विशेष लेख
– प्रा. डॉ. रमेश जोशी
समाज माध्यमावर या विषयी एक संदेश फिरत आहे. त्याचा सारांश असा :- “हिंदूराष्ट्र निर्माण होण्यासाठी प्राचीन काळातील सती प्रथा, अस्पृश्यता केवळ ब्राम्हणांनाच वेदाधिकार, घुंगट, स्त्रियांनी घरातच राहणे, सामाजिक जीवन निषिद्ध, चातुर्वर्ण्य, विदेश प्रवास बंदी इ.” यांचे पुनरुज्जीवन करावे लागेल.
यात कांहीही तथ्य नांही, ‘ हिंदूराष्ट्र’ या संकल्पनेविषयीच्या घोर अज्ञानातुन असा गैरसमज निर्माण झाला आहे अथवा हिंदुराष्ट्राविषयी आग्रही असणाऱ्यांविषयीच्या पूर्वग्रहदूषितपणातुन असे दुष्प्रसारण होत असावे.
हिंदूराष्ट्र संकल्पना समजून घेण्या करिता देश, राज्य व राष्ट्र ह्या तीन संकल्पनांमधील संभ्रम दूर होवून समज नि:संदिग्धपणे स्पष्ट होणे अवश्यक आहे. १) देश : म्हणजे विशिष्ट भौगोलिक चतु:सीमेतील भूप्रदेश. अशा भूप्रदेशातील सर्व भौगोलिक बाबी : नद्या, पर्वत, जंगल, वास्तू इ. २)राज्य : कोणत्याही देशातील समाजाने समाजाचे व्यवस्थीत संचालन, नियंत्रण सुरळीत राहण्यासाठी निर्मिलेली शासन व्यवस्था म्हणजे राज्य. संसद, विधानसभा, राष्ट्रपतीभवन, संविधान, न्यायालये, आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस दल, शासकीय-निमशासकीय, अशासकीय संस्था व संघटना इत्यादी ‘राज्य’ संकल्पनेत समाविष्ट होतात. ३)राष्ट्र : समान जीवनमूल्ये, समान पूर्वज, समान इतिहास, समान मानबिंदू विषयीची समान निष्ठा, इतिहासातील गौरवशाली घटना विषयीचा समान स्वाभिमान व इतिहासातील क्लेशदायक घटनांविषयीच्या समान जखमा व समान संवेदना, तसेच भविष्य काळाविषयीची समान भव्योदात्त आकांक्षा असलेला समाज किंवा ‘जन’ म्हणजे ‘राष्ट्र’ होय.
देश व राज्य ह्या संकल्पचना कालानुरुप परिवर्तनीय म्हणजेच अशाश्वत आहेत. देशाच्या सीमा व देशातील ऐहिक भौगोलिक स्थिती बदलत असते. राज्यांच्या शासन व्यवस्थाही संविधानासहित काल परत्वे बदलत असतात. आपल्याही देशाच्या सीमा व राज्याच्या शासन व्यवस्थेत कालोघामध्ये बदल होत आले आहेत, म्हणजे देश [Country] व राज्य [State] ह्या संकल्पना परिवर्तनीय, अशाश्वत आहेत. परंतु ‘राष्ट्र’ [Nation] ही संकल्पना शाश्वत [ Eternal ] असते. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, कर्नाटक इ. ही राज्ये नांहीत तर प्रांत [Provinces] आहेत. राज्य व्यवस्थेसाठी, व्यवस्थांच्या सोयीसाठी वेगळे मानलेले प्रांत आहेत. भारत एक राज्य आहे व या राज्यातील ‘राष्ट्र’ व्याख्येत बसणारा समाज हा ‘राष्ट्र’ आहे. (म्हणून त्यासाठी ‘राज्यघटना’ म्हणतात. ‘राष्ट्रघटना’ म्हणत नांहीत.)

भारताला ‘हिंदू राष्ट्र’ बनविण्याची गरज नांही तर भारत हे अनादिकाला पासून हिंदूराष्ट्रच आहे, केवळ ह्या विश्वातील श्रेष्ठतम हिंदू राष्ट्राची या मधील व वैश्विक समाजाला अनुभूती येण्या साठीचे प्रयास होणे गरजेचे आहे. या लेखारंभीच उधृत केलेल्या राष्ट्र संकल्पनेच्या व्याख्येच्या चौकटीत येथील कोणता समाज बसतो ? अनादी काळापासूनचे समान पूर्वज, समान जीवनमूल्ये, समान मानबिंदू, समान संस्कृती……….. तर हिंदू समाजच या व्याख्येत बसतो, म्हणून हा समाज येथील पुत्ररुप समाज म्हणजेच राष्ट्रीय समाज आहे व ह्या समाजाचे हे अनादि व अनंत असे ‘ हिंदू राष्ट्र’ आहे.

उपासना पद्धती भिन्न असु शकतात, प्राचीन काळापासून समान पूर्वजांची समान जीवनमूल्ये आहेतच, ह्या समान जीवनमूल्यांवर व राष्ट्रीय मान बिंदूवर ज्यांची निष्ठा असुन ती वर्तनातुन अविष्कृत होते असे भिन्न उपासना पध्दतीचे लोकही हिंदुराष्ट्राचेच अंगभूत घटक आहेत. हिंदुराष्ट्रातील जीवन मूल्यांमध्ये तर ‘ माता भूमि: पुत्रोहम् पृथिव्याम्’ – ‘ वसुधैव कुटुंबकम्’ – “वसुंधरा हे कुटुंब अवघे भारतभूचे विशाल चिंतन.
हिंदू जीवनदर्शन साऱ्या मानवतेला करील पावन”——– हे जीवनदर्शन मानणारे ’जन’ म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. हे बनविण्याची कल्पना नांही तर हे ऐतिहासिक चिरंतन मूल्य वज्रलेप झालेले तथ्य आहे. ते बदलता येत नांही नव्याने बनविण्याची गरज नांही, फक्त या अनुभूतीचे संक्रमण जनमानसात करण्याचे प्रयास चालू आहेत.
अर्थात सती प्रथा, अस्पृश्यता, जातीप्रथा ह्यांना हिंदूराष्ट्रात अजिबात स्थान नांही, आपल्या समाजातील आत्मविस्मृती मुळे कालोघात निर्माण झालेल्या ह्या विकृती आहेत, आता त्या कालबाह्य झाल्यामुळे व अनिष्ट असल्यामुळे यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रश्नच नांही. चालीरिती, प्रथा, परंपरा, बाह्यवर्तन पध्दती ह्या वेग-वेगळ्या कालखंडात वेग-वेगळ्या असतात, त्यांना हिंदूराष्ट्राचे उपांग मानणे हे घोर अज्ञान आहे, हेच आपल्याला दूर करून अनादि–अनंत हिंदू राष्ट्रीयत्वाचा आत्मबोध जनमानसात निर्माण करावयाचा आहे.

लेखन : प्रा.रमेश जोशी
( लेखक हे लातूरातील सेवानिवृत्त प्राध्यापक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते आहेत )