लातूर ;दि.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर (रुई) येथे आयोजित ‘राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती – राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेत अत्यंत चुरशीची झुंज होऊन त्यात निलंगा तालुक्यातील मौजे रामलिंग मुदगड येथील सागर बिराजदार हे विजयी ठरले तर रामेश्वर येथील भरत कराड हा उपविजेता ठरला. विजेत्या सर्व खेळाडूंना विश्व शांती केंद्राचे अध्यक्ष प्रा डॉ विश्वनाथजी कराड साहेब, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, माजी सरपंच तुळशीरामआण्णा कराड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा बुधवारी रामेश्वर येथे पार पडली या स्पर्धेत खुल्या गटातील महाराष्ट्र महावीर स्पर्धा सागर बिराजदार आणि भरत कराड यांच्यात झाली अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत दहा विरुद्ध पाच या गुणांनुसार सागर बिराजदार यांनी विजेतेपद पटकावले त्यांना 71 हजाराचे पारितोषिक सुवर्णपदक आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले तर उपविजेता ठरलेल्या भरत कराड यांना 31 हजार रुपये आणि रौप्य पदक देऊन गौरव करण्यात आला राहुल सुड सातारा आणि सागर मोहोळकर अहमदनगर यांना अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
दिवसभरात झालेल्या स्पर्धेत 84 किलो वजन गटात श्रीकृष्ण जाधव लातूर, 74 किलो वजन गटात नामदेव कोकाटे पुणे, 70 किलो वजन गटात देवानंद पवार रामेश्वर, 65 किलो वजन गटात महेश तत्तापुरे रामेश्वर, 61 किलो वजन गटात तुषार माने सांगली आणि 57 किलो वजन गटात आकाश गडदे रामेश्वर यांनी विजेतेपद पटकावले स्पर्धेतील सर्व प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेल्या कुस्ती खेळाडूंचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, प्रदेशाचे अमोल पाटील, दत्ता पाटील अंबाजोगाई, साहेबराव पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दिवसभरात झालेल्या कुस्ती स्पर्धेला रामेश्वर आणि परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.