लेखमाला : भाग -५
आषाढी एकादशीच्या दिवशी ख-या अर्थाने आमच्या वारीची दिल्लीमध्ये सांगता झाली.आजची ही देवशयनी एकादशीही म्हटली जाते.देव जातात झोपी म्हणून भक्ताला झोपी जाऊन,देवाला विसरून कसं चालेल!त्यामुळे वारी चालून आलेल्या भक्ताचे एकच मागणे असावे,ते म्हणजे 'हेची दान देगा देवा,तुझा विसर न व्हावा'!
सर्व त-हेचे कष्ट सोसत आळंदी ते पंढरपूर अंतर आठ दिवसांमध्ये कापून आम्ही दिल्लीकर जातो खरे पण जेव्हा पंढरीरायाच्या चरणी माथा टेकवला जातो तेव्हा लाभणारा आनंद वर्णन न करता येणारा असतो.हा आनंद कोरोना काळात घेता येत नसल्याने आम्ही आषाढी एकादशीला दिल्लीत सांकेतिक वारीची सुरूवात केली.या सांकेतिक वारीने यावर्षी मोठे रूप घेतले.
पहिल्या वेळेस पाच-सात जणांनी सुरूवात केली आणि ती उपस्थिती यावेळेस पाच-सातशे जणांपर्यंत जाऊन पोहोचली.दिल्लीत मोठमोठी उद्याने आहेत,त्यामुळे सकाळ संध्याकाळ चालायला (जाॅगिंगला)जाणा-यांची संख्या मोठी असते.पण ते चालणे म्हणजे वारी नाही ना!

आपण पायाने नुसतेच चालतो तेव्हा तो एक ‘प्रवास’ होतो,त्या चालण्यात हृदय ओतले की तेच चालणे ‘यात्रा’ बनते पण जेव्हा आपण आपले
भान हरपून चालतो तेव्हा ती ‘वारी’ बनते.तर आज भक्तीभावाने ओतप्रोत दिल्लीकर भान हरपून चालले.कॅनाॅट प्लेस भागातील बाबा खडकसिंह मार्गावर पुरातन हनुमान मंदीर आहे.तिथून पहाटेच एकेकजण चालत निघाले आणि मग ‘कारवाँ बनता गया’

रामकृष्ण पुरम भागातील विठ्ठल मंदिर तसे आडवळणावरचे पण तीच आज दिल्लीकरांसाठी पंढरी बनली.या मंदिराशी नित्य संलग्न असलेल्या नाईक पती-पत्नी तसेच चव्हाण पती-पत्नींना आजची ही भक्तांची मांदियाळी खूप सुखावून गेली.या निमित्ताने ज्यांनी यावर्षी आळंदी-पंढरपूर वारी पूर्ण केली ते पुन्हा जमले व एकाअर्थी या सर्वांचे गेटटुगेदरच झाले.या विठ्ठल मंदिरात आजूबाजूला राहणा-या विशेषतः अमराठी भक्तांचे दर्शनास येणे होते परंतू मराठी माणसांचा मेळा मोठ्या संख्येने आज जमला.वस्तुतः प्रत्येक एकादशीला सोयीच्या वेळेस पण नेमाने येथे हा मेळा भरायला हवा.म्हणूनच 'तुझा विसर न व्हावा हे विठुमाऊलीच्या चरणी मागणे!
समाप्त

लेखन : गणेश रामदासी
माहिती संचालक