भावपूर्ण श्रद्धांजली
आंतरराष्ट्रीय कायदे तज्ञ आणि घटनातज्ञ डॉ. श्री. शिवराज नाकाडे यांचे 1 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले. हे वृत्त समजताच कायदा क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवर यांच्यावर शोककळा पसरली त्यांच्या निवास्थानी सर्वांनी जावून त्यांना पुष्पांजली व आदरांजली अर्पण केली.
डॉ. शिवराज नाकाडे हे शिक्षण क्षेत्रातील मोठे नाव होते. त्यांचा जन्म चाकूर जि. लातूर येथे झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चाकूर येथे झाले. उच्च शिक्षण हैद्राबाद येथे उस्मानिया विद्यापीठ अंतर्गत विवेक वर्धीनी कॉलेजमध्ये येथे झाले.
शिक्षणाचा बराच काळ हैद्राबाद येथे गेला. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संघटित करणे, वैचारिक पातळीवर मित्रांना एकत्रित करणे या गुणांमुळे विद्यार्थी संघटनेचे त्यांनी नेतृत्व केले. स्काऊट गाइड व एनसीसी कॅडेट म्हणून हि महाविद्यालयात त्यांचा गौरव झाला होता.
या काळात त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू,आणि उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णण यांना निमंत्रित करून त्यांच्या भाषणाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला होता.
हैद्राबाद येथे शिक्षक म्हणून नौकरी करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
शिक्षणपूर्ण केल्यानंतर त्यांनी शिरूर ताजबंद ता. अहमदपूर, चाकूर येथील शिक्षणसंस्थेत काम केले. त्यानंतर लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून एक वर्ष व त्यानंतर दयानंद लॉ कॉलेज येथे प्राचार्य म्हणून दीर्घकाल पर्यंत सेवा केली.
1970 – 71 च्या काळात प्रोफेशनल कॉलेजसना शासकीय अनुदान नव्हते. लॉ कॉलेजला अनुदान मिळावे, म्हणून डॉ. शिवराज नाकाडे यांनी दहा वर्ष पर्यंत पाठ पुरावा केला. महाराष्ट्रातील सर्व लॉ कॉलेजेसच्या पदाधिकारी यांना सोबत घेवून प्रांत पातळीवर व देशपातळीवर प्रयत्न करून प्रोफेशनल कॉलेजेसना ग्रॅन्ट मिळविण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले.
विधी महाविद्यालयातील प्राचार्यपदाच्या शेवटच्या टप्प्यात असतांना शासकीय अनुदान मिळायला सुरूवात झाली. याचा लाभ त्यांना फार कमी व येणार्या पिढीसाठी दीर्घकालीन व कायमस्वरुपी लाभ मिळाला.
एक शिस्त प्रिय, बुद्धीमान व चरित्र्य संपन्न प्राचार्य म्हणून त्यांचे नाव होते.
कायद्याचे त्यांना सखोल ज्ञान होते. देश विदेशातील निरनिराळ्या चर्चा सत्रात त्यांनी भाग घेतला. 42 व्या घटना दुरूस्ती संदर्भातील त्यांची भाषणे गाजली होती. त्याच बरोबर केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असावेत यासाठी अभ्यास करून अहवाल द्यावा. म्हणून केंद्र शासना मार्फत सरकारिया कमीशन नेमण्यात आले होते. केंद्र व राज्याचे संबंध कसे असावेत या संदर्भात विविध राज्यात सरकारिया कमीशनने चर्चासत्र आयोजित केले होते. देशातील अनेक बुद्धिवंतांच्या चर्चेनंतर त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण अहवाल सादर केला होता.
डॉ. शिवराज नाकाडे यांनी सरकारिया कमीशनच्या कार्याच्या संदर्भात एक आर्टिकल लिहिले होते. सदर आर्टिकल देशातील नामांकित वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. या आर्टिकलमध्ये नमूद केलेल्या सूचनांचा सरकारिया कमीशनने आपल्या अहवालात उल्लेख केला होता.
दयांनद विधी महाविद्यालयातील प्राचार्य पदाच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र शासनाने त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु म्हणून नेमणूक केली. त्याच वेळी लातूर येथीलच डॉ. जनार्दन वाघमारे यांचीहि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ या नवीन निर्माण झालेल्या विद्यापिठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली होती.एकाच शहरातून दोन कुलगुरू. दोन विद्यापिठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक झाली याची सर्वत्र चर्चा होती.
कडक शिस्तीच्या स्वभावामुळे त्यांनी विद्यापीठातील विस्कळीत पणाला शिस्त लावली, तेथील चुकीच्या गोष्ठींना आळा घालून विद्यापिठाला वैभव प्राप्त करून दिले होते हे सर्व ज्ञात आहे.
देशाचे तत्कालीन गृहमंत्री श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांचे ते स्नेही होते. 2004 ते 2012 या काळात डॉ. शिवराज नाकाडे यांना पंजाबविद्यापिठाकडून डी.लीट देण्यात आली. पंजाब विद्यापीठ चंदीगड व लोक मान्य टिळक विद्यापीठ पुणे येथे त्यांना मानद संचालक म्हणून स्विकृत करण्यात आले होते.
महात्मा बसवेश्वरांच्या कायक वे कैलास या वचना प्रमाणे कठोर परिश्रम व काम हेच स्वर्ग या वचना प्रमाणे कार्यरत राहिले. आपल्या तत्वाशी त्यांनी तडजोड केली नाही.
स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा प्रमुख गुण होता. या सर्व गुणांची चुणुक त्यांनी मराठवाडा वैधानिक मंडळाचे संचालक म्हणून काम करतांना दाखवले. महाराष्ट्राचे त्यावेळचे राज्यपाल पी.सी. अलेकझांडर यांचेशी त्यांचे स्नेहाचे संबध होते.
चाकूरच्या शेतकरी कुटुंबातील एक अनमोल रत्न, ज्यांनी महाराष्ट्राच्या, देशाच्या, विविध संस्थामधून, विविध विद्यापिठातून काम करतांना प्रशंसनीय योगदान दिले हे विसरता येणार नाही. त्यांनी Pearls of wisdom आणि 55 stars अशी दोन पुस्तके प्रसिद्ध केली. आणि world Government या संकल्पनेवर आधारीत लिखाण चालू होते. ते आता अपूर्ण राहिले आहे.
त्यांचे नाव, त्यांचे कार्य व त्यांचे योगदान शिक्षण क्षेत्रात कायम राहील.
त्यांना विनम्र आदरांजली.
–प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, पत्रकार
मो.9422071509