निमित्त – ५
■टायमिंग चुकले , पक्षप्रमुख हुकले ■
●राजेंद्र शहापूरकर ●
औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्याच्या सारखा नेता दुसरा कुणी झाला नाही. होणार नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर कुणाशी तुलना होऊ शकत नाही … अगदी त्यांच्या वारसदारांशी सुद्धा. पण या लेखमालेत झाली … करावी लागली. त्याला कारण म्हणजे साहेबांसारखी योग्यता नसताना , कुवत नसतांना त्यांना मिळणारा मान मिळावा यासाठी चाललेला अट्टहास!
तसे पाहिले तर पक्षप्रमुखांनी अगदी स्पष्टपणे त्यांना काहीही किंमत असल्याचे अगदी face book live मध्ये सांगितले आहे , त्याचा अर्थ त्यांना आपली मजल कुठपर्यंत आहे याची जाणीव आहे. आणि तरीही साहेबां सारखी वागणूक इतरांकडून मिळावी हा हव्यास त्याच्या कुठेतरी आड आला असावा असे चित्र दिसते.
पक्षप्रमुखांनी स्वतः च्या आजूबाजूला जमा केलेली माणसं आणि साहेबांनी गोळा केलेली माणसं ह्याच्यातील जमीन-अस्मानाचा फरक कुणाच्याही लक्षात येण्यासारखा आहे. साहेबांची तळागाळातून , सर्व क्षेत्रातील, जातीजमातीची, विचारांची माणसं उभी केली होती. त्यात नवलकरांसारखा साहित्यिक , तसा समाजवादी विचारांशी जवळ असलेला माणूस होता तर अतिशय कडवट, आक्रमक दत्ताजी साळवी होते, परळच्या चमारबागचाळीत दोन खोल्यात राहणारे शिंपी समाजातील वामनराव महाडिक होते. कणकवलीच्या या आप्पाचे साहेबांना ‘शुभ वामन’ असे कौतूक करीत आणि त्यांच्याशी न पटणारे मनोहर जोशी हे हायफाय लोकांत उठबस असणारे तर साहेबांचे खासमखास होते. सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेला आक्रमक स्वरूप देतानाच एक प्रकारची शिस्त संघटनेत आणली. औरंगाबादचे पहिले संपार्कनेते मधुकर सरपोतदार गुलमंडी वरील ‘गोमटगीरी’ मध्ये उतरत आणि गजाभाऊ म्हणजेच खासदार गजानन किर्तीकर जिल्हाप्रमुखाच्या घराच्या बाहेर ओसरीवर आंघोळ आटोपून जालन्याकडे रवाना होत तर दिवाकर रावते यांनी एसटीने मराठवाडाभर फिरून संघटना बांधली हे आज कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही अशी परिस्थिती आहे. आपले चंद्रकांत खैरे मध्यरात्री ‘अजिंठा एक्सप्रेस’ ने येणाऱ्या नेत्यांसाठी रेल्वेस्टेशनच्या फलाटावर झोपलेले आहेत यावर विश्वास ठेवता येईल ? अशी घडली शिवसेना , अशी वाढली शिवसेना !
बाळासाहेबांच्या शिवसेनेची एक वेगळीच झिंक होती.’भगव्या भानामतीचे भूत’ असा उल्लेख आमच्या प्रतापराव घारे यांनी एकदा केला होता त्याची आठवण झाली. खूप लिहिण्यासारखे आहे , बोलण्यासारखे आहे .त्याचा उपयोग आता होऊ शकत नाही हे सुद्धा कळतं पण तरीही मोह होतोच. असो.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अगदी दुसरे टोक म्हणजे पक्षप्रमुखांची शिवसेना ! त्यांचे संघटनेवर नियंत्रण असल्याचे कधी जाणवलेच नाही. आजूबाजूला असलेली मंडळीच म्हणजे महाराष्ट्र. पीआर कडून करवून घेण्यात येणारी वाहवा खरी समजून स्वतःचे असणारे कौतूक आणि अतिशय क्षुल्लक कुवतीच्या, क्षुद्रवृत्तीच्या आणि विध्वंसक मानसिकतेच्या कह्यात गुरफटलेल्या पक्षप्रमुखाना ‘शरदनीती’ चा मोह पडला नसता तरच नवल ! पक्षप्रमुख टायमिंग चुकत गेले, टोमणे मारीत गेले आणि त्यांच्या शिवसेनेची घसरण होत गेली ती आज इथपर्यंत आली. आतातरी ही घसरगुंडी थांबावी , शिवसेनेला पूर्वीसारखे वैभव प्राप्त व्हावे असे जुन्या-जाणत्या हितचिंतकांना वाटणे साहजिक आहे पण तसे होणे कठीण दिसते कारण उद्यापासून पुन्हा मुलाखतीचा रतीब सुरू होईल आणि टोमण्यांना बहर येत जाईल यात शंका नाही.
लेखन : राजेंद्र शहापूरकर
( लेखक हे जेष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक आहेत )