निमित्त – ४ :
( लेखमाला )
◆व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून साकार झालेल्या संघटनेचे झाले ‘व्यंगचित्र’ !◆
■राजेंद्र शहापूरकर ■
औरंगाबाद : शिवसेनेचा इतिहास माहीत असणाऱ्या जुन्या सैनिकांसाठी संघटनेवर आज ओढवलेली परिस्थिती अकल्पनिय आहे.गेल्या अडीच-तीन वर्षात झालेला संघटनेचा राजकीय प्रवास त्यांना समजण्याच्या पलीकडचा आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही ; आणि त्यामुळेच पचनी पडलेला नाही.
चालले ते अयोग्य आहे असे दिसत असूनही ‘मातोश्री’ ला कुणी अशा प्रकारचे आव्हान देऊ शकेल…जेरीस आणू शकेल असे कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण असे झाले हे वास्तव आहे. पक्षप्रमुख ‘बाण नसले तरी धनुष्य माझ्या कडेच राहणार’ यावर खुश आहेत.आता या बाणा शिवाय धनुष्याचे ते काय प्रदर्शन भरवितात की कुणाला वापरण्यासाठी भाड्याने देतात याची वाट पाहण्याची वेळ ‘उर्वरित नंतर’ आली आहे. पक्षप्रमुखांच्या ‘पितृपक्षा’वर दोन-तीन महिन्यात येणाऱ्या पितृपक्षात कावळाही शिवायला येऊ नये अशी वेळ येऊ नये हीच अपेक्षा आणि सदिच्छा ‘निष्ठेचे शपथपत्र’ (१००₹ च्या स्टॅम्प पेपरवर) भरून देण्याची गरज नसलेल्या निष्ठावान सैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. एका व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यातून जन्मलेल्या कडवट संघटनेचे हे असे व्यंगचित्र अस्वस्थ करणारे आहे यात दुमत असण्याचे कारण नाही.
साहेबांच्या शिवसेनेत निष्ठेचे ‘शिवबंधन’ बांधावे लागत नव्हते, स्टॅम्प पेपर तर नव्हतेच नव्हते आणि तरीही साहेबांवर शिवसैनिकच नव्हे तर सर्वसामान्य जनतेचे सुद्धा अपार प्रेम होते. निष्ठा होती. आदर होता आणि जरबही ! महाराष्ट्रावरील संकटाच्या प्रत्येक वेळी प्रथम धावला तो बाळासाहेबांचा शिवसैनिकच ! मग ते संकट बीड मधील बिंदुसरा कोपल्यामुळे निर्माण झालेले असो की किल्लारीचा भूकंप . मुंबईतील रुग्णवाहिका , रक्तदान शिबिरं सर्वसामान्य माणसाला आधार वाटल होती. पक्षप्रमुखांच्या शिवसेनेच्या नावावर असे काय आहे ?
बाळासाहेब श्रीमंत योगी होते. सर्वसत्ता त्यांच्या अधीन होती पण ते प्रत्यक्ष सत्तेवर नव्हते आणि हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती होती. एकदा तुम्ही आमदार झालात की २८८ आमदारांपैकी एक होता , मंत्री-मुख्यमंत्री झाला की त्यांच्यातले एक सहकारी , फारतर थोडे जास्त अधिकार असलेले ..यापेक्षा वेगळेपण काय असते ? त्यांच्यापैकी एक झाला की कसला धाक आणि कशाचा आदर ! साहेबांना याची बरोबर जाणीव होती म्हणूनच ‘मी निवडणूक लढविणार नाही ‘ असे ते म्हणत. साहेबांनी मनोहर जोशी सर यांना मुख्यमंत्री केले , नारायण राणेंना मुख्यमंत्री केले. नेत्यांसह अनेकांना मंत्री बनविले पण मुलाला , पुतण्याला मंत्री नाही केले. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्याची हिंमत कुणाला झाली नाही. १९९९ च्या जानेवारीत साहेबांनी आशिष कुलकर्णी सारख्या शिवसेना भवनात कार्यरत असलेल्या एका साध्या शिवसैनिकाच्या हस्ते ‘वर्षा’ वर एक चिठ्ठी मुख्यमंत्री मनोहर जोशीसराना पाठवली. याच चिठ्ठीत सरांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आणि सरांनी काहीही प्रश्न नविचारता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला . सरांनी शिवबंधन बांधलेले नव्हते किंवा निष्ठेचा ‘बॉण्ड’ ही लिहून दिलेला नव्हता . साहेबांची नैतिक ताकदच अशी होती पक्षप्रमुख याच्या आसपासही फिरकू शकत नाहीत हीच तर खरी मेख आहे.
लेखन : राजेंद्र शहापूरकर
( लेखक हे जेष्ठ संपादक व राजकीय विश्लेषक आहेत )