24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*★ जनसंपर्क हेच बलस्थान★*

*★ जनसंपर्क हेच बलस्थान★*

●निमित्त●

मातोश्री : शिवसेनाप्रमुखांची आणि पक्षप्रमुखांची !◆
■राजेंद्र शहापूरकर■
भाग 2

औरंगाबाद: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्व, वक्तृत्व, गुणग्राहकता आणि जनसंपर्काचे सार म्हणजे शिवसेना आणि बाळासाहेबांच्या याच बलस्थानाचा वारसा दुर्लक्षित करून ‘वडिलांना दिलेले वचन’ म्हणत मुख्यमंत्रीपदी बसलेल्या पक्षप्रमुखांवर आज अशी ‘भात्यात बाण नसलेल्या धनुर्धारी ‘ प्रमाणे झाली आहे.
अर्थात बाळासाहेब हे लोकोत्तर पुरुष होते. त्यांच्या सारखा दुसरा होणे अशक्यच आहे हे जरी खरे असले तरी अडचणीत आल्यावर उठता बसता त्यांचे नाव घेणाऱ्या त्यांच्या मुलाबाळांनी त्यांच्या यशाचे गुपित काय असावे याबद्दल चिंतन करण्याची गरज नव्हती काय ? ही मंडळी तर स्वतःला साहेबांपेक्षा महान समजायला लागली होती . बाळासाहेबांपेक्षा आपण कसे धूर्त आहोत याचा डांगोरा पिटत होते तर प्रवक्ते कम समांतर पक्षप्रमुख साहेब आणि त्यांचे पवार साहेब यांच्यातील औपचारिक संबंधाना ‘जानी दोस्ती’ ठरवित राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबरच्या आघाडीला बाळासाहेबांचे स्वप्न म्हणत होते .
शिवसेनाप्रमुख आणि पक्षप्रमुख यांच्यात तुलना करण्याचा मोह टाळून सुद्धा राहावत नाही. साहेबांची ‘मातोश्री’ वेगळीच होती. अस्सल कलावंताची होती. फार झकपक नव्हती पण एक प्रकारची श्रीमंती होती. भेटायला येणाऱ्या लोकांच्या दारापुढच्या चपलांची श्रीमंती ! साहेब, सर्व शिवसैनिकांना , नेत्या-पदाधिकाऱ्याना ‘या श्रीमंती’चा दाखला देत. दारातल्या चपला कमी झाल्या की आपले काही खरे नाही हा त्यांचा गुरूमंत्र त्यांचा वारसा मिरवणारे पक्षप्रमुख विसरले नसते तर शिवसेनेपुढे आताचा प्रसंग कधी निर्माणच झाला नसता यात कुणाला शंका असण्याचे कारण नाही असे वाटते. साऱ्या समस्येचे मूळ हेच तर आहे.


शिवसेनेचे धोरण शिवसेनाप्रमुख ठरवित…नेत्यांच्या बैठकीत चर्चा होई हे खरे पण अंतिम निर्णय साहेबांचाच ! त्यांनी एकदा जाहीर केले की मग त्या अनुसंघाने नेते , पदाधिकारी, आमदार , खासदार बोलत .पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या मागे फरफटत चालतात असेच चित्र दिसते. विश्वप्रवक्त्यांचा ‘रोजचा रतीब’ कमी होता म्हणून आता मावळलेल्या महापौराबरोबरच आता मुंब्र्याची पडेल उमेदवार सरसावलेल्या दिसतात आणि चिंटू तर ‘संपत चाललेल्या पक्षाबद्दल बोलायची गरज नाही’ म्हणतात. यावर वरताण म्हणजे ज्यांनी पुढे येऊन बोलले पाहिजे ते पक्षप्रमुख चार-आठ दिवसातून एकदा चार-दोन टोमणे मारून ‘भात्यात बाण नसले तरी धनुष्य ‘ आपल्याकडे शाबूत आहे म्हणत उत्सव साजरा करीत असतील तर आपण काय बोलणार ?


आज दोन-दोन ‘मातोश्री’ समोरासमोर आहेत असे म्हणतात. १९९५ पूर्वीची आणि नूतनीकरणानंतरची ‘मातोश्री’ साहेब असेपर्यंत शिवसैनिकांच्या माहितीची आहे मात्र साहेबांनंतरची ‘मातोश्री-२’ सर्वसामान्य शिवसैनिकापासून फटकूनच होती आणि त्याचाच फटका या ‘दोन नंबर’च्या मातोश्रीला बसला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे असे वाटत नाही .

लेखन : राजेंद्र शहापूरकर

( लेखक जेष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक आहेत )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]