोल्हापूर)यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.या कार्यशाळेत प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा ,बापू दासरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, ज्याला चांगला गझलकार व्हायचे आहे तो चांगला कवी असावा ही पूर्वअट आहे. गझलेत शब्दबंबाळता चालत नाही तर शब्दसामर्थ्य लागते. वृत्त, आकृतीबंध छंद ,यमक, अंत्ययमक, तंत्र, शेर, मतला, यती,गझलियत अशी गझलेची अनेक वैशिष्ट्य आहेत. डोळ्यांना जशी भाषा असते तशी गझलेला व्याकरण असते. तिथे भाषा पणाला लागत असते.भारतीय साहित्यशास्त्रात कवितेचे शरीर आणि कवितेचे आत्मा अशा दोन संज्ञा आहेत.सुगमता ,अर्थसुंदरता, निसंदिग्धता आदी कवितेचे शरीर तर रस, रीती, ध्वनी , वक्रोक्ती आदीना काव्याचा आत्मा संबोधले आहे. वेदना आणि संवेदनातून कविता जन्म घेत असते. अपूर्णतेत नवनिर्मितीची बिजे असतात.पण अंकुरणे सहज सोपे नसते त्यासाठी बिजाला आतून तडकावे लागते.
गझल हा काव्यप्रकार पूर्णपणे समजून घेऊन लिहिला पाहिजे. लिहीत असताना त्याला आपल्या अनुभूतीची जोड दिली पाहिजे. माणसांशी दुरावा ठेवून केवळ माध्यमांशी जवळीक ठेवली तर सकस गझल निर्माण होणार नाही. याचे कारण माध्यमे दिखाऊ आणि सवंग होत चालली आहेत. अशावेळी आपल्या अंतरातले माणूसपण ज्याला जपता येईल तोच चांगली गझल लिहू शकेल. कवीला समाजातील सर्वात द्रष्टा व समंजस मानले जात होते. इमर्सनने तर कवींचा उल्लेख मुक्तीदेवता असा केला आहे याचे भान ठेवले पाहिजे.प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या मांडणीत कवितेची अर्थात गझलेची निर्मिती प्रक्रिया आणि गझलेचे तंत्रशास्त्र उलगडून दाखविले.या कार्यशाळेत गौतम सुर्यवंशी ,शोभा वागळे, हेमंत रत्नपारखी राजाराम कांबळे(गडचिरोली )अनिकेत सागर ( मालेगाव ),पुष्पा पंढरीनाथ वाजे(नाशिक),स्वाती म्हात्रे (मुंबई),रमेश डफाल’फौजी'(मुलूंड), डॉ.प्रशांत पाटोळे(पुणे), डॉ.मानसी नाईक(मुंबई)कल्पना टी.(तेलंगणा),सविता म्हात्रे (नागपूर),नासीर पठाण(सांगली),अरुणा डुड्डुलवार (नागपूर),स्वाती देशमुख (नागपूर), रमेश डफळे ,श्रुती भावसार आदींसह महाराष्ट्र ,तेलंगणा, गुजरात ,मध्यप्रदेश येथील अनेक गझलकार सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]