लातूर जिल्ह्यात एक रुपया विमा हप्ता भरून 5 लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा !
◆31 जुलै पर्यंत भरता येणार विमा हप्ता ◆
लातूर, दि. 19 (प्रतिनिधी): राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून आपल्या खरीप पिकांचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार 18 जुलै 2023 पर्यंत लातूर जिल्ह्यातील 5 लाख 889 शेतकऱ्यांनी एक रुपया विमा हप्ता भरून या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई मिळू शकेल.
कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेणारी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल हवामानामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान पीक विम्यासाठी पात्र आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा घेण्यासाठी इच्छुक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत, जनसेवा केंद्र (सीएससी), विमा कंपनी किंवा अधिकृत एजंट यांच्यामार्फत किंवा http://www.pmfby.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता भरताना पटवारी यांनी प्रमाणित केलेली नवीन सेटलमेंटची प्रत, आधारकार्ड, स्वप्रमाणित घोषणापत्र ज्यात खसरा क्रमांकाचे केऊन क्षेत्र, प्रस्तावित पिकाचे पेरणी क्षेत्र, मालकाचे नाव तथा विमा हिताचा प्रकार यांची नोंदणी करून सादर करावे लागेल, भाड्याच्या जमिनीच्या बाबतीत नोंदणीकृत करारपत्र, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स किंवा रद्द केलेला धन्देश, वाटेकरी आणि जमीन मालकाच्या आधारकार्डची स्वयंप्रमाणित प्रत आवश्यक आहे.
स्थानिक संकटांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास माहिती नोंदविण्याची प्रक्रिया
संकटाच्या परिस्थितीत, प्रभावित शेतकऱ्याला संकट आल्यापासून 72 तासांच्या आत थेट विमा कंपनीच्या 1800 209 1111 या टोल फ्री क्रमांकावर किंवा पीक विमा अॅपवर अथवा लेखही स्वरुपात संबंधित विमा कंपनी, कृषि विभाग, महसूल विभाग यांना संपूर्ण माहिती द्यावी लागते. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, गावाचे नाव, मोबाईल क्रमांक, बँकेचे नाव, बँकेचा खाते क्रमांक, संकटाचा प्रकार, प्रभावित पीक आदी बाबींचा समावेश आवश्यक आहे.