ज्येष्ठ नागरिकांना उत्तम आहार,झोप आणि व्यायाम या तीन उत्तम मित्रांची सोबत करावी आयुष्य सुंदर होईल
– मनसोपचारतज्ञ डॉ. आशिष चंपुरे
लातूर दि.1 ( वृत्तसेवा ) ज्येष्ठ नागरिकांनी जगणे सुंदर करायचे असेल तर वेळच्या वेळी झोप, उत्तम संतुलित आहार आणि रोजचा व्यायाम या तीन गोष्टी बरोबर घनिष्ठ दोस्ती करावी तसेच नेहमी सकारात्मक राहावे त्यातून नवी ऊर्जा मिळते अशी माहिती विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे मनसोपचार तज्ञ डॉ. आशिष चंपुरे यांनी दिली.
जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय सभागृहात समाजिक न्याय विभागाकडून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त आयोजित केलेल्या ‘ज्येष्ठ कृतज्ञ सोहळा ‘ आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ नागरिक संघ, लातूरचे सचिव प्रकाश धादगीने, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती प्रियंका कांबळे, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार , सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, डॉ. धनंजय गायकवाड, संचालक, मैत्री फाऊंडेशन, लातूर, ज्येष्ठ नागरिक दक्षिण मराठवाडा विभाग अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, डॉ. मायाताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन ही गोष्ट गरजेची असते. त्यांच्या मागे राहू, केतू सारखे मागे लागलेले रक्तदाब आणि मधुमेह. हे जर नियंत्रणात ठेवायचे असतील तर वेळच्या वेळी सकस आहार, उत्तम झोप आणि झेपेल एवढा हलका व्यायाम या तीन गोष्टी मित्रांसारख्या जपा आनंद जगाल असा मोलाचा सल्ला डॉ. चंपुरे यांनी यावेळी दिला.
डॉ. धनंजय गायकवाड यांनी आयुष्यात सकारात्मक राहण्याचे धडे दिले. प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार यांनी समाजिक न्याय विभागाकडून राबविल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. डॉ. बी. आर पाटील यांनी ज्येष्ठाच्या अपेक्षा व्यक्त केल्या.

103 वर्षाच्या ज्येष्ठाचा केला सत्कार
लातूर येथील ज्येष्ठ नागरिक दिगंबर नरसिंग राव कुलकर्णी हे 103 वर्षाचे आहेत. त्यांचा सत्कार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी सभागृहाने टाळयाच्या गजरात त्यांना मानवंदना दिली.यावेळी माधव गादेकर, एस. बी. पठाण, प्रभाकर बोळेगावकर, सिंधु सुधाकर राजहंस या सर्व ज्येष्ठ नागरिकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबीर
दरवर्षी दि.01 ऑक्टोंबर हा दिवस जागतीक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून दिनांक 01/10/2023 रोजी जिल्हा क्रिडा संकुल, लातूर येथे सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर व अपोलो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर यांचे संयुक्त विद्यमाने जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर आरोग्य शिबीरामध्ये 248 जेष्ठ महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवून आपले आरोग्याची तपासणी केली. सदर आरोग्य तपासणी शिबीरामध्ये बी.पी, शुकर, ईसीजी इत्यादी तपासणी करण्यात आल्या. सदर आरोग्य तपासणीमध्ये मा.श्री. मनोज कदम, संचालक, अपोलो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, लातूर, डॉ. अभय कदम, डॉ. खोसे सर, डॉ. बिरादार सर, डॉ. शेटे सर, डॉ. यादव सर, डॉ. नागुरे सर तसेच अपोलो हॉस्पिटलमधील परिचारिका, फॉर्मासिस्ट व इतर कर्मचारी तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर या कार्यालयातील कर्मचारी यांनी सदरचे शिबीर यशस्वी करण्यास योगदान दिले. सदर शिबीरामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या कॅलेंडरचे वाटप करण्यात आले.