29 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeदिन विशेषस्मरण तुझे देवा

स्मरण तुझे देवा


03 जूनचा सुर्यकिरण पहायला नको वाटते


जुन महिना आला की प्रत्येकाच्या अंगावर शहारे फुटतात. मन सुन्न होतं. वर्षानुवर्षाचा ऋणानुबंध ज्या नेतृत्वाशी जोडलेला होता ते लाडकं नेतृत्व आणि 03 जुन 2014 रोजी प्रात:काळी आलेली बातमी. प्रत्येकाच्या जीवनात काळी रात्र ठरावी अशी ठरली. स्व.गोपीनाथराव मुंडे यांचं पुण्यस्मरण होताना तो दिवस अर्थात 03 जुन ज्याचा सुर्य पहायला नको वाटते. कारण साहेबांच्या जाण्याने प्रत्येक अनुयायाच्या जीवनात दिवसाचा अंध:कार पसरला गेला. केवळ बीड जिल्ह्यातील नव्हे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील कार्यकर्ता, मित्र परिवार, हितचिंतकांना साहेबांच्या नेतृत्वाचं वेड होतं. अनादिकाळ वर्षे ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं ज्यांना गोपीनाथरावांच्या आयुष्याचा भाग होता आले. अशांच्या जीवनात रक्ताच्या नात्यापलीकडे असलेल्या आठवणी उजळुन आल्याशिवाय रहात नाहीत. लोहचुंबकासारखं नेतृत्व असल्याने 03 जुनची पहाट प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय रहात नाही. साहेबांना जावुन बघता बघता आठ वर्षाचा कालावधी लोटत आला तरीही आजही त्यांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा गुलाबाची बाग फुलावी अशा मनामनात फुलल्या जातात. वर्तमान देश आणि राज्याच्या राजकारणात त्यांचं असणं किती महत्वाचं होत?अनेक प्रसंगावरून लक्षात येतं. नव्या पिढीला एक मुत्सद्दी राजकारणी, धाडसी नेता, गोरगरिबांचा कैवारी, अठरापगड जातीधर्माचा रक्षणकर्ता, छत्रपती शिवाजी महाराज ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घालुन दिलेल्या आदर्श विचाराची शिदोरी घेवुन पुढे जाणारा नेता त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व मागे वळुन पाहताना पेनातली शाई संपेल पण आयुष्याची गाथा संपु शकत नाही हे तितकंच खरं. 03 जुनच्या निमित्ताने स्मरण तुझे देवा, करितो आम्ही यापेक्षा वेगळं काहीच आपण करू शकत नाही.


साहेबांना मानणार्‍या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक नुकसान आजच्या दिवशी झालं कशानेही भरून येवु शकत नाही. 03 जुन पुण्यस्मरण सोहळा गोपीनाथगडावर पार पडतो. त्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन विविध जातीधर्माचे अनुयायी येतात. स्वत: पंकजाताई आणि प्रितमताई एवढेच नव्हे तर सर्व कुटुंबियांची उपस्थिती गड स्थळावर असते. आजचा दिवस स्मरण या दृष्टीने पाहिला तर अगणिक लोक आणि कार्यकर्ते असे आहेत ज्यांच्या जीवनात मुंडे साहेबांचा आविभाज्य आधार होता. मागे वळुन पाहताना राज्याच्या राजकारणात 30-35 वर्षे साहेबांनी काम केलं. पण त्यांना दुरदृष्टी गरिबांचे कल्याण करण्याची होती. सत्तापेक्षा विरोधी पक्ष काळ जास्तीचा मिळाला. पण कल्याणाचा मार्ग कधीच सोडला नाही. अठरापगड जातीधर्माच्या कल्याणासाठी त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वंचित, उपेक्षित,दीनदलित, शेतकरी, कष्टकरी, मजुर यांच्या हितासाठी संपुर्ण आयुष्य जमिनीवर या नेत्यांनी घातलं. राजकारणात संघर्ष कसा करावा?सत्ताधार्‍यांच्या विरोधात लढा कसा द्यावा? शेतकरी, कष्टकरी यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडुन कसे सोडवावेत? याचे धडे गोपीनाथ मुंडे नावाचं पुस्तक चाळुन पाहिलं की सहज आदर्श घेण्यासारखे वाचायला मिळतात. सकारात्मक राजकारण लोककल्याणाचं असतं. ही शिकवण त्यांनी तत्कालीन काळातच राजकिय वर्तुळात काम करणार्‍यांना दिली. त्याची उणिव आज भासत असली तरीही ऐंशी टक्के समाजकारण केवळ 20 टक्के राजकारण निवडणुका संपल्या विरोध संपला ही भुमिका आणि आदर्श मुंडे साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कर्तृत्वातुन दाखवुन दिली. एक दिवस हा नेता मुख्यमंत्री होईल असं स्वप्न जनतेचं होतं. तो काळ तोंडावर येवुन ठेपला होता. पण नियतीने अनेकांचे स्वप्न हिरावुन घेतलं. गोपीनाथराव हे पुस्तक वाचताना राज्याच्या राजकारणात भांडवलशाही प्रस्थापित पुढार्‍यांच्या विरोधात त्यांनी केलेला संघर्ष आजच्या नव्या पिढीतल्या युवा राजकारण्यांसाठी महत्वाचा वाटतो. शरदचंद्रजी पवार यांच्यासारख्या प्रस्थापित पुढार्‍यांच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. तो काळ अजुनही आठवतो. 90-92 च्या दरम्यान काढलेली संघर्षयात्रा त्यानंतरही 95 च्या अगोदर काढलेली संघर्षयात्रा दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या विरोधात उभा केलेला लढा असेल किंवा एन्रॉनच्या विरोधात पेटवलेले रान असेल. आज देशात काश्मिरमधील 370 कलम केंद्र सरकारने हटवलं, राम जन्मभुमीचा प्रश्न निकाली निघाला, यासाठी गोपीनाथराव मुंडेंनी अंगावर काठ्या घेत जेल भोगली. मराठवाडा नामांतराचा प्रश्न असेल किंवा इतर चळवळी असतील यात त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पुर्ण होत नाही. पक्षाची पताका खांद्यावर घेवुन जो पक्ष भटा-बामणाचा म्हणुन भाजपाला हिणवल्या जात असे त्या पक्षाची ओळख मुंडे साहेबामुळे बहुजनांचा पक्ष आणि शहरापेक्षा ग्रामीण भागात तांडे, वस्ती, झोपड्या, खेडी इथपर्यंत जावुन पोहोचला हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. त्यांचा स्वभाव मुळात सामाजिक दायित्वाचा खुप होता. ऊस तोड कामगारांच्या प्रश्नासाठी अनेकदा रस्यावर उतरून आंदोलने केली. एकदा वेळ अशी आली उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची महत्वाची का? ऊसतोड कामगारांचा प्रश्न महत्वाचा? पण बहादर नेत्याने सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून ऊसतोड कामगारांच्या सोबत राहण्याची भुमिका घेतली. तडजोडीचं राजकारण न करता पक्ष आणि निष्ठा ठेवुन त्यांनी राजकारणात टाकलेले डाव सरस ठरत असत. आमदार म्हणुन विधानसभेतली भाषणे असतील किंवा विरोधी पक्ष नेता कसा असावा हा आदर्श त्यांनी तत्कालीन काळात दाखवुन दिला. राज्याचा गृहमंत्री ते उपमुख्यमंत्री आजही त्यांचे नाव काढलं पवित्र अशा विधानसभेच्या सभागृहाच्या भिंतीच्या डोळ्यातसुद्धा आश्रु आल्याशिवाय रहात नाहीत. दोन वेळा प्रदेश अध्यक्ष पदावर काम करत असताना हा पक्ष गोरगरिबांचा कैवारी असल्याची ओळख निर्माण करून देताना शेतकरी आणि अठरापगड जातीधर्माच्या कल्याणासाठी भाजप काम करते हे त्यांनी दाखवुन दिले. साहेब कितीही मोठे झाले पाय त्यांचे सतत जमिनीवर राहिले. धर्मापुरी जिल्हा परिषद गटातून राजकारणाला झालेली सुरूवात आणि विद्यार्थी दशेत स्व.प्रमोद महाजनांच्या सोबत एबीव्हीपीसारख्या संघटनेत केलेलं काम भाजयुमो संघटनेत एक तरूण चेहरा म्हणुन घेतलेली भरारी असे अनेक वेगवेगळे रूपं वेगवेगळ्या पदावर त्यांची जनतेने पाहिली. सत्तेपेक्षा संघर्ष त्यांच्या नशिबाला आला पण संकटांला घाबरेल तो गोपीनाथ मुंडे कुठला? नेतृत्वात धमक आणि हिंमत अगदी पर्वताला धडक घेण्यासारखी होती. अंगात वाघाची झेप होती तर हात्तीचं बळ कर्तृत्वात होतं. अनेक संकटे त्यांच्यावर आली. आयुष्यात कधी अपघात झाले तर कधी शत्रुचे हाल्ले झाले. पण डगमगले नाहीत. बीड जिल्ह्याचे तब्बल 30 वर्षे नेतृत्व करताना आदर्श राजकारणी म्हणुन नाव पुढे आलं. माझा जिल्हा-माझी माणसं हे सुत्र डोळ्यासमोर ठेवुन त्यांनी जिल्ह्याचं राजकारण केलं. दुश्मनाला मदत करणे हा त्यांचा मुळ स्वभाव अनेकदा त्यांच्याच अंगलट यायचा. जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घराण्याच्या राजकिय दुकानदार्‍या त्यांनी बंद केल्या आणि बंद पडलेल्या चालुही करून दाखविल्या. गोपीनाथराव हे नेतृत्व फारच आयडियल आणि तरूणाईला वेड लावणारं होतं. एक तर धिप्पाड शरीरयष्टी, रांगडा आवाज, मनमोकळा स्वभाव, केसाची स्टाईल, अंगात असलेलं जॉकेट, तो केसात फिरवलेला कंगवा, जॉकेटातल्या पॉकेटात घातलेला हात हे सर्व पाहता हा नेता कितीही मोठा झाला? पण दैनंदिन जगणं अगदी सामान्यातल्या सामान्याप्रमाणे होतं. राजकारणातला हिशोब वजाबाकी कधीच या नेत्याने केली नाही. माफ करणे हा त्यांचा मुळ स्वभाव.दोन वेळा लोकसभा बीडची लढवली. सुरेश धस, रमेश आडसकर ही मंडळी विरोधात लढली. अर्थात कुणाची दाळ शिजु दिली नाही हा भाग वेगळा. प्रत्येकाच्या राजकिय अस्तित्वाला त्यांचा आधार मिळालेला हे सत्य कुणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज तथा छत्रपती शाहु महाराज यांच्या वारसदारांचा सन्मान करून त्यांना राजकिय प्रतिष्ठा मिळवुन देण्याचं काम मुंडे साहेबांनीच केलेलं होतं. खरं तर वर्तमानकाळात ते असते तर शरद पवारांची राजवट कधीच संपवुन टाकली असती. कदाचित चित्र आजच्यासारखं दिसलंही नसतं.मुंडे साहेब दैवी शक्ती होते. त्यांना वर्तमानकाळात भविष्यकाळाचा वेध आकलन व्हायचा. भगवानगडावरून मला दिल्ली दिसते हे त्यांचे शब्द आजही कानात गुंजन करून जातात. बोले तैसा चाले अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता ज्या गडावरून दिल्ली दिसते असं म्हणणार्‍या साहेबांनी केंद्रात 2014 ला मंत्री पदाची शपथ घेताच भगवानगड गाठला होता. अर्थात त्यानंतर घडामोडीचा वेध या ठिकाणी न घेणे बरे. काय घडलं? कसं घडलं?हे सर्वांनाच माहिती. उजळीत बसलो तर मग कागदच पेनातल्या शाईपेक्षा डोळ्यातले आश्रु पडून ओलेचिंब होवु शकतात. सार्‍या घटनाक्रमाचे साक्षीदार आपण आहेत. नियतीनं त्यांना गाठलं आणि आपलं स्वप्न हिरावुन घेतलं. त्यामुळे साहेबांचं जाणं प्रत्येकाच्या जीवनात दुर्दैवी म्हणावे लागेल. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना एका गोष्टीची नोंद निश्चित करावी वाटते पंकजाताईनं मात्र डोंगराएवढं दु:ख र्‍हदयात दडवुन ठेवलं आणि हिंमत ठेवुन साहेबांनी दाखवलेला मार्ग घालुन दिलेले आदर्श, भीष्मधनुष्य उचलल्याप्रमाणे पुढे चालु ठेवले. जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई या भगिनींनी साहेबांवरच्या प्रेम करणार्‍या लाखो अनुयायांना आशास्थान निर्माण करून ठेवले. पहिल्याच दिवशी पंकजाताईनं घोषणा केली होती. नियतीनं कार्यकर्त्यांचं सुख हिरावुन घेतलं पण मी पुन्हा पायावर आणुन दाखवेल. प्रत्यक्षात उतरून दाखवलं. 2014 साली सत्तांतरात महत्वाची भुमिका संघर्षशालिनींनी घेतली. मंत्रीपदही मिळवलं. हे सारं करताना गोपीनाथ गडाची केलेली निर्मिती हे कर्तृत्व नसे जगी स्थळी. खरं तर वडिलांचं स्मारक बांधणं लेकीच्या नशिबात दुर्दैव म्हणावे लागेल. पण पंकजाताईनं करून दाखवलं. आज त्यांच्या रूपाने मुंडे अनुयायांना जगण्याचं बळ मिळत आहे. साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या देखील संघर्ष मार्गावरच भ्रमंती करताना दिसतात. एक दिवस निश्चित पंकजाताईचासुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात येईल यात शंका वाटत नाही. असो. 03 जुनच्या निमित्ताने पुन्हा प्रत्येकाच्या मनात साहेबांच्या आठवणी स्वप्नात साहेबांचा चेहरा हे सारं घडणं साहजिकच. खरं तर आजचा उगवणारा सुर्य ज्याचा किरण पहावासा वाटत नाही पण नियत आणि काळ कुणासाठी थांबत नाही. मृत्यू हे सत्य आहे. पण असत्य का वाटतो? कारण कर्तृत्वाच्या पाऊलखुणा एवढ्या जाज्वल्य ज्वलंत असतात. त्यामुळे लाखो अनुयायांना साहेब डोळ्यासमोर दिसतात. पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करताना आम्ही आशिर्वाद मागतो साहेबांना बळ मिळु दे आमच्या दोन्ही ताईसाहेबांना.

  • राम कुलकर्णी,
    भाजप प्रवक्ते ,अंबाजोगाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]