लातूर, दि. १९ : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दि. २३ व २४ जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ४ थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली. सांगोला हे दिवंगत लोकनेते स्व. आ. भाई गणपतराव देशमुख यांची कर्मभूमी असल्याने यावर्षीचे हे साहित्य संमेलन त्यांच्या नावाने संपन्न होत असल्याचे सांगून डॉ. टकले पुढे म्हणाले की, या साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवार, दि. २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर.एस. चोपडे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. राम शिंदे, पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे,श्रीमती रतन गणपतराव देशमुख, आ. गोपीचंद पडळकर,आ. रामराव वडकुते,आ. प्रशांत परिचारक,आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साहित्य संमेलनाच्या समारोपासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्ली विधानसभेचे आमