ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत केवळ जाण्याचीच नाही तर तीन दिवस तिथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या अभिरुची जोपासना कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली.या तीन दिवसात झालेली विविध व्याख्याने ,मार्गदर्शन सत्रे यांचा हा वृत्तांत…. –संपादक
देशातील लोक प्रतिनिधी, पदाधिकारी,अधिकारी ,
कार्यकर्ते यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास करण्याच्या हेतूने त्यांना रितसर प्रशिक्षण मिळावे या खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९८२ साली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची अशासकीय संस्था म्हणून स्थापना व नोंदणी करण्यात आली. स्थापनेपासून प्रबोधिनीने आजवर जवळपास ३५ हजार व्यक्तींना प्रशिक्षण दिले आहे.
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रबोधिनीच्या उत्तन येथील भव्य संकुलाचे उद्घाटन ६ जानेवारी २००३ रोजी करण्यात आले. आज हे संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले पाहून मला फार आनंद झाला,कारण जेव्हा या संकुलाचे उद्घाटन झाले,तेव्हा मी कोकण विभागाचा माहिती उपसंचालक असल्याने उद्घाटन पर कार्यक्रमाच्या सर्व प्रसिद्धीची जबाबदारी माझ्यावर होती. आता जवळपास २३ वर्षांनी तिथे जाण्याचा योग आला,तो माझे मित्र प्रा डॉ अमेय महाजन यांच्या मुळे. ते ६ महिन्यांपूर्वीच या प्रबोधिनीतील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ डेमॉक्रटिक लिडरशिप या संस्थेत संचालक म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या आग्रहाने ,अगत्याने मला तीन दिवस चाललेल्या अभिरुची जोपासना कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
या कार्यशाळेचा प्रारंभ प्रबोधिनीचे महा संचालक
डॉ जयंत कुलकर्णी यांच्या अतिशय उद्बोधक प्रास्ताविकाने आणि जगप्रसिद्ध बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन करून झाला.या निमित्ताने अमेय सरांनी विष्णू मनोहर यांची घेतलेली मुलाखत चांगलीच चटकदार झाली.
या नंतर नाटककार,लेखक अभिराम भडकमकर लिखित
“इन्शाअल्लाह” या कादंबरीचे अभिवाचन स्वतः अभिराम भडकमकर, कलाकार सचिन सुरेश, सलीम मुल्ला आणि स्वाती चिटणीस यांनी अतिशय मनस्वीपणे केले.
या अभिवाचनाबरोबरच कादंबरीची प्रेरणा, बलस्थाने, कादंबरीत वापरलेली भाषा, बोली, शैली ,मानवी स्वभाव, नाते संबंध या वरही सांगोपांग चर्चा झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी, प्रबोधिनीत असलेल्या सुंदर तरणतलावाकाठी अभिराम भडकमकर यांनीच “मैत्री पुस्तकांशी” या विषयावर खुल्या हवेत,छानशा वातावरणात दिलखुलास संवाद साधला. नेहमी प्रमाणे बंदिस्त जागेत हा कार्यक्रम न घेता,तरणतलावाकाठी,थोडी थंडी असलेल्या वातावरणात,
कोवळ्या उन्हात झालेल्या या संवादात अभिरामजीनी सांगितले,
“लेखन हे काळ आणि स्थळ ओलांडणारे असावे. महाभारत आज ही आपल्याला भावते ते त्यामुळेच. शेक्सपियर आजही भावतो,तेही त्यामुळेच.
सौदी अरेबियाची राजकन्या हीचे पुस्तक प्रिंसेस.. हेमिंग्वेही आपला वाटतो. इतर भाषेतील साहित्य आपण वाचले पाहिजे. आपले साहित्य भाषांतरीत होऊन इतर भाषेत गेले पाहिजे.माझे “वानप्रस्थाश्रम ” नाटक कन्नड मध्ये मूळ मराठी पात्रांच्या नावांसह गेले आणि तरीही ते तिकडे लोकप्रिय ठरले. जीं ए कुलकर्णी,चि त्र्यं खानोलकर हे जागतिक दर्जाचे आहे. प्रत्येक लेखकाचे पुस्तक म्हणजे जगाकडे बघणारी खिडकी असते. दया पवार यांनी बलुतं द्वारे वेगळे जग दाखविले.
