लातूर दि.8 ( प्रतिनिधी) लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील विविध प्रक्षेत्रावर आज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे मॅडम, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत साहेब यांनी आज सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये भेट देऊन गोगलगायी जमा करून नियंत्रण करता येते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. याप्रसंगी केशव देशमुख व अच्युतराव देशमुख यांच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन शेतक-यांनी मजूरामार्फत गोगलगायी जमा करून मिठाच्या पाण्यात बुडवून नष्ट केल्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
बांधावर ज्या ठिकाणी तूराट्या, धसकटे, पाचट, गवत जमा करून ठेवलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायी आढळून आल्या. त्या जमा करून मिठाच्या पाण्यात बुडवून नष्ट केल्या. बांधाच्या चारही बाजूंनी बांधाच्या आतून चून्याचा पट्टा मारावा. तसेच सूतळीचे बारदाना गूळाच्या पाण्यात भिजवून आदल्या दिवशी बांधावर जमेल तसे टाकून बारदान्याच्या खाली जमा झालेल्या गोगलगायी साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात असेही आवाहन याप्रसंगी केले.
सोयाबीन पीक रोप अवस्थेत असताना नूकसान करताना गोगलगाय आढळून येत आहे. अशा प्रसंगी स्नेलकिल औषधांच्या छोट्या छोट्या गोळ्या करून बांधाच्या बाजूने पाच ते सात फूट अंतरावर टाकाव्यात. किंवा गोळ्यांचे पावडर करून पेस्ट तयार करावी. तयार पेस्ट मूरमू-याला लावून बाधीत क्षेत्रात टाकावी. पेस्ट गोगलगायीने खाल्यानंतर चार ते पाच तासात शरीरातील स्त्राव बाहेर पडुन मरतात. अशा प्रकारे
गोगलगायचे नियंत्रण करता येते असे रक्षा शिंदे मॅडम यांनी सांगितले. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी सचिन कडवकर, कृषी पर्यवेक्षक ओमप्रकाश चिंताले, सूर्यकांत लोखंडे, कृषी सहाय्यक प्रियंका गिरी, प्रगतशील शेतकरी केशव देशमुख, अच्युतराव देशमुख, दिपक येलगट्टे, मधूकर वाघमारे व महिला मजूर उपस्थित होते.