30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्या*साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले गेले*

*साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले गेले*

थोर लेखक , अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष नि कुलगुरू डॅा. नागनाथ कोत्तापल्ले यांचे दु:खद निधन

औरंगाबाद – मराठी साहित्यसृष्टीत एक अक्षर नाममूद्रा कोरणारे सकस लेखक , समीक्षक , कवी व मराठी विषयाचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व विभागप्रमुख , अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाने सन्मानित , डॅा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यक्षम व विकासाभिमुख कर्तबगार – दमदार कुलगुरू , समाज परिवर्तन चळवळींचे आधारस्तंभ , शेकडो विद्यार्थी व संशोधक सहकारी यांचे पाठीराखे , सडेतोड व निर्भयपणे मत मांडणारे विचारवंत , प्रागतिक चिंतनशीलतेचे प्रतिक प्रा. डॅा. नागनाथ कोत्तापल्ले यांचे आज दुपारी दीड वाजता वेदनादायक निधन झाले. मराठवाड्यातील मागास अशा ग्रामीण भागातून पुढे आलेला स्वयंप्रभा , स्वयंप्रज्ञा धारक नि स्वयंप्रकाशित प्रतिभावान हरपला …. !

ज्येष्ठ समीक्षक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे : साठोत्तरी कालखंडात कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मयप्रकारांत दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक -समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे  असा परिवार आहे.

व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे कोत्तापल्ले यांना पंधरा दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात ते कृत्रिम श्वासोच्छ्वासावर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही परीक्षांत मराठवाडा विद्यापीठात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते कुलपतींच्या सुवर्णपदकाने सन्मानित झाले होते. ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली.

बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले. १९९६ ते २००५ या कालावधीत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून काम केले. २००५ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. व्यासंगी, अध्यापनकुशल, उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक या पदांवरून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था आणि साहित्य अकादमी या संस्थांच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष (१९८८-१९८९), महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विविध विद्यापीठांच्या मराठी अभ्यास मंडळांचे ते सदस्य होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीगोंदा येथे १९९९ साली झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आणि २००५ साली जालना येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. चिपळूण येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. 

विनम्र आदरांजली ..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]