महिला गायक, महिला वाद्यवृंद यावर्षीचे प्रमुख आकर्षण
नांदेड, दि.२४ (प्रतिनिधी)-मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी देशभक्तीपर गितांचा अनोखा आविष्कार सैनिक हो तुमच्यासाठी…. हा कार्यक्रम यावर्षीही दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे हा कार्यक्रम राज्यभरातील गाजलेल्या गायिका आणि गाजलेल्या महिला वाद्यवृंद हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था आणि नांदेड जिल्हा पोलीस दल यांच्या पुढाकारातून गेल्या १४ वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन होते. यंदाचा हा कार्यक्रम ५५ वा असून, दरवर्षी वेगवेगळ्या कलावंतांना व वैशिष्ट्यपूर्ण बाबींना समोर आणत पत्रकार विजय जोशी त्याची निर्मिती करतात.
सोहमनाद ग्रुप आळंदी-पुणे हा ग्रुप कार्यक्रम सादर करणार आहेत. यावर्षी विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रम महिला वाद्यवृंद आणि महिला गायिका तसेच नृत्य कलेत देखील युवतींचा समावेश असणार आहे. प्रख्यात गायिका ज्योती गोराणे जी गौरव महाराष्ट्राचा सुर गृहलक्ष्मीचा या कार्यक्रमाची उपविजेता ही असून, मुंबईची गायिका आसावरी रवंदे-जोशी, राधिका साकोरे केंदूर या देशभक्तीपर गिते सादर करणार आहेत. गायिका व हार्मोनियमवर पुजा वाणी (आळंदी), ढोलकी- सौ.लक्ष्मी कुडाळकर, निवेदन श्रध्दा वरणगावकर-पुणे, की बोर्ड-कु.प्राजक्ता उकीरडे (अहमदनगर), अॅक्टोपॅड-प्रिया वझे-मुंबई, तबला व ढोलक-देवयानी मोहोळ-मुंबई,साईड रिंदम-सौ.ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा सहभाग असणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात जी नृत्य सादर होणार आहेत. ती नटेश्वर कथ्थक नृत्यालय, नांदेडच्या सौ.दिपाली संजय आवाळे यांच्या संचातील युवती सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संकल्पना नांदेडच्या सांस्कृतिक विश्वात वेगवेगळ्या दर्जेदार कार्यक्रमाची कलाकृती देणारे पत्रकार विजय जोशी यांची आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी हे या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार असून, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणार्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संवाद संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.