★राजेंद्र शहापूरकर ★
औरंगाबाद : ‘Strong minds discuss ideas, average minds discuss events, weak minds discuss people’ असे सॉक्रेटिस या ग्रीक तत्वज्ञाचे सांगून ठेवलेले आहे. कधीतरी वाचण्यात आले होते. आज आठवले!
सांगायचा मुद्दा म्हणजे शिवसेनेत उभी फूट पाडल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थांबण्याचे आणि प्रवक्ते संजय राऊत, गप्प बसण्याचे नाव घ्यायला तयार नाहीत असे दिसते. राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आपल्या साथीला घेऊन दोन दिवस सकाळी सकाळी चॅनलवर येऊन ‘तेच ते अन तेच ते’ करून पाहिलं.

मुख्यमंत्री शिंदे यांनी आधी आमदार आपल्या बाजूला घेतले आणि उद्धव ठाकरे यांना साधी ‘खाजवण्याची’ संधीही न देता १२ – १३ खासदार ‘कव्हर’ केले. ठाकरे गटाकडून संजय राऊत तेवढे प्रात:कार्यासारखे न्युज चॅनलवर शिंदे अँड कंपनीला शिवीगाळीने दिनारंभ करीत राहिले.पक्षप्रमुखांनी कुणाची हकालपट्टी केली रे केली की त्याची पुनर्स्थापना करून पवित्र करून घेण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यानी लावला. या प्रकारात आपल्याकडचे गडी कमी कमी होत चालले याचे भान प्रवक्ते-पक्षप्रमुख यांना येण्यापूर्वीच शिंदे मुख्य निवडणूक आयुक्तांकडे शिवसेना पक्षावर दावा सांगून मोकळे झाले आणि उध्दव ठाकरेंच्या तंबूत गडबड उडाली. याच मनस्थितीत राऊत यांनी आपल्याला उध्दवजींनी ‘मुलाखत’ द्यावी असे वाटून गेले. आता राऊतांना वाटल्यावर ‘अशक्य ते शक्य , करतील स्वामी’ हे ठरलेलेच ! त्याप्रमाणे ‘दोन दिवस घालवून’ झाल्यावरही काही फरक दिसायला तयार नाही. उद्धवजी , राऊतजी आणि आदित्यजी या ‘थ्रीजी’समोर शिंदे यांनी राणेंजी, केसरकरजी, शिरसाठजी, भूमरेजी असे ‘फोर-फायजी’ उभे करून दिले आणि स्वतः मात्र तोंडाची वाफ न दवडता ‘नेतेभेटी’च्या मोहिमेवर बिझी झाले. अंधेरीला जाऊन त्यांच्या गटात नसलेले खासदार , सेनानेते गजानन किर्तीकर , दिवाळखोरीत काढण्यात आलेले नेते ऍड.लीलाधर डाके आणि विस्मृतीत गेलेले ज्येष्ठनेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीसर यांची भेट घेऊन ‘गुडविल’ घेऊन गेले. या सगळ्या गुडविलचा फायदा त्यांना कोर्ट-कचेरीत होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ये दोस्ती हम नही तोडेगे’ म्हणत संजय राऊत आज पुन्हा सकाळीच चॅनलवर अवतरले आणि ‘ नवीन सरकार राज्यात येणार ‘ असे स्वप्नरंजन करीत नेहमी प्रमाणे मुख्यमंत्री , पंतप्रधानासह सोडून गेलेल्या आमदार-खासदावर टीकास्त्र सोडू लागले, टोले लगावू लागले … आणि मला अगदी अपसूक ‘मूर्ख माणूस इतर माणसांबद्दल गप्पा मारतो, सामान्य माणूस घडलेल्या घटने संबधी बोलतो तर बुद्धिमान माणसं मात्र नव्य-नव्या संकल्पनाची चर्चा करतो ‘ हे सॉक्रॅटिसचे बोल आठवले!

राजेंद्र शहापूरकर
( लेखक हे जेष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक आहेत )