आमचे आजोबा नेहमी म्हणायचे, ह्या पोरासोरांच्या काळात आणि आमच्या जुन्या काळात एक मोठी फट हाय, ती म्हणजे हे लोकं भितीवर लटकावलेल्या कागदी पुंगळीवर वार बघून जगणं पुढं लोटतात.. अन आमी लोकं आकाशाकड बघून आमचे दिवसं ठरवतो … आमच्या जिंदगानीत उद्या काय होईल याची अजिबात काळजी नव्हती, न आम्हाला व्यायाम वेगळा करावा लागला नाही की जगण्याचं वेगळं गणित मांडव लागलं… आमचं तांबड फुटायचं रानात अन दिवस मावळायचा रानात… पाखराच्या जगण्यातली सुरावट अन आमच्या जगण्याचा नाद एकच म्हणायचा…!!
आता आपलं जगणं कॅलेंडरच्या आधीन आहे हे मान्यचं करावं लागतं… आजोबा सावली बघून वेळ सांगायचे आम्हाला घड्याळाकडे बघून वेळ सांगावी लागते… भौतिक प्रगती माणसाचं यंत्र करते आहे हे वेगळं सांगायला नको.. निसर्गाने पायं चालायला दिलेत हेच आपण विसरून गेलोय.. त्यामुळे शरीराने जगण्याचे फंडेच बदलले… नको ते आहारात आले आणि फॅट वाढले.. अतिरिक्त फॅट बरोबर बीपी, शुगर नावाचे आधुनिक जगाचे रोग जडले.. त्याबरोबर घरात औषधाच्या गोळयाची छोटी डीस्पेन्सरीच करावी लागते आहे… प्रगतीचा वेग आणि जगण्याची गुणवत्ता याची सांगड जुळत नाही हेच खरे… डॉक्टर सांगतय ज्वारीची भाकर खा.. आम्हाला मालदांडी, बडी ज्वारी म्हणून संकर ज्वारी मॉलवाले डोक्यावर मारतात.. आम्हाला ऑरगॅनिक अन्न म्हणून कोणते सत्व बाजार आमच्या पोटात घालतो आहे हा सध्याचा यक्ष प्रश्न आहे…!!
जाऊ द्या यार, म्हणून फार काही विचार करून रेझोलुशन करण्याच्या निदान भानगडित न पडता वर्तमान सुखरपणे जगण्याचा प्रयत्न आहे.. कल के लिए आज क्यूँ खोना.. कल जो होगा देखा जायगा… हा आयुष्याचा मंत्र ठेवून कॅलेंडर आणि घड्याळ हे अपरिहार्य आहे… ते सोबत ठेवून स्वतःची स्पेस मिळेल त्या वेळी असं जगू की दादा याद आयेंगे..!!
असो.. सर्व स्नेहीजणांना 2024 नवीन वर्षाच्या अनंत शुभेच्छा.. असेच सोबत राहू या…!!
@युवराज पाटील
(जिल्हा माहिती अधिकारी, लातूर )