सोलापूर – ( प्रतिनिधी) युपीएससी नेव्हीच्या अत्यंत कठीण परीक्षेत यश संपादन केल्यानंतर एनडीए 148 कोर्सच्या राहूल तुळशीदास अंकमची निवड भारतीय नौदलात झाली आहे. चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सब-लेफ्टनंट पदावर तो नौदलात रुजू होईल. या परीक्षेला भारतभरातून बसलेल्या सुमारे सात लाख विद्यार्थ्यांमधून राहुल उत्तीर्ण झाला असून देशात त्याचा 320 वा क्रमांक आहे.
यासंदर्भात माहिती देताना राहुल म्हणाला, ” लॉकडाऊनच्या काळात केलेल्या अभ्यासाचा फायदा होऊन नेव्हीच्या लेखी परीक्षेत मी उत्तीर्ण झालो. यापूर्वी दोन वेळी ही परीक्षा मी दिली होती. मात्र, सात लाख विद्यार्थ्यांमधून सुमारे सहा हजार विद्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात. खरा कस लागतो तो मुलाखतीमध्ये. ही प्रक्रिया पाच दिवसांची असते. अतिशय कठीण असलेल्या या प्रक्रियेसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची सहा केंद्रे असतात. मी बंगलोर केंद्रावर होतो. आमच्या केंद्रावर 66 उमेदवार होते, त्यातील 32 जणांची पूर्ण मुलाखत झाली. त्यातून आम्ही सहाजण उत्तीर्ण झालो.”

राहुलचे वडील तुळशीदास सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत, सध्या त्यांची बदली पुण्यात झाली आहे. राहुलची आई लक्ष्मी आणि धाकटा भाऊ निहाल दहावीत आहे. यापुढील चार वर्षांमध्ये राहुलला तीन वर्षे खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकादमी येथे प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्यानंतर केरळातील ‘आयएनए’मध्ये तो वर्षभर असेल. मग सब-लेफ्टनंट म्हणून तो भारतीय नौदलात नोकरीला प्रारंभ करेल. विशेष म्हणजे, नेव्ही किंवा आर्मीची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना राहुलने हे यश संपादन केले आहे.
000

‘एनडीए’मध्ये मराठी मुले कमीच
नॅशनल डिफेन्स अकादमी (एनडीए) महाराष्ट्रात आहे, पण ‘एनडीए’मध्ये महाराष्ट्र नाही, अशी खंत राहुल अंकमने व्यक्त केली. एनडीएमध्ये भरती व्हायचे असेल तर दहावीपासूनच प्रयत्नांना सुरूवात करावी लागते, त्यासाठी मार्गदर्शन करणाऱया संस्था आहेत. मला माझ्या काही मित्रांनी मार्गदर्शन केले, शिवाय इंटरनेट आणि अन्य सुविधांमधून मी माहिती मिळवली, असे राहुलने सांगितले.
000