विशेष लेख
भारताला स्वातंत्र्य मिळाले याला आता 75 वर्षे झाली आणि आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. काळासोबत पुढे जाताना काही क्षण थांबून आपण कुठवर आलो आहोत याचं सिंहावलोकन करण्याचा हा काळ आहे. 75 वर्षांचा हा कालावधी आपण प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी गुंतवलाय आणि याचं फलित म्हणून आपण आपल्या देशाचा दरारा जागतिक पातळीवर नेलाय. आज मागास देशापासून सुरुवात करुन प्रगतीशील ते प्रगत देश असा आपण प्रवास या 75 वर्षात झालेला आहे.
भारतात विदेशी आक्रमणाची परंपरा राहिलेली आहे. ही आक्रमणे होण्यापूर्वी भारताची ओळख जागतिक आर्थिक महासत्ता अशीच होती. जगाच्या अर्थकारणात भारताचा वाटा 32.9 टक्के इतका होता. अगदी मुगल काळातही हा वाटा 24.4 टक्के इतका होता. संपूर्ण युरोपीयन देशांचा त्यावेळी असणारा वाटा 23.3 टक्के होता. यावरुन आपली आर्थिक ताकद लक्षात येते. यामुळेच जगभरात भारताचा उल्लेख सोनेकी चिडीया असा होत असे.
15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपला एकूण जीडीपी 2.7 लाख करोड इतका होता आणि जागतिक पातळीवर आपला वाटा केवळ 3 टक्के होता. इतकी आर्थिक घसरण झाली होती. मात्र स्वातंत्र्य प्राप्ती नंतर देशाने विकासाची कास धरली आणि आपण 5 ट्रीलियन इकॉनॉमी चे उद्दीष्ट गाठण्यासाठी मार्गक्रमण सुरु केले आहे. सध्या आपली जीडीपी 3.535 ट्रीलियन अमेरिकन डॉलर आहे. जगातील 5 संपन्न व सधन देशात आपण आहोत.
जागतिक स्तरावर सर्वाधिक उत्पन्न कमावणाऱ्या व्यक्तीच्या यादी पहिल्या 10 मध्ये 2 भारतीय आहेत. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या क्रमवारीत आपला क्रमांक चीन खालोखाल जगात दुसरा आहे. ही लोकसंख्या हीच आपली खरी शक्ती आहे. आज जागतिक पातळीवर सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून आपल्या देशाकडे बघितले जाते आणि दिवसेंदिवस भारताची ताकद यामुळेच वाढताना आपणास दिसते.
केवळ बाजारपेठच नाही तर जागतिक स्तरांवर गुंतवणूक करण्यासाठी देखील युरोप किंवा पूर्व आशियाई देशांपेक्षा भारताला प्रथम पंसती दिली जाते. भारतात कोविडच्या काळात आर्थिक पातळीवर किंचित पिछेहाट झाली असली तरी जागतिक इतर देशांपेक्षा चारपट अधिक वेगाने येथे अर्थव्यवस्था धावायला लागली आहे.
कधीकाळी साप आणि वाघांचा देश अशी असणारी आपली ओळख मागे टाकून भारत जगातील महत्वाचे पर्यटन केंद्र बनला आहे. जगातील 7 आश्चर्ये मानले जाणाऱ्या वास्तूंपैकी एक असलेला ताजमहाल असो कि विश्ववारसा म्हणून ओळख असलेल्या अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या या सर्वांसोबतच बौध्द धर्माचे उगमस्थान असणारा देश म्हणून जगभरातून पर्यटक भारतात येतात ही आपली नवी ओळख झाली आहे.
गेल्या 75 वर्षांच्या कालावधीत देशाने तंत्रज्ञानात गाठलेली उंची बघून सर्वच जण आवाक होवून जातात आपण कोणतीही साधन-सुविधा नसताना 75 वर्षांमध्ये थेट मंगळापर्यंत मजल गाठली. दुसऱ्या बाजूला आपल्या देशापेक्षा काही तास आधी स्वातंत्र्य मिळालेला देश मात्र आजही घुसखोरीचा प्रयत्न करतो आहे. मंगळ गाठणं शक्य नसल्यानं कदाचित होत असेल असं. सोबतच आपण 5 जी तंत्रज्ञानापर्यंत देखील पोहोचलो आहोत. 75 वर्षांनी आपण एका टप्प्याला निश्चितपणे पार केलय आणि ही तर केवळ सुरुवात मात्र आहे.
प्रशांत दैठणकर
(जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी)