◆निमित्त◆
●ठाकरे म्हणजे टायमिंग!●
★शिवसेनेवरील संकट हिंदुत्ववाद्याना अस्वस्थ करणारे ★
◆राजेंद्र शहापूरकर◆
भाग : १
औरंगाबाद : ‘ठाकरेंना टायमिंग जमतं… कुठं बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं, किती बोलावं हे ठाकरेंना समजतं ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच एकदा ठाकरेंचे हे गुपित उघड केले होते. बाळासाहेबांची बातच काही और होती. मराठीच नव्हे तर इंग्रजी भाषेवर सुद्धा त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या भाषेला वेगवेगळे रंग होते. अंगार होता तसा खोडकरपणा होता, व्यंगचित्रकाराच्या नजरेतून ते भल्याभल्याचे वस्त्रहरण अतिशय चपखलपणे करीत आणि तितक्याच सहजतेने अगदी नैसर्गिकरित्या बाळासाहेब सर्वसाधारण शिवसैनिकांपर्यंत पोहचत… जोडले जात. मिस्कीलपणे एखादा असा ‘सिक्सर’ मारीत की बस्स. काय झाले हे समजण्याच्या आत ‘बॉल’ मैदानाबाहेर ! आणि महत्वाचे म्हणजे ते ‘धूर्त’ नव्हते!!
बाळासाहेब राजकारणात रमत नव्हते तेवढे कलावंता मध्ये रमत. साहित्यिक,गायक,चित्रपट कलावंत, कवी … त्यांना कलेचे कोणतेही क्षेत्र वर्ज नव्हते.त्यांचे क्रिकेटप्रेम तर जगजाहीरच होते पण ते कॅरमही उत्कृष्ट खेळत हे कितीजणांना माहीत असेल ? तर असो. शिवसेनाप्रमुखांचा साधा उल्लेख आला तरी असे होते पहा…
सद्या शिवसेनेच्या नावावर जे काही चालले आहे ते पाहिले तर कोणत्याही सच्च्या हिंदुत्ववाद्याला त्रास होईल असेच वातावरण आहे.२०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख गेले आणि शिवसेनेचे ते वैभव अस्तगत व्हायला सुरुवात झाली. तसे ते २००० सालापासून राणे , राज प्रकरण उदभवत गेली म्हणा पण साहेबांचा एकप्रकारचा धाक होताच.
साहेबांना त्यांचे बलस्थान माहीत होते तसे त्यांना स्वतःच्या मर्यादाची जाणीव होती. त्यांच्या काळातही अनेक युत्या-आघाड्या झाल्या त्यात विरोधाभासही खूप होता पण प्रत्येक वेळी शिवसेनेच्या हिताला साहेबांनी प्राधान्य दिल्याचे दिसते. १९७५-७६ मध्ये घेतलेली आणीबाणी समर्थनाची भूमिका तसेच १९८५ नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर केलेली युती आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे धोरण शिवसेनेच्या हिताचा विचार करूनच साहेबांनी स्विकारले याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
बाळासाहेबांच्या काळातही त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे प्रयत्न झाले पण त्यांनी कोणत्याही प्रकारची हाराकीरी नकरता आव्हानं मोडून काढली. मग ते लालबागचे शाखाप्रमुख बंडू शिंगरे यांनी ७८-७९ मध्ये केलेले ‘प्रतिशिवसेना’ च्या रूपातील असो, छगन भुजबळांचे (१९९१) चे बंड असो की संघटनेच्या संस्थापकापैकी असलेल्या माधव देशपांडेंचे आव्हान असो … कधी फटकावून काढीत तर कधी स्वतः संघटनेपासून दूर जाण्याचे जाहीर करीत भावनात्मक स्टँड घेत ..! फालतू बडबड नाही, किळस येईल इतक्या खालच्या पातळीवरील टीका नाही , विश्वप्रवक्ता सोडाच प्रवक्ता सुद्धा नाही आणि तरीही किंवा म्हणूनच यशस्वी !
लेखन : राजेंद्र शहापूरकर
( लेखक हे जेष्ठ संपादक आहेत )
अगदी बरोब्बर! ‘रिडल्स इन हिन्दुइझम’ प्रकरणी पुरोगामित्व, ‘सेक्युल्यारिझम’मुळे महाराष्ट्रातील तथाकथित “डाव्या”, “सेक्युलर” पक्षांनी शेपुटघालू, पुचाट, बोटचेपी भूमिका घेतली असताना बाळासाहेब ठाकरे यांनी ‘आंबेडकर कितीही मोठे असले तरी हिंदू देवदेवतांचा अवमान करण्याचा त्यांना मुळीच अधिकार नाही’, अशी रोखठोक भूमिका घेतली. ही भूमिका मुंबई व महाराष्ट्रातील मराठी, हिंदू जनतेला भावली आणि अशाच रोखठोक भूमिकेने बा. ठाकरे आणि शिवसेनेला राज्य पातळीवर आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत नेऊन पोहचवले आणि काँग्रेसला पराभवाची चव चाखवली.