■ठाकरेंनी खास विमान करून गुवाहाटीला पाठवावे■
★राजेंद्र शहापूरकर★
औरंगाबाद: आपल्या भाषा सौंदर्याच्या बळावर विश्वप्रवक्तेपदाच्या बिरुदावलीपर्यंत जाऊन पोहचलेले शिवसेनेचे ‘राष्ट्रवादी’ नेते संजय राऊत यांना ओळखत नाही तो मराठी माणूस असूच शकत नाही, अशी मराठी माणसाची एक गरमागरम ताजी व्याख्या रूढ होण्यास आता हरकत नाही, असे वाटते.
मराठी माणसाची व्याख्या अनेकांनी अनेक प्रकारे केली असली तरी मला काँग्रेसचे विद्वान नेते कै.बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी केलेली व्याख्या भावते. ‘ ठेच लागल्यावर ज्याच्या तोंडून ‘आई ग’ असा शब्द बाहेर पडतो , तो मराठी माणूस !’ अशी थेट ह्दयाला हात घालणारी त्यांची ही व्याख्या आहे. आता विठ्ठलराव गाडगीळ यांची आठवण झाली तर त्यांचे आणि ‘मविआकर्ता’ शरद पवारांचे सौख्य आठवले. त्याच बरोबर गाडगीळांनी सांगितलेली ‘एका गाढवाची गोष्ट’ तर हटकून आठवली. तीसेक वर्षांपूर्वी या गाढवाच्या गोष्टीमुळे तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या समर्थकांनी ‘हंगामा’ केला होता. ‘बडे बडे पार्टी मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहेती है’ तर असो.
आता मला विठ्ठलराव का आठवले ते सांगतो. आता जसा ‘महाराष्ट्राचा अपमान , मराठी माणसाचा अपमान ‘ चालू आहे ना तसेच १९९३-९४ मध्ये ‘मराठी माणूस कुणाला म्हणावे यावर बौद्धिक सुरू होते.पक्ष काँग्रेस होता पण सूत्र असेच त्यावेळी विठ्ठलराव गाडगीळ या काँग्रेसच्या बड्या नेत्याने मराठी माणसाची ‘ती’ व्याख्या केली होती .
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली उद्धवजींच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पवारगटाने सेट केलेल्या नेरेटिव्हनुसार शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी (त्यात मंत्रीही आलेत) जे ४०-४१ जण पवारगटाला ‘तो नाथएक करी तुज टाटा’ (चाल : तो छगन करी तुज टाटा) म्हणत गुवाहाटीला ‘ काय तो डोंगर , काय ते झाडं ‘ करीत बसले त्यांना ‘ईडी’चे औषध देण्यात आले आहे .
मराठी वृत्तवाहिन्यांवर गेले अनेक दिवस नॉनस्टॉप तोंड ( मुखकमल म्हणा फारतर) वाजवित महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा ‘स्वाभिमान’ समृद्ध करणाऱ्या ‘राष्ट्रवादी ‘ प्रवृत्तीच्या संजय राऊत यांना काल सूर्य कलतीकडे झुकायला लागला असताना ‘ईडी’ चे आमंत्रण पोहचले. तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असलेल्या एकनाथ शिंदेसह ५०-५१ आमदारांना ईडीने निमंत्रण देऊन ‘सुपारीची मंडी’ अर्थात गुवाहाटीत नेले असे नरेटिव्ह शिवसेनेच्या पवारगटाने सेट केले आहे.त्याला अनुसरून राऊतांनी ईडी निमंत्रणचे हातात पडताच ,’आपण ईडीला भीत नाही …आपण गुवाहाटीला जाणार नाही ‘असा पावित्रा घेतला आहे.
खरे तर राऊतांच्या पराक्रमाने उद्धवजी आज रस्त्यावर आले .आदित्य वरळीत आला. वहिणीसाहेबा ‘मोबाईलवर ‘ (सौ.रश्मी ठाकरे यांनी शिंदेगटातील गुवाहाटीस्थित आमदारांच्या बायकांशी मोबाईलवर संपर्क साधला असे म्हणतात.) आल्या. शरद पवार ‘मातोश्री’ वर आले. अजितदादा कोरोनावर आले. फडणवीस जोशात आले.चंद्रकांतदादा मूड मध्ये आले. शिवसैनिक चकरात आले…
यापार्श्वभूमीवर उद्धवजींनी राऊंताना खरे तर ‘तहानलाडू – भूक लाडू’ देऊन खास विमानाने ‘सुपारीच्या मंडीत’ म्हणजे गुवाहाटीला सोडावे , म्हणजे निदान त्यांच्या कारनाम्यांना वैतागून सर्व आमदार ‘दातो तले उंगलीया ‘ दाबीत मुंबईला येतील आणि ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी उद्धवजींना विनंती करीत गुमानं पवारगटाच्या शिवसेनेत शामिल होतील, पण ही आयडियाची कल्पना! पण ती मी देऊन उद्धवजी थोडेच ऐकणार आहेत ? त्यासाठी काकांनाच कानाशी लागावे लागणार आहे. (म्हणजे काय .…उद्धवजींच्या !!)
लेखन : राजेंद्र शहापूरकर, जेष्ठ पत्रकार