पानगाव (लातूर):
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान ही शिक्षण क्षेत्र हा कार्यबिंदू मानून ग्रामीण भागात समाजकार्य करणारी संस्था आहे.लातूर हे शहर आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचे केंद्र असले, तरी प्रत्यक्ष ग्रामीण भागातच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा भागवताना आर्थिक ताण सहन करावा लागतो. यंदा तर पावसानेही अद्याप दडी मारलेली असल्याने ग्रामीण भागातील पालक अधिकच चिंतित आहे व त्यातच शालेय साहित्याचा आर्थिक बोजा या पालकांची कुचंबणा वाढवणारा आहे.

ह्या जाणिवेखातर किमान मुलभूत साह्य करावे या हेतूने पानगाव येथील सरस्वती उच्च व उच्च माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या विकल असलेल्या सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानतर्फे वह्या व कंपास या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पानगावच्या सरपंच सौ. गयाबाई कस्पटे, माजी सरपंच श्री. सुकेश भंडारे यांच्या उपस्थितीत व समन्वयक प्रा. मनोहर कबाडे यांच्या सुविद्य मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य श्री. धर्मराज चेगे होते. याप्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. प्रतिष्ठानतर्फे कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व उपप्राचार्य बालाजी फुले यांनी आभारप्रदर्शन केले.
प्रमुख पाहुणे श्री. सुकेश भंडारे यांनी प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्वक उपक्रमशीलतेबद्दल व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले; तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देवून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रतिष्ठान करत असलेल्या कार्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद डोंगरे यांनी केले. सरस्वती विद्यालयातील श्री. वैजनाथ चामले यांनी विशेष परिश्रम घेतले त्याबद्दल कार्यवाह व समन्वयक यांनी कृतज्ञतेने उल्लेख केला.

याप्रसंगी, प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष श्री. दत्ता कुलकर्णी, निवृत्त शिक्षक श्री. मुरलीधर डोणे, ग्रा.पं.सदस्य गोविंद नरहरे, धर्मराज मोटाडे, नरेश बरुळे, दत्तात्रय कसपटे, सुमनताई कसपटे, विद्यालयातील शिक्षकवृंद श्री. विष्णू माले, भरत संपते, विश्वनाथ बुरले, रमेश कुमरवाड, नामदेव नाब्दे, सचिन कांबळे, प्रणिता कलुरे, सुलोचना माले, निर्मला हरिदास, ज्योती शेंडगे; तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे अशाच शिक्षणपूरक उपक्रमांचे भविष्यात सातत्यपूर्वक आयोजन केले जाईल अशी ग्वाही कार्यवाह प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली.
