27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeजनसंपर्क*होय,खरंच आपल्याला आपलीच लाज वाटेल!*

*होय,खरंच आपल्याला आपलीच लाज वाटेल!*

मुंबई,:-(राजा माने) आपल्या जीवनातील छोट्या छोट्या अडचणींचे टेन्शन घेणे,जगात माझेच दुःख इतरांच्या दु:खापेक्षा मोठे आणि तीव्र आहे असा भाऊ करणे, छोट्या आजारेनेही आत्मविश्वास हरवून बसणे, नियतीने लादलेल्या दुर्दैवी संकटांमुळे हदरुन जावून जीवनच संपवून टाकावे वाटणे आणि अशाच असंख्य मुद्द्यांना कुरवाळत जीवनातील खरे समाधान व यश गमावून बसणे,हा तुमचा-माझा स्थायीभाव बनला आहे.

पण आपल्या अवती-भवतीच अशाही व्यक्ती आहेत,की ज्यांना भेटले की त्यांच्या जीवनाकडे पाहिले की आपला स्वभाव आणि मानसिकतेबद्दल आपलीच आपल्याला लाज वाटल्याशिवाय राहत नाही. काल तोच अनुभव मी सोलापुरात घेतला!

एक चुणचुणीत चेहऱ्याचा स्मार्ट तरुण..पण खांद्यापासून खालच्या शरीराच्या संवेदना नाहीत.. हातपाय आणि हालचाल करण्याचा विषयच नाही.. फक्त डोक्याच्या संवेदना शाबूत.. नियतीने मांडलेल्या या क्रुर खेळावर मात करायची कशी आणि जगायचे कसे? ..

त्याने नियतीलाच आव्हान देण्याचा निर्धार केला… अंथरुणावर खिळून राहण्यापली कडे त्याच्या निर्जीव हाती काही उरलेच नव्हते… फक्त डोके, बुद्धी आणि तोंड हेच त्यांचे शरीर आणि शक्ती! त्याच शक्तीने त्याने नियतीने मांडलेल्या खेळ उधळून लावायचे ठरविले.. देवाच्या रुपातील आपल्या आई-वडिलांच्या मदतीने त्यांने अंधरुणातच आपल्या समोर संगणक लटकावला आणि तोंडीत एक छडी घेवून संगणक हाताळू (तोंडाळूच म्हणावे लागेल) लागला..

एक नवा इतिहास घडविण्याच्या जिद्दीने तो झपाटला..पाहता पाहता त्याने अनेक ॲप्स बनविले.. तरुणाईला नवी जिद्द देणारे मोटिवेशनल व्हिडिओ तो बनवू लागला. तब्बल साडेनऊ वर्षापासून अंथरुणावर खिळून ही नियतीच्या विरुद्ध चाललेली ही लढाई तो दररोज जिंकत आहे.. त्या तरुणाचे नाव आहे.. डॉ.ज्ञानराज शैलजा राजकुमार होमकर!

मेडिकल दकान चालविणाऱ्या मध्यमवर्गीय राजकुमार व शैलजा होमकर यांचा हा कर्तबगार मुलगा! बी.ए.एम.एस.च्या शेवटच्या वर्षी पुण्यात महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात रोप डान्स करीत असताना दोरीवरुन निसटला आणि कोसळून हनुवटीवर आदळला! त्याची मान निखळली आणि दोन मणकेही निकामी झाले. १ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या या अपघाताने त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले.खांद्याखालील पूर्ण शरीर संवेदनाहीन झाले. पॅरालिसिसचाच एक प्रकार असलेला क्वाड्रिप्लेजिया नावाचा आजही वैद्यकीय क्षेत्राला उपचार न सापडलेला विकार जडला.

माझ्या ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकातील तोही एक नायक आहे. त्याच्या अपघाताच्या पहिल्या दिवसापासून आई_ वडील, भाऊ शैराज, वहिनी ईश्वरी आणि बहीण राही यांनी उपचार आणि त्याच्या सेवेसाठी सतत प्रयत्न चालू ठेवले आहेत. पुस्तकात ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्याच्या व्यक्तिचित्राची फ्रेम व पुस्तक मी काल त्याच्या बाळीवेस येथील घरी जाऊन माझे बालमित्र निवृत्त पर्यवेक्षक शिवराम सोनवणे यांचा हस्ते त्याला भेट दिले. यावेळी जेष्ठ पत्रकार शिवाजी भोसले आणि त्याचे आई-वडीलही सोबत होते

साडेनऊ वर्षानंतरही नवे काही घडविण्याची त्याची जिद्द आणि आत्मविश्वास पाहून मी थक्क झालो! छोट्या-मोठ्या संकटाकडे पाहून लढाईतून पळ काढणाऱ्या मनोवृत्तीला छेद देवून नवी प्रेरणा डॉ.ज्ञानराज होमकर यांची वाटचाल देते आहे. शेवटी आपल्या मानसिकतेचा विचार करु जाता डॉक्टर ज्ञानराज कडे पाहिले की आपली आपल्याला लाज वाटते..खरं आहे ना?

राजा माने,,
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ, अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]