सुशासनासाठी प्रत्येकाने संवेदनशीलपणे काम करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
• ‘सुशासन’साठी आवश्यक बाबींवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
• सामान्य नागरिक हाच केंद्रबिंदू; गतिशील प्रशासनासाठी नियोजनपूर्वक काम करा
लातूर, दि. २३ : प्रशासकीय कामकाजात ‘सुशासन’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलपणे काम करावे. आपल्या टेबलावर येणारी फाईल किंवा कागद वाचताना त्यामागील मानवी चेहरा वाचवा, तरच प्रशासनाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत सेवा, योजना पोहोचविणे शक्य होईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
सुशासन सप्ताहाचे १९ ते २४ डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर सर्व शासकीय विभाग प्रमुखांची कार्यशाळा आयोजित करण्यात आले होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, कार्यशाळेचे मार्गदर्शक सायबर तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यावेळी उपस्थित होत्या.
शासकीय योजना, विविध सेवांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना अधिक गतीने देता यावा, यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजनबद्धपणे काम करणे आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना मनात ठेवून काम केल्यास त्याला समाजाकडूनही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. तसेच शासन, प्रशासनामार्फत राबविण्यात येणारे अभिनव उपक्रम सकारात्मकपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
सुशासनासाठी प्रशासन व मीडियामध्ये सुसंवाद गरजेचा : प्रदीप नणंदकर
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन, प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात. याद्वारे मांडल्या जाणाऱ्या विषयांमुळे अनेक प्रश्न सुटतात. याचप्रमाणे प्रशासनामार्फत राबविलेले जात असलेले चांगले उपक्रम नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे कामही प्रसारमाध्यमे करतात, त्यामुळे प्रशासनाची समाजामध्ये चांगली प्रतिमा निर्मिती होते. सर्वसामान्य नागरिकांची गाऱ्हाणी, प्रश्न जलदगतीने निकाली काढण्यासाठी सुशासन संकल्पना मांडली गेली आहे. सुशासनासाठी प्रशासन व प्रसारमाध्यमात सुसंवाद राहणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी ‘प्रशासन आणि मीडिया’ या विषयावर बोलताना सांगितले.
यावेळी त्यांनी लातूर येथील विविध पदांवर काम केलेल्या विविध अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सांगितले. तसेच चांगल्या बाबींच्या तुलनेत वाईट बाबी कमी आहेत, मात्र चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहचत नसल्याने वाईट बाबींचीच चर्चा अधिक होत असते. त्यामुळे प्रशासनाने चांगल्या कामाची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवावी, असे त्यांनी सांगितले.
सायबर गुन्हेगारांपासून बचावासाठी सजगता हाच उपाय : डॉ. धनंजय देशपांडे
आज प्रत्येक गोष्ट डिजिटल झाली असून संगणक, मोबाईल, इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बदलत्या युगात गुन्हेगारीचे स्वरूपही बदलले असून सध्या सायबर गुन्हे वाढत आहेत. यापासून बचावासाठी सर्वांनी सजग राहून इंटरनेट, मोबाईलचा वापर करावा, असे आवाहन सायबर तज्ज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी केले. सुशासन कार्यशाळेत ‘जगताय, पण जागे किती आहात…’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रशासनातही मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रणालीचा वापर वाढला आहे. यामुळे प्रशासन गतिमान होण्यास मदत झाली आहे. सर्वसामान्यांना घरबसल्या विविध सेवांचा लाभ मिळत आहे. मात्र वैयक्तिक पातळीवर सोशल मिडियासारख्या बाबींमुळे अनेकांना सायबर गुन्हेगारांनी फसविले असल्याच्या घटना घडल्या आहेत. समाज माध्यमांच्यावापराबाबतचे अज्ञान, लोभ आदीमुळे अनेकजण फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने समाज माध्यमांचा वापर करताना सजग राहणे गरजेचे आहे, असे डॉ. देशपांडे म्हणाले. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींची त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच त्यापासून बचावासाठीचे उपाय सांगितले.
प्रास्ताविकात प्रभारी अपर जिल्हाधिकारी श्री. नेटके यांनी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजनाचा हेतू विषद केला. ‘प्रशासन गाँव की ओर’ हे ब्रीद घेवून सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना जलद सेवा पुरविण्यासाठी, प्रलंबित बाबी निकाली काढण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले. भारतीय संविधानाची प्रत आणि वृक्षाचे रोपटे देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी केले, उद्धव फड यांनी उपस्थितांचे आभार मानले.