28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्या*सुळकूड योजना अंमलबजावणीसाठी जनमताचा रेटा आवश्यक - प्रताप होगाडे*

*सुळकूड योजना अंमलबजावणीसाठी जनमताचा रेटा आवश्यक – प्रताप होगाडे*

इचलकरंजी – प्रतिनिधी

“इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड योजनेतून इचलकरंजी शहराला मिळणारे पाणी हे कर्नाटक हद्दीशेजारच्या शेवटच्या बंधाऱ्यावरून घेतले जाणार आहे. त्यामुळे इतर कोणाच्याही हक्काचे पाणी हिसकावून घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही” असे ठाम प्रतिपादन दूधगंगा पाणी योजना अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी केले आहे. ते समाजवादी प्रबोधिनी येथे इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने आयोजित “कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात” प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

“विठ्ठल चोपडे यांनी गेल्या साडेतीन वर्षापासून या योजनेचा सखोल अभ्यास केला आहे. सुळकूड पाणी योजना सर्व ३.५ लाख नागरिकांना कळावी, सर्व गैरसमज व संभ्रम दूर व्हावेत व योजना अंमलबजावणीसाठी जनमताचा रेटा व दबाव निर्माण व्हावा यासाठी सर्व इचलकरंजीकरांनी एकजुटीने कार्यरत व्हावे” असे आवाहन अध्यक्षीय समारोप करताना प्रताप होगाडे यांनी केले.

प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी प्रबोधिनी येथे झालेल्या या शिबिरामध्ये अशोकराव स्वामी, जयकुमार कोले, प्रकाश दत्तवाडे, भाऊसाहेब आवळे, तानाजी पोवार, पुंडलीकराव जाधव, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, प्रसाद कुलकर्णी, अभिजित पटवा, बजरंग लोणारी, संदीप चोडणकर, दयानंद लिपारे आदी प्रमुखांनी आपले विचार मांडले व काही महत्वाच्या सूचनाही केल्या.

“कोणत्याही योजनेमध्ये पहिला हक्क पिण्याच्या पाण्याचा असतो. आपल्या भविष्यातील ३० वर्षांची गरज लक्षात घेऊन ही योजना मंजूर केलेली आहे. सध्या सदर योजनेतून मंजूर असणारे पाणी ०.९१ टीएमसी पैकी ०.६३ टीएमसी लागणार असून त्यातील ०.२९ टीएमसी पाणी हा गैबी बोगद्यातून मिळणाऱ्या पाण्याचा वापर बंद होणार असल्याने आताची खरी गरज ही फक्त ०.३४ टीएमसी आहे” अशी माहिती देताना विठ्ठल चोपडे यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. पंचगंगा प्रदूषणास फक्त इचलकरंजी जबाबदार नाही तर उगमापासून येणारे प्रत्येक गाव जबाबदार आहे परंतु त्याचे खापर इचलकरंजी शहरावर फोडणे दुर्देवी आहे. इचलकरंजी शहराच्या प्रदूषण मुक्तीसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सुळकूड योजना शासनपातळीवर मंजूर असल्याने ती राबवण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, विविध भागात कॉर्नर सभा, बैठकाद्वारे आपण पाण्याची गरज विशद करावी व योजनेबाबत असलेले गैरसमज सामंजस्याने दूर करावेत असे चोपडे यांनी स्पष्ट केले.

अभिजित पटवा यांनी स्वागत केले.प्रास्ताविक करताना प्रसाद कुलकर्णी यांनी पाणी ही मूलभूत गरज असून राष्ट्रीय संपत्ती असल्याने शहरवासियाना पाणी मिळालेच पाहिजे, आता नाही तर कधीच नाही. अशी भूमिका मांडली. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सदर योजना मंजुरीसाठी विठ्ठल चोपडे यांना अलका स्वामी नगराध्यक्ष असताना सर्वानुमते ठराव करून दिले असून सर्वानी सहकार्य केले आहे, आता प्रताप होगाडे यांच्या सहकार्याने शहरभर जनजागृती करण्यासाठी योगदान द्यावे असे सांगितले.

शिवसेना शहरप्रमुख भाऊसो आवळे यांनी भागाभागात जनजागृती करण्यासाठी सोप्या भाषेत समजतील अशी पत्रके काढावीत व विठ्ठल चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल परिसरातील इचलकरंजीत कामानिमित्त येणाऱ्या रहिवासी बांधवांचा मेळावा घेण्याची सूचना केली. ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी कागल परिसरातील नागरिकांचे गैरसमज दूर करण्यात यावेत असे मत व्यक्त केले. जयकुमार कोले यांनी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व सिंचन योजनेस अनुदान मिळावे त्यामुळे पाणी कमी लागेल व आपला प्रश्नही सुटेल अशी महत्वपूर्ण सूचना मांडली.

या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. यावेळी उमेश पाटील, जाविद मोमीन, अहमद मुजावर, संजय पोळ, डी एस डोणे, राजू कोन्नुर, सुनील तोडकर, रिटा रॉड्रिग्युस, सुषमा साळुंखे, रवि जावळे, सुनिल मेटे यांच्यासह इचलकरंजीतील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]