वातावरण बदलाचे शिक्षण देणारे विद्यापीठ निर्माण करावे– रामराजे नाईक निंबाळकर
माईर्स एमआयटीचा ३९ व्या स्थापना दिन साजरा
पुणे, दिः ५ ऑगस्ट: “सध्या जगातील बदलते वातावरण हे मानवासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भविष्यात क्लाइमेंट चेंज या विषयावर मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागेल. अशावेळेस एमआयटी ने पुढाकर घेऊन त्या संदर्भात नव्या विद्यापीठाची निर्मिती करावी.” असा सल्ला महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
माईर्स एमआयटी, पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे माईर्स एमआयटीच्या ३९ व्या स्थापना दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्रियदर्शनी अॅकॅडमीचे अध्यक्ष व उद्योगपती नानिक रूपानी हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड. अध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड, उपाध्यक्षा डॉ. सुचित्रा कराड – नागरे, सचिव प्रा. स्वाती कराड – चाटे, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील आणि माजी कुलसचिव एस. व्ही. उर्फ नाना कुलकर्णी हे उपस्थित होते.
तसेच, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे ऑनलाईन उपस्थित होते.
या प्रसंगी लेखक सुधीर देशमुख यांनी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या जीवनावर आधारित विज्ञान, अध्यात्म और विश्वशांति का युग द्रष्टा नामक कॉपी टेबल पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर संस्थेतील उत्कृष्ठ कार्य करणार्या डॉ.सायली पालधीकर, डॉ. अनुराधा पराशर, डॉ. विजय खंडाळे, डॉ. रेणू व्यास, शोभा काळे, इवेलिन शिन सिंग, कोंडाबाई भोसले, गजानन घुगे, वंदना खंडेलवाल, सूर्यकांत महाडीक आणि विलास घाटोळकर यांना माईर्स एमआयटी फाउंडेशन डे अवॉर्ड देवून सन्मानीत करण्यात आले.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,“सध्या महाराष्ट्रात विशेषतः मुंबई आणि कोकण क्षेत्रात पडलेल्या पाऊसाचे नियोजन आम्ही करू शकलो नाही. त्या संदर्भात विशेष अध्ययन होणे गरजेचे आहे. मानवाने निर्मित केलेल्या संकटामुळे कित्येक वर्षांपासून वेळेवर पाऊस पडत नाही. हे का होते यावर विचार मंथन होणे गरजचे आहे. एकंदरीत सृष्टीवरील बदलत्या वातावरणाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास व्हावा.”
“वातावरण बदलाचे महाराष्ट्राशी संबंधित संभाव्य परिणाम, वातावरण बदलाचे नैसर्गिक आणि कृत्रिम कारणे आहेत. यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त आहे. यामुळेच महाराष्ट्र सरकारने प्रथमच वातावरण बदलासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी समिती निर्माण केली आहे. जागतिक तापमान वाढ आणि त्याचा अभ्यास याद्वारे केला जाणार आहे. भविष्यात केवळ अभ्यासक्रम आणि पदवी शिकविण्याची गरज नाही तर संकटाचा सामना करणारे अभ्यासक्रम तयार करावे लागणार आहेत. ”
“सध्याच्या काळात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. त्या संदर्भात रोज वेगवेगळ्या बातम्या ऐकल्यामुळे सर्वसाधारण व्यक्ती हा गोंधळून गेला आहे. अशा वेळेस शिक्षण संस्थेने उत्तम प्रकारच्या लॅबची निर्मिती करावी. तेथे हुशार विद्यार्थ्यांकडून योग्य संशोधन करून घ्यावे. जेणेकरून मानव कल्याण साधले जाईल, असे ही रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,“जागतिक स्तरावरील स्पर्धा करणारे शिक्षण भारतात एमआयटीने कमी खर्चात उपलब्ध करून दिले आहे. बर्याच विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे राज्य सरकारने डिजिटल राईट टू एज्यूकेशन साठी पॉलिस तयार करुन विद्यार्थी आणि शिक्षण संस्था यांच्यातील दुरावा कमी करावा. तसेच रोजगाराभिमूख शिक्षण देण्याची गरज आहे. आजची पिढी ही खूप हुशार आहे. अशावेळेस शाळेतील शिक्षणाच्या पुढे जाऊन आपल्याला नवी धोरणे आणावी लागतील. शिक्षणातील धोरणात लवचिकतेचा गुण समाविष्ट करणे काळाची गरज आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ भारताला एकसंघ करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या आव्हानंतर ते शक्य झाले. असेच कार्य एमआयटी ग्रूप करीत आहे. या संस्थेच्या चार विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व निर्माण केले गेले आहे. मूल्यात्मक शिक्षणाचा मुळ उद्देश ठेवून विज्ञान, तंत्रज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालून शांती निर्मितीसाठी शिक्षण दिले जात आहे. सध्या डिजिटल युग असल्याने त्या संदर्भातील शिक्षणाची पॉलिसी करून जगातील सर्व शिक्षण संस्थांनी ते आत्मसात करावे. या शिक्षण संस्थेमुळे नेतृत्वगुण असलेले वैज्ञानिक, संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक आणि धोरणकर्ता निर्माण करण्यास महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत.”
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,“ एमआयटीची स्थापनेसाठी घैसास कुटुंबाचे योगदान महत्वाचे आहे. त्यातूनच एमआयटीचा विकास झाला. शिक्षणाला आध्यात्माची जोड देऊन विद्यार्थी घडविणे हे ध्येय होते, ते आता पूर्णत्वास आले आहे. या वाटचालीत अनेक संस्था उभा राहिल्या त्यापैकी एमआयटी विश्व शांती विद्यापीठ निर्माण झाले. त्यातच आणखी तीन विद्यापीठांची निर्मिती झाली. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान हे आजच्या पिढीच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न या संस्थेतून केला जात आहे. त्यातूनच उदयाची सर्वगुण संपन्न पिढी निर्माण होणार आहे. ”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“आज एमआयटीचे बीज हे वटवृक्षामध्ये परिवर्तन होत असतांना डॉ. कराड यांनी केलेल्या सर्व कार्याची आठवण होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून जगातील सर्वात मोठ्या विश्व शांती घुमटाची निर्मिती झाली आहे. एमआयटीच्या विकासाच्या टप्प्यात सुरवाती पासून बरेच व्यक्ती जुळलेल्या आहेत. त्यांच्याच सहयोगातून हे कार्य उभे राहिले आहे.”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,“संशोधन आणि नवनिर्मितीचे वातावरण तयार करणे, रोजगारवृद्धी आणि क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्मित करण्यासाठी एमआयटी ग्रूपचा मानस आहे. सध्याचा काळ झपाट्याने बदलत आहे त्यानुसार समाजाला शिक्षण देण्याचे कार्य करते. आता जागतिक पातळीवरील शिक्षण देवून त्यानुसार नेतृत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहात. डिजिटल युगाची सुरूवात झाली असल्याने शिक्षण क्षेत्रात भविष्यात एज्यूटेक कंपन्यांनी पुढे येण्याची गरज आहे.”
यानंतर नानिक रूपानी यांनी एमआयटी ग्रूप ने जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता असलेले रोजगार निर्माण केले आहे. भविष्यात भारत जगाचे नेतृत्व करेल असे सांगितले.
तसेच पुरस्कार्थी कोंडाबाई भोसले व सूर्यकांत महाडीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती कराड चाटे यांनी आभार मानले.