आपले संस्कार पुस्तकावर झिरपत झिरपत येतात,तसे व्हायला नको. लोकानुनय नको.जे आपण काही लिहितो,ते अंत स्वरापासून दूर गेले की,पुस्तके वाचकांपासून दूर जातात.एकेकाळी ज्या नाटकांमध्ये सामाजिक समस्या नसेल ते नाटकच नव्हे ,असे काही समीक्षक म्हणत. पण ते बरोबर नव्हते.
तसेच खूप खपणारे पुस्तक , लेखक समिक्षकांकडून उपेक्षित राहिल्याने अतिशय लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर आयुष्य भर लेखक म्हणवल्या गेले नाहीत,या दुःखात राहिले. तसेच आपण साचेबंद पुस्तकांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची रुची विकसित केली पाहिजे.
ज्या पुस्तकात लेखकाचा दृष्टिकोन डोकावतो,अशी पुस्तके वाचकांची नावडती होतात.प्रत्येक लेखकापुढे एक निश्चित वाचकवर्ग असतो. नाटकाला जसा लगेच प्रतिसाद मिळतो,तसा प्रतिसाद पुस्तकाला लगेच मिळत नाही.तो हळूहळू मिळत जातो.पण पुस्तक आणि वाचकांचा संबंध कायम स्वरुपी असतो.ही एक मैत्रीच असते.लेखनाचे सुध्दा व्याकरण असते. ९ रस आणि षडविकार हे पुस्तकाचे व्याकरणच आहे. या वरच आपले सर्व आयुष्य बेतलेले आहे.
माणसाचे आयुष्य सर्वत्र सारखेच असते.कुठलेही पुस्तक हे जग आणि जीवन याच गोष्टीशी निगडित असते.
माणसाचा मी कोण…मी कोण..हा सनातन शोध सुरू असतो.काही पुस्तके समजून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. सध्या
पुस्तक महाग झाले,ही सबब होऊ शकत नाही. महाग काय झाले नाही ? पुस्तक विकत घेणे,वाचणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे.अतिशय संयतपणे ,विचारपूर्वक झालेला हा संवाद उपस्थितांच्या मनावर, विचारांवर चांगलाच प्रभाव पाडून गेला.
दुसऱ्या सत्रात चित्रकार विजयराज बोधनकर यांनी त्यांची सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळच आकर्षक रित्या मांडून ठेवलेली विविध प्रकारची,विविध चित्रे एका छोटेखानी प्रदर्शनाचा अनुभव देऊन गेले.शिवाय ती चित्रे पाहिल्यामुळे प्रशिक्षणार्थींची मनोभूमिका आपसूकच छान तयार झाली.
विजयराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले,
मला दहावीत चाळीस टक्के मार्क्स कसे मिळाले,ते कळत नाहीय. तरीही मी इतका मोठा चित्रकार झाल्याचे पाहून माझ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करायला आलेले मुख्याध्यापक माझ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करून लगेच पळून गेले. चित्रकार,शिल्पकार हा रूढ अभ्यासाच्या फार पलीकडे असतो ,असे त्यांनी स्वानुभवावरून स्पष्ट केले.
यावेळी विजयराज यांनी आशय संपन्न चित्रे समजावून सांगितली. अधिक तपशीलात सांगताना ते म्हणाले,
चित्र ही चित्रकाराची भाषा असते. कलाकार,नकलाकार, चित्रकार यात फरक आहे.
चित्रकला म्हणजे काय ? तर चित्त + र म्हणजे रेषा.कल + आ म्हणजे कला.
ओम हा केवळ हिंदू धर्माचेच प्रतीक नसून ते विश्वाचे प्रतीक आहे.हरिपाठ ज्याने ऐकले त्याला जीवनाचे सार समजते. त्या पासूनच आपण दूर चाललो आहोत.आपण चित्रकलेची उपासना आणि त्याच बरोबर जोपासना केली पाहिजे. तुमच्या मनात काही नवीन आले,तो क्षण तारुण्याचा समजावा.चित्र निर्मिती करताना आम्ही फार श्रीमंत होतो.रसिकताही माणसाला श्रीमंत करते. अत्त दीप भव… ध्यानात रंग,चित्र आहे.
