26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अमृत सप्ताह*

*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अमृत सप्ताह*

*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अमृत सप्ताह*

*जिल्हाधिकारी यांनी डोईवर घेतला कलश… प्रभात फेरीत घेतला सक्रिय सहभाग…!!*

लातूर दि. 9 ( वृत्तसेवा) : सकाळी दहाच्या दरम्यानची वेळ… जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत प्रभात फेरी निघत होत्या…मात्र लातूर शहराच्याजवळ शामनगर हे गाव मोठ्या उत्साहात होतं, हातात तिरंगी झेंडे घेऊन शाळेचे विद्यार्थी, महिला, बी.एस.एफ चे जवान उत्साहात उभे होते.. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचे आगमन झाले. लागलीच प्रभात फेरीला सुरूवात झाली, गावातल्या शेतातली माती प्रत्येक जण कलशात टाकत होता… जिल्हाधिकारी पुढे आल्या चुंबळीसह कलश त्यांनी आपल्या डोक्यावर घेतला… लोकांच्या टाळ्या झाल्या, लेझिम खेळणाऱ्या विद्यार्थिनींचा जोश अजून वाढला…प्रभात फेरीत महिलांची संख्या लक्षणीय वाढली…!!

कलश घेऊन प्रभात फेरी गावाला लागून असलेल्या अमृत रोपवाटिकेत गेली. तिथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपलं सर्वस्व स्वातंत्र्य संग्रामात पणाला लावले त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून एक शिला फलक बसविण्यात आला, त्याचे लोकार्पण झाले. त्यानंतर अमृत रोपाटिकेमध्ये मान्यवरांच्या हस्ते देशी बियाचे रोपण करण्यात आले. 75 देशी वृक्षाच्या रोपट्याची लागवड करण्यात आली ते अमृत वन म्हणून ओळखले जाणार आहे.

अमृत वनाला लागून सेल्फी पॉईंट काढण्यात आला होता. तिथे मान्यवरांसह सर्वांनी हातात माती घेऊन कलशात अर्पण करताना सेल्फी काढली. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणानी परिसर राष्ट्र भक्तीच्या वातावरणाने चैतन्यदायी झाला होता.

आपल्या मराठीत ‘मातीची नाळ कधीही तुटत नाही’ असं अत्यंत गौरवास्पद म्हटलं जातं.. ते किती खरं आहे. सृजन करणारी माती आपल्या परंपरेत अत्यंत श्रद्धेच स्थान घेऊन आहे. म्हणून आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता करताना आपल्या गाव शिवारातली माती देशाच्या राजधानीपर्यंत पाठवणार आहोत. तिथे या मातीतून अमृत वन, अमृत वाटिका निर्माण होईल. अशाच अमृत वाटिका, अमृत वन जिल्ह्यातल्या अनेक गावात, तालुक्यात आणि जिल्हाच्या ठिकाणी होणार आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. त्याची ही चिरंतन आठवण पुढच्या पिढीला स्वातंत्र्याचं मोल सांगेल, अशा भावना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी व्यक्त केल्या. 13, 14 आणि 15 ऑगस्ट दिवशी तुमच्या घरावर तुमच्या घरच्या स्त्रीच्या हस्ते मग ती बायको, बहीण, आई, मुलगी कोणी आपला राष्ट्रध्वज लावा, असे आवाहन पुरुषांना उद्देशून जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता होत असताना प्रत्येक नागरिक आत्मनिर्भर व्हावे, जेणेकरून त्यातून देशही आत्मनिर्भर होईल, हा आत्मनिर्भरतेचा मंत्र सांगितला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनीही इथल्या मातीला नमन करून आपण आपल्या देशाचा अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ विविध कार्यक्रमानी साजरा करणार आहोत. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. 

यावेळी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चाटे, बी. एस. एफ.चे डिप्टी कमांडर सुधीर वाघचौरे, गट विकास अधिकारी तुकाराम भालके, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांनी केले. तर आभार गावचे माजी सरपंच व्यंकट पन्हाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]