हौसाक्का पाटील यांना चाकूरात श्रद्धांजली अर्पण
सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम व स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती
लातूर : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कन्या थोर स्वातंत्र्य सैनानी वीरांगना हौसाक्का भगवानराव पाटील यांना चाकूर येथील क्रांतीसिंह नाना पाटील व्यायाम शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के व सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लोकप्राधिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रांतिकारकांच्या इतिहासाचे अभ्यासक व्यंकटराव धोंडगे श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी हौसाक्का पाटील यांच्या निधनामुळे स्वातंत्र्य लढा ते आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील क्रांतिकारक दुवा निखळला आहे. त्यांचे जीवन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याप्रमाणेच कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी वारसा ठरेल. स्वातंत्र्यलढा ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्याही पुढे अनेक सामाजिक चळवळीत हौसाक्का पाटील यांनी कन्या म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे सिध्द केला. क्रांतिसिंहांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तितक्याच आक्रमकतेने ब्रिटिशांना भंडावून सोडले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या वाटचालीतही त्यांनी पुरोगामी विचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी बाणेदारपणे आवाज उठवला. प्रसंगी संघर्षही केला.
यावेळी विशाल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव माकणे, राष्ट्रीय खेळाडू शिवकुमार सोनटक्के, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे, पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, रोटरी क्लब चे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, मारुती सुर्यवंशी, लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, संभाजी सोनटक्के, विजयकुमार होळदांडगे, दक्षता कमिटीच्या सदस्य मीनाताई कांबळे, तानाजी कदम, चेतन होळदांडगे, सुमीत सोनटक्के, कपिल आलमाजी, युसूफ तांबोळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.