विजयराज यांनी जाहिरात क्षेत्रातील स्वतःच्या अनुभवांच्या आधारे सांगितले की,जाहिरातीने आपण भाळल्या जातो.उदा. बिसलरी पाण्यात विशिष्ट रसायन असते. त्यावर ऊन पडले की त्यातील रसायन बदलते. त्यामुळे ते पाणी शुद्ध असल्याचा दावा पोकळ आहे.तसेच टूथ पेस्ट मध्ये डुकराचे मांस असते,हे आपल्याला समजल्यापासून आपण टूथपेस्ट वापरणे बंद केले असून आता विठोबा वापरायला लागलो आहोत.
अतिशय हसत खेळत हे सत्र पार पडले.
दुपारच्या तिसऱ्या सत्रात जागतिक कीर्तीचे चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी “चित्रपट पाहण्याची दृष्टी” या वर बोलताना केवळ
“चित्रपट पाहण्याची “दृष्टी” इतकेच संकुचित मार्गदर्शन न करताना “जीवन जगण्याची दृष्टी” कशी असावी या वर फार मार्मिक विवेचन केले.आपली आई आणि आपली जीभ ,आपले अती लाड करून आपल्याला कशी बिघडवते हे त्यांनी , त्यांना देश विदेशातील आलेल्या अनुभवांच्या आधारे सांगितले.
त्यांच्या बोलण्याचा आशय असा….
” आपल्या समाजात, घरात चित्रपट पाहणारा माणूस म्हणजे वाया गेलेला माणूस समजला जातो. वृत्तपत्रात चित्रपट समीक्षण लिहिण्यासही कमी लेखल्या जाते. कलेची समज माणूस घडवते. मी जगातील फिल्म फेस्टिवलसाठी जातो,तेव्हा तेव्हा तेथील आर्ट गॅलरी पहात आलो आहे. सर्व मसाला म्हणजे सिनेमा ,असा समज आहे.आपल्या घरी १० हजार सिनेमे आहेत असे सांगून त्यांनी काही गाजलेले लघुपट दाखवून त्यांचे रस ग्रहण केले.
तसेच आपली जीवन दृष्टी विकसित करणारे काही चित्रपट आवर्जून पाहावे असे अत्यंत पोट तिडकीने आवाहन केले.
या नंतरच्या सत्रात डॉ मृदुला दाढे यांनी प्राध्यापिका, लेखिका, गायिका,चित्रपट संगीत संशोधक अशा विविध भूमिका एकाच वेळी सुरेलपणे निभावून ” सुगम व चित्रपट संगीत:अनुभव आणि आनंद ” या वर छान भाष्य केले.
मुळात आपण चित्रपट संगीत,या विषयाकडे कसे वळलो, हे सांगताना त्या म्हणाल्या,आपल्याकडे चित्रपट संगीत गांभिर्याने घेतले जात नाही.आपण एस एन डी टी विद्यापिठात शिकत असताना,तत्कालीन विभाग प्रमुख डॉ प्रभा अत्रे मॅडम यांनी डॉ अशोक रानडे यांचे आयआयटी मुंबईत झालेले व्याख्यान ऐकण्यासाठी पाठविले.तिथे डॉ अशोक रानडे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला की चित्रपट संगीताचा कुणी अभ्यास का करत नाही ? या प्रश्नाने आपल्याला चित्रपट संगीत,संशोधन याकडे आकर्षित केले आणि पुढे याच विषयात संशोधन करून काही पुस्तके देखील लिहिलीत.
चित्रपट संगीताविषयी बोलताना त्यांनी चित्रपट सृष्टीचा आढावा घेतला. भारतात १९१३ साली “राजा हरिश्चंद्र” हा पहिला चित्रपट तयार झाला. पण तो मूकपट होता.तर “आलममारा” हा पहिला बोलपट ठरला.
आपले सुरुवातीचे सर्व चित्रपट हे पौराणिक आहेत.कारण आपली देवादिकांवर असलेली श्रद्धा होय.चित्रपट हे सुरुवातीपासूनच व्यावसायिक राहिले आहेत. त्यामुळें चित्रपट संगीत देखील कायम व्यावसायिकतेच्या हेतूनेच बनविण्यात येते.या संगीतात देखील घराणी आहेत.
मेलडी स्कूल घराण्यात गाण्याला आणि आकाराला महत्व असते. तर रिदम घराण्यात चाल महत्वाची मानली जाते .तसेच
चित्रपटातील प्रसंग उठावदार होण्यासाठी देखील पार्श्वसंगीत वापरल्या जाते.पूर्व,पश्चिम, उत्तर,दक्षिण अशा प्रत्येक दिशेचे संगीत आहे. गाणं प्रभावी करण्यासाठी प्रयोग झाले आहेत.जो चलता है वो बिकता है,जो बिकता है ,वो बनता है! हा चित्रपट संगीताचा मूलमंत्र आहे.
रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली गाणी,त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत,ते रवींद्र संगीत आहे.रस निर्मितीचा हेतू हा आनंद देणे हा आहे.गझल,कव्वाली हे ही चित्रपट संगीतात आहे.
नौशाद यांनी शास्त्रीय संगीत पान टपरी पर्यंत पोहचवले असे सांगून त्यांनी नौशाद यांचा गौरव केला.
लोक संगीताचा देखील चित्रपट संगीतात सुरेख वापर करण्यात आला आहे.
तर सी रामचंद्र यांनी पाश्चात्य संगीत आपल्या कडे आणले आहे.” अलबेला “चे संगीत हिट झाले कारण त्या गाण्यातील लयी…हे आहे.
गझल हा काव्यप्रकार आहे.पण तो संगीतात ही वापरल्या गेला आहे. गाण्याचा इंट्रो पिस आपला मूड तयार करते. तर गाण्याच्या कोडा पिस मुळे (गाण्याची अखेर) ते गाणे आपल्या मनात घोळत राहते.गीतातील थांबे देखील विशिष्ट परिणाम साधत असते.
जुन्या,लोकप्रिय हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाणी पडद्यावर दाखवत दाखवत त्यांनी ज्या प्रकारे हे सत्र हाताळले त्याला तोड नाही.सर्व प्रशिक्षणार्थीना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
शेवटी सर्वांनी एकमुखी फर्माईश केल्याने त्यांनीं स्वतः एक गाणे गाऊन या सत्राचा समारोप केला.
तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात “शास्त्रीय संगीताचा कान तयार करणे” या विषयावर प्रा केशव परांजपे यांनी मिश्किल पणे मार्गदर्शन करून प्रारंभी गंभीर वाटणारा हा विषय एकदम सोपा करून टाकला.प्रारंभीच ते म्हणाले,शास्त्रीय संगीत सुरू झाले की
रसिक लगेच कुजबुज करायला लागतात की कुठला राग चालू आहे ? पण शास्त्रीय संगीत सोपे आहे. कठीण नाही. “मला कळत नाही,” असे म्हणून रसिकांनी आपली जबाबदारी झटकून मोकळे होता कामा नये.. शास्त्रीय संगीत हे सरोवर नसून सागर आहे. आपल्याला बुध्दीने काम करायची सवय असते. बौद्धिक,तार्किक विचार करून आपण जगत राहतो. पण त्याला मर्यादा येतात.संगीत ही ललित कला आहे.संगीताची स्वतःची भाषा आहे. रस सिद्धांत …साहित्याच्या, नाट्याचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया..वैश्विकतेकडे घेऊन जाणे हे कलाकाराचे काम आहे. शास्त्र म्हणजे …एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुभव जाणे होय. सात सुर वैश्विक आहे.सूर मूलभूत आहेत.नाद वेगळा,सुर वेगळा असे सांगून त्यांनी त्यांचे साथीदार तबला वादक राजेंद्र दातार आणि नव्या दमाचा गायक चिन्मय याच्या साथीने शास्त्रीय संगीताचा कसा आनंद घ्यायचा,याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
“शिल्पकला: निर्जिवातील जिवंतपणा” या सत्रात जागतिक कीर्तीचे शिल्पकार भगवान रामपुरे यांनी मात्र चांगलीच निराशा केली. आपल्या विषयाशी सोडून ते बालपणीचे हलाखीचे जीवन,काही प्राध्यापक हे शिकवण्यापेक्षा हजेरीच्या माध्यमातून “वॉचमनगिरी ” कसे करत,त्यामुळे एक वर्ष कसे वाया गेले असेच काही काही सांगत राहिले. त्यांची गाडी रुळावर आणण्याचा सतत प्रयत्न करणारे मुलाखतकार विनय माळवणकर हे देखील शेवटी हतबल झाले. सत्राची वेळ संपून गेलेली, सर्वांना भुका लागलेल्या असल्याने शेवटी प्रशिक्षणार्थीनी घाई करून भगवानजीनी काढलेली शिल्पे ,त्यांची छायाचित्रे दाखवा असे सांगितल्यावर शेवटी घाईघाईत काही अल्बम,काही चित्रफिती दाखवून या सत्राचा “शेवट ” झाला.
दर्दी नाट्य दिग्दर्शक,पद्मश्री वामन केंद्रे यांनी मात्र
” नाटक समजून घेताना” या सत्राची सुरुवातच अशी दमदार केली की,कार्य शाळेचा समारोप आणि रविवार ही असल्याने मिळालेले श्रीखंड पुरी,मसाले भात, ताक,पापड असे झालेले मस्त जेवण कुणाला चढणारच नाही, याची दक्षता घेतली.प्रसंगी आपल्या दमदार आवाजात नाट्याभिनय करून त्यांनी नाटक छान समजावून सांगितले. त्यांच्या बोलण्याचा आशय असा…
नाटक लिहिणे हा एक भाग झाला. ते सादर करणे,प्रयोग करणे म्हणजे नाटक होय. नाटक लिहिणे हे साहित्य नाही,असे साहित्यिक म्हणतात. पण नाटकानेच साहित्य लोकप्रिय करीत आणले आहे.शेक्सपियरने राणीच्या मनोरंजनासाठी लिहिलेली नाटके सादर झाल्याने त्याचे व इतर साहित्य लोकप्रिय होत गेले. नाटक सादर करणारी मंडळी आणि पाहणारी मंडळी एकत्र आले की नाटक होते. त्यामुळे काही नाटके बुकिश ठरतात.
भरत मुनी यांनी दोन अडीच हजार वर्षांपूर्वी “नाट्यशास्त्र ” हा ग्रंथ लिहिला आहे.हा ग्रंथ आजही डिकोड करण्याचा प्रयत्न होत आहेत ,इतका तो गहन आहे.
शरीर भाषा,
दृश्य श्राव्य काव्येशू नाटक: असे नाट्यशास्त्रात लिहिले आहे.नाटक मनाला भावले पाहिजे. त्याने पूर्ण परिणाम साधला पाहिजे.
नाटकात प्रथम आपण बघतो ,तो आशय,विषय,गोष्ट .
नाटक आपल्या समोर आपल्याच जीवनाचं चित्र उभे करते .आपल्या श्वासाबरोबर जे नाटक कायम राहते,ते प्रभावी नाटक होय. नाटकाचा कंटेंट भारी असेल तरच ते लक्षात राहते. मेंदू आणि हृदय ही आपली दोन चाके आहेत.
नाटक जगण्यावर चालत राहते.
कंटेंट नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सादरीकरण. त्याच्या
दोन शैली आहेत.
१) वास्तववादी:
जसं जगणं आहे तसं.
समाजजीवनाचा आरसा असलेले.
२) अवास्तववादी:
पौराणिक नाटके, हिंदी चित्रपट ही अवास्तववादी असतात.संगीत नाटक अवास्तववादी आहेत. त्यात अनेक शैली असू शकतात.
नको असलेल्या भावना कोंबलेली नाटके म्हणजे
“मेलो ड्रामा”.सत्याचा प्रत्यय देणारी नाटके हिं खरी नाटके होत.नाटकात डोळ्यांना सुखावणारी दृश्ये असली पाहिजे.वाचिक अभिनय ही महत्वाचा घटक आहे.
खरोखरच वामनजींचे हे सत्र त्यांचे अनुभव, विचार , दृष्टिकोन,परखडपणा यामुळे खूपच उद्बोधक ठरले.याच सत्रात सर्व प्रशिक्षणार्थीना वामनजींच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येऊन कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
या सर्व कार्यशाळेतील विषय,वक्ते , वेळापत्रकाप्रमाणे
सर्व कार्यशाळा चालणे, निवास,भोजन व्यवस्था यामुळे ही कार्यशाळा अमीट ठसा उमटवून गेली.
एकंदरीत समाजाच्या अभिरुचीची जोपासना करण्याबरोबरच मुळात उच्च दर्जाची अभिरुची निर्माण होईल या दृष्टीने अशा कार्यशाळा ठिकठिकाणी आयोजित करण्याची आणि या कार्यशाळांमध्ये युवकांचा जास्तीतजास्त सहभाग राहील यासाठी प्रयत्नशील राहणे हे देखील सशक्त,सक्षम राष्ट्र उभारणीचेच कार्य आहे. असे हे कार्य हाती घेतल्याबद्दल रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मनापासून अभिनंदन आणि आभार .
लेखन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800