‘हर घर तिरंगा’ अभियानात 13 ते 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकांनी आपल्या घरावर तिरंगा लावावा – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानातही सहभागी होण्याचे आवाहन
लातूर, दि. 7 ( वृत्तसेवा ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा अमृत सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. यामध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असून आपल्या घरावर तिरंगा लावून यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी केले आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि लातूर जिल्हा परिषद कार्यालय परिसरात राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभाग नोंदविताना आपल्या कुटुंबातील महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्ह्यात तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयासह प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागरिकांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात सहभागी व्हावे !
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची समारोपानिमित्त अमृत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात प्रामुख्याने ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविले जाणार आहे. गावागावातून 9 ऑगस्टला प्रभात फेरी काडून तांब्याच्या कलशामध्ये माती संकलन केले जाणार आहे. आपल्या गावची ही माती तालुका, जिल्हा आणि दिल्लीत जाणार आहे. या मातीतून अमृत रोपवाटिका आणि अमृत वन निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी या अभियानात लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.