स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे उदगीर येथे अनावरण
लातूर, दि. 6 ( वृत्तसेवा): क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्यावतीने उदगीर येथे 8 ते 12 मार्च 2024 दरम्यान स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या बोधचिन्हाचे आज उदगीर शासकीय विश्रामगृह येथे अनावरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच उदगीर येथे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, क्रीडा व युवक संचालक युवराज नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष सुधीर भोसले उपस्थित होते.
महाराष्ट्रात कुस्ती क्रीडा प्रकारचे वेगळे आकर्षण आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमुळे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींना नवी प्रेरणा मिळेल. तसेच या जिल्ह्यात खाशाबा जाधव यांच्यासारखे कुस्तीपटू घडण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राज्यातील 360 खेळाडू व संघ व्यवस्थापक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी या स्पर्धेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.