दिन विशेष
उस्मानाबादवर ‘विशेष प्रेम’करणारे पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय अर्थ, ग्रह, संरक्षण मंत्री स्व. शंकररावजी चव्हाण यांना जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन !
उस्मानाबाद – लातूर जिल्हा एकत्र असताना ‘उस्मानाबाद’वर विशेष प्रेम करणारे कि ज्याच्यांमुळे ‘सेंट्रल बिल्डिंग, स्टेडियम, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय मंजूर झाले व निधी मिळून कामे प्रत्यक्षात आली.
उल्लेखनीय गोष्ट अशी की ‘ लोअर तेरणा पाटबंधारे प्रकल्प'( माकणी) होऊ नये असा शेवट पर्यत प्रयत्न करणारे स्व. शंकरराव चव्हाण एकमेव ‘राज्य नेते ‘ होते.
त्याचे कारणही हा प्रकल्प ‘ तांत्रिकदृष्ट्या’ उस्मानाबाद जिल्ह्याचे फायद्याचा नव्हता ( आजही नाही).
या प्रकल्पासाठी ‘ शेकडो एकर कसदार जमीन’ उमरगा तालुक्यातील गेली. त्या तुलनेत ‘ फायदा’ मात्र निलंगा तालुक्यात झाला. या मोठ्या ‘प्रकल्पा’ ऐवजी ‘ तेरणा नदीवर’ पाच ते सात ‘ कोल्हापूर बंधारे’ ( गेल्या २०-२५ वर्षात आपण पाहतो ‘तसे के.टी.वेअर ‘ नव्हे तर ‘ गिरकसाळ ता.निलंगा येथे जसा मोठा बंधारा आहे ) करून जमीन सिंचनाची ‘व्यवस्था’ करावी जेणे करून ५०,६० फुट ‘पाया’ न लागणारी माकणी- सास्तूर व परिसरातील जमिन ‘बुडीत क्षेत्रात’ क्षेत्रात जाणार नाही. ‘पाच-सात’ कोल्हापूर बंधाऱ्या मुळे या जमिनी ला पाणी मिळेल व उमरगा – लोहारा- निलंगा तालुक्यातील शेतकरी ‘ आर्थिकदृष्ट्या संपन्न’ होईल. असे स्व. शंकरराव चव्हाण व पाटबंधारे खात्यातील ‘ वरिष्ठ अभियंते’ यांचे म्हणणे होते. पण.. स्व. निलंगेकर साहेब माकणी धरणासाठी आग्रही होते ( आपल्या मतदारसंघातील गावासाठी ही भूमिका रास्त म्हणायला हवी)
मी तेव्हा नुकताच पत्रकारितेत ‘स्थिरावलो’ होतो. त्याकाळात हा ‘वाद’ बरीच वर्षे चालू होता. तेव्हा राज्याचे पाटबंधारे खाते कधी ‘ शिवाजीराव निलंगेकरा कडे तर कधी शंकरराव चव्हाणा कडे ‘ जाई. त्यानुसार ‘माकणी’ प्रकल्पा चे ‘ नियोजन’ होत राही.
परिसरातील शेतकऱ्यांनी धरण विरोधी मोठे आंदोलन ही उभारले होते. काही आंदोलक महिना -महिना ‘तुरुंगात ‘ ( कारागृहात) डांबले गेले. शंभर – दिडशे शेतकर्यांवर ‘खटले’ भरले होते.
पण या शेतकऱ्यांचे ‘दुर्दैवाने’ शिवाजीराव निलंगेकर साहेब मुख्यमंत्री झाले . त्यांनी ‘ केंद्र सरकार कडून ‘ माकणी धरणा’ ला ‘मंजुरी’ आणली व कामाचे भूमिपूजन व प्रारंभ ही ‘निलंगेकर साहेबां’चे शुभहस्तेच झाला. ‘ निधी’ ची कमतरता नव्हतीच. या भूमीपूजन कार्यक्रमा वेळी ‘सहा ठिकाणी हेलिपॅड’ बांधण्यात आले होते.
या समारंभात ‘माकणी धरण विरोधी’ क्रती समितीचे अध्यक्षांनी ( ते भातागळी चे सरपंच) निलंगेकर साहेबांना ‘ जाहिरपणे दंडवत ‘ घालून शेतकऱ्यांच्या विरोधातील ‘खटले ‘ सरकारने काढून घ्यावेत अशी विनंती केली होती पण..साहेबां’नी ही ‘ जाहिरपणे’ काढून घेणार नाही असेच ठामपणे ‘सुनावले’ होते.
शेवटी शरदचंद्र पवार मुख्यमंत्री झाल्यावर पाटबंधारे मंत्री डॉ. पद्मसिंहजी पाटील यांचे पुढाकाराने ‘माकणी धरण विरोधी क्रती समिती’ चे विरोधातील खटले राज्य सरकारने ‘काढून ‘ घेतले.
..
( ता.क.— आज माजी मुख्यमंत्री स्व. शंकररावजी चव्हाण यांचे जयंतीनिमित्ताने त्यांना ‘अभिवादन’करताना पुणे – उस्मानाबाद प्रवासात निवांत वेळी जून्या ‘आठवणी’ जाग्रत झाल्यामुळे ‘हा लेखन प्रपंच’!
बाकी कसलाही हेतू नाही. कोणाचा विरोध अथवा बाजू घेणे नाही/ उपमर्द नाही. हे सर्वानी लक्षात घ्यावे ही कळकळीची विनंती !
दिलीप पाठक नारीकर
जेष्ठ पत्रकार, उस्मानाबाद ता. १४जुलै २०२२