लातूर, मार्च 31
देशाच्या सीमेवर सुरक्षा करणारे जवान, त्यांचे जीवन, अत्याधुनिक शस्त्रे याचे आकर्षण तर सर्वांनाच असते. हेच सैनिक, जवान अगदी जवळून अनुभवण्याची संधी मिळाली तर त्यांच्यातील त्याग बलिदान देशसेवा यांची ओळख होते. अशाचप्रकारे चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रातील जवानांना अनुभवण्याची संधी राजा नारायणलाल लाहोटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी भेटीदरम्यान घेतली.
लाहोटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य कर्नल श्रीनिवासुलु यांच्या मार्गदर्शनाखाली चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. विद्यार्थ्यांना केंद्रातील संरक्षणासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक शस्त्रे जवळून पाहायला मिळाली व तेथील जवानांनी या शस्त्रांची सखोल माहिती त्यांना दिली असता अत्याधुनिक शस्त्रे पाहून विद्यार्थी चांगलेच भारावून गेले होते. इयत्ता दहावी वर्गातील एकूण 159 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता.
देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या जवानांची व व प्रशिक्षण केंद्रात त्यांना मिळणारे प्रशिक्षण याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्यात राष्ट्रभक्ती व देशप्रेमाची भावना प्रबळ व्हावी म्हणून या भेटीचे आयोजन केले असल्याचे विनोद चव्हाण यांनी सांगितले. यादरम्यान विद्यार्थ्यांनी जवानांशी संवाद साधला असता जवानांनी युद्धात संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर कशा पद्धतीने करता येतो याची सखोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. या शास्त्रांमध्ये 5.56 एमएम इन्सस रायफल, एसएलआर, ९ एमएम पिस्तूल, एक्स-95 असॉल्ट रायफल, एके 47, 51 एमएम मोटर, 7.62 एमएम एसएसजी, 84 एमएम कार्ल गुस्ताफ रॉकेट, एजीएस, अँटी मटेरियल रायफल, बायानोकुलर, ट्वीन टेलिस्कोप, सीजीआरएल 84 एमएम, युबिजीएल 40 एमएम, 81 एमएम मोटर ई1 अशा अनेक भारतीय व परदेशी शस्त्रांचा समावेश होता. यावेळी भारतीय सैन्यावर आधारित चित्रपट ही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला व प्रशिक्षण केंद्रातील जवानांचा परेडचे आयोजन करण्यात आले होते. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक प्रवीण राठोड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक कमांडंट उत्तम कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी कॅप्टन बीके भालेराव, विनोद चव्हाण शैलेंद्र डावळे, सुनील मुनाळे, श्रीपाद गंगापूरकर, हनमंत थडकर, जास्मिन शेख, शुभांगी आयाचीत, शीतल औटी, मनीषा वराडे आदींची उपस्थिती होती.
चाकुर बीएसएफ हा माझ्यासाठी एक नविन अनुभव होता. मी तेथील परेड पाहिल्यानंतर माझ्या अंगावर शहारे आल्यासारखे वाटले . बीएसएफ भेटीमुळे मला जवानांचे जीवन समजले. भारताच्या फक्त सीमेवरच नाही तर भारताच्या आत मधे सुद्धा ते खुप संघर्ष करतात. बीएसएफ प्रशिक्षण केंद्रात सामान्य व्यक्तिला सर्वश्रेष्ठ योद्धा बनवतात. तिथे मी युद्धात वापराले जाणारी वेगवेगळी शस्त्र पाहिली यामुळे मी भाराऊन गेले.
—- समृद्धी बनसोडे
चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देताना जवान.
चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असिस्टंट कमांडंट उत्तम कांबळे.