‘पुणे ;दि.
साहित्यदीप प्रतिष्ठान’चा १६६ वा कार्यक्रम ७ मे २०२२ रोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे. येथे संपन्न झाला. या समारंभात ‘कथादीप’ हा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ कथालेखिका मा. मंगला गोडबोले यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’च्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी केले. ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध वक्ते, लेखक, कार्याध्यक्ष मा. मिलिंद जोशी, प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध कथालेखिका मा. नीलिमा बोरवणकर तसेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ कथालेखिका मा. मंगला गोडबोले यांची थोडक्यात ओळख करून दिली.

या कार्यक्रमामधे ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’चे कार्याध्यक्ष श्री. धनंजय तडवळकर तसेच सल्लागार श्री. वि सु चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपले मनोगत मांडताना सुप्रसिद्ध ज्येष्ठ कथालेखिका मा. मंगला गोडबोले म्हणाल्या, सृजनशील व्यक्ती अनेक कलाप्रकारांमधे किंवा क्षेत्रामध्ये काम करू पाहते परंतु त्यांनी तरुण पिढीला सल्ला दिला की सगळ्या गोष्टी एका वेळी न करता निवड करा. समकालीन समाजजीवन, माणसांमधल्या परस्पर संबंधांबद्दलचे कुतूहल, बदलत चाललेला समाज आणि या मधली विसंगती या मधून कथेचे बीज सापडत गेले. स्त्रीवादी नाही पण सामान्य स्त्रीचे आयुष्य केंद्रस्थानी ठेवून लिहिताना वरवर विनोदी अंगाने लिहिले तरीही त्याचा आशय अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे. कथालेखन किंवा कुठलाही साहित्य प्रकार हा कमी दर्जाचा नाही. मनामध्ये असलेल्या कथाबीजांनी कायम सोबत केली. आपल्या कथा लेखनाने आपल्या आयुष्याला सुरेख व्यग्रता दिली. आपल्या स्वत्वाशी प्रामाणिक रहात लिहित रहाण्याचा उत्साह या पुरस्कारामुळे मिळाला असे त्या म्हणाल्या.

प्रमुख पाहुण्या मा.नीलिमा बोरवणकर यांनी मा. मंगला ताई गोडबोले यांचा कथा प्रवास उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, मा. मंगलाताईंचे कथालेखन विनोदी असो किंवा नसो, कथेच्या घाटा मध्ये व्यवस्थित लिहिलेले आहे. त्यांच्या विनोदी कथांमधील अतिशयोक्ती ही अगदी हलकीफुलकी, विरोधाभास दाखवण्यापुरतीच आणि तरी सुध्दा आशयसमृद्ध आहे. हे त्यांनी सोदाहरण विशद केले. त्यांचा विनोद खुसखुशीतपणे व्यवस्थेवर सौम्य प्रहार करणारा आहे. कटू आणि निराशाजनक घटनाही विनोदी अंगाने येतात आणि आपल्याला अंतर्मुख करून जातात असे त्या म्हणाल्या.

मा. मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात म्हणाले, गेली पन्नास वर्षे सातत्याने लिखाण करताना मंगलाताईंनी विनोदी वाटणारा कथांचा आशय हा सामाजिक सपाटीकरण, सर्व पातळ्यांवर होणारा मूल्य ऱ्हास, बदलत्या काळाची आव्हाने, तरुण पिढीची जीवनशैली असा समग्र अनुभव देत हसत-खेळत आपल्यासमोर मांडला आहे. लेखनसातत्य, दर्जा, वाचनीयता हे त्यांच्या लिखाणाचे मोठे गुण आहेत. आवडत्या लेखिकेला आपल्या हातून पुरस्कार देणे ही त्यांची पूजा बांधली जाणे आहे असे सांगत अतिशय खुसखुशीत शैलीत त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सूत्रसंचालन शिल्पा जोशी जगनाडे यांनी गोड, सहज आणि सुंदर भाषेमध्ये केले.

कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रामध्ये सुप्रसिद्ध सूत्रसंचालक आणि अभिवाचक अक्षय प्रभाकर वाटवे यांनी मा. मंगला गोडबोले यांच्या ‘आडवी रेघ’ या कथेचे अभिवाचन करून रसिकांची मने जिंकली.
सुप्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे ,कवयित्री चिन्मयी चिटणीस ,तसेच प्रतिष्ठानच्या सदस्य कवयित्री माधुरी गयावळ ,प्रतिभा पवार ,श्री सतिश गयावळ इत्यादींनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
मा. मंगलाताई गोडबोले यांच्या लेखनशैली इतकाच खुसखुशीत, प्रसन्न, झुळूकणारा असा ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’चा हा ‘कथादीप’ पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
(शब्दांकन-माधुरी गयावळ)