जागतिक वारसा सप्ताहानिमित्त
विशेष लेखमाला (भाग-5)
आपण मागच्या लेखात शिलालेख आणि ताम्रपटाच्या उल्लेखासह माहिती दिली होती.या लेखात त्याबाबत लातूर जिल्ह्यातील काही गावांचा इतिहास वारसा बघू या…मध्य काळातील ग्रामनामांचे संदर्भ आजही उपलब्ध होतात. जलग्राम म्हणजे जवळगा, मुगुली म्हणजे आजची कलमुगली आहे. बाराशे-तेराशे वर्षापूर्वी तेरणा-मांजरा दरम्यानच्या या परिसरात वेदाध्ययन होत होते.
तिसरा कासारशिरसी ताम्रपट डॉ. देवीसिंग चौहान यांना प्राप्त झाला. याचा काळ शक ७०५ (इ.स.७८३) असा आहे. यात या परिसरासंदर्भात अधिक वृत्तांत नाही. पण या तीन ताम्रपटांमुळे या परिसराची जिल्ह्याची वैदिक परंपरा नव्याने प्राप्त होते.
बाराव्या-तेराव्या शतकातील ‘नवोपलब्ध कल्पसमूह” या ग्रंथात खरोसा या नगरीचा संदर्भ वैद्यकशास्त्रातील रसविद्येशी जोडता येतो.
चौथा संदर्भ गणेशवाडी शिलालेखाचा आहे. गणेशवाडी हे गाव नसून हिप्पळगावचा परिसर आहे. जवळच नळेगाव असून तेथेच शिवपूर (प्राचीन सिंदाळे) आहे. येथील भग्नमंदिरात एक अप्रकाशित कानडी लेख आहे. हा शिलालेख ५२ ओळींचा संस्कृत भाषेत असून याचा काळ शक १०२१ (इ.स. १०९९) असा आहे. हाही परिसर प्राचीनता दर्शविणारा आहे.
चालुक्य नृपती विक्रमादित्याने पिप्पलग्राम – हिप्पळगाव येथे भीमसमुद्र नामक तलाव निर्माण केला. या परिसरात वेद-वेदागाच्या अध्ययनासाठी अध्ययन केंद्र स्थापले. सोबत देवालय आणि पाठशाला स्थापन केली. येथे शिवलिंगी परंपरा सुरू करून लाकुलीश्वर आगमाचा अभ्यासही सुरू केला. या अध्ययन केंद्राच्या अधिपती / कुलपतीस राहण्यासाठी सुंदर सदन बांधून दिले. सर्व छात्रांची भोजन-निवासाची सोय केली. या लेखातील काही ग्रामनामे आजही उपलब्ध आहेत. पिपलग्राम म्हणजे आजचे हिप्पळगाव (ता. निलंगा). कानडीमध्ये ‘ह’ चा उच्चार ‘प’ असा होतो. यावरून पिप्पलगावचे हिप्पळगाव झाले. हे ठिकाण लातूरपासून २० कि.मी. वर एवढ्या अंतरावर आहे. इथे आजही या भव्य वारसाच्या खुणा पाहता येतात. यातील शिलाकरग्राम म्हणजे आजचे सलगरा आहे. शुष्कग्राम म्हणजे आजचे सुगाव आहे. या ‘सुगाव’ येथे अलीकडील कालविरहीत मराठी भाषेतील लेख प्राप्त झाला आहे.
पाचवा संदर्भही या परिसरातला असून हा शिलालेख ६४ ओळींचा असून त्यात विविध वृत्तांत वर्णिले आहेत . याचा काळ वरीलप्रमाणे शक १०२१ (इ.स. १०९९) असा आहे. या लेखाचा प्रारंभ ‘ओनमः’ असून ‘शुभम्’ असा अंतिम संदर्भ आहे. ‘
भीमनाथ प्रशस्ती’ असा मूलतः संदर्भ असला, तरी यात भीमसेनापती, भीमचमूपती अशी प्रशस्तीसाठी विविधता दर्शविली आहे. शिवलिंगी संतान परंपरा वा शासन असाही संदर्भ आहे. येथे अध्यापक म्हणून गुणरत्ननिधि, ज्ञानसरोवर अशा गुणीजनांची नेमणूक होती. ही सर्व मंडळी अध्ययन-अध्यापनात पारंगत असून केवळ अध्ययन हाच विचार येथे चालत असे. चालुक्य नृपतींचा आदेश पालन करून हे गुरुजन अध्ययनकेंद्र चालवत असत. यातील मेघंकर म्हणजे मेहेकर असा संदर्भ डॉ. कोलते देतात आणि ते स्थान विदर्भातील ठरवितात. पण ते स्थान कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील ‘मेहेकर’ नामक गाव असून तेही पौराणिक आहे.
सहावा संदर्भही गणेशवाडी येथील लेखाचा आहे. या लेखातून शिवलिंगी संतान परंपरा आणि तेथील आचार्य मंडळींची विद्वता दिसून येते, या परिसरात यम, नियम, स्वाध्याय, ध्यान, धारणा, जप, समाधी आणि षड्गोपहर यांना अधिक महत्त्व होते. कारण यातून विशुध्द कीर्तीचा, निष्कलंक चारित्र्याचा सहवास सर्वांना लाभत असे. येथे शिवलिंगी संतानरुपी परंपरेबरोबर काश्मिरी शैव परंपरा अभ्यासली जात असे. पर्वतावली परंपरा, शिवलिंगी संतान परंपरा व लाकुलागम परंपरांचा अभ्यास होत असे. यावरून हा परिसर मागील पंधराशे – सोळाशे वर्षांपासून ज्ञानपरंपराधिष्ठित आहे. केवळ ज्ञानासाठी अध्ययन आणि अध्यापन चालत असे. अहमदपूर (राजूर), चाकूर, नळेगाव, शिवपूर, खरोसा, किल्लारी, औसा, मूळज हा परिसरही प्राचीन आहे. चाकूरचे नवे क्षेत्र आजचे भूषण आणि मागील परंपरेचा आदर्श ठरते.
(क्रमशः)
– युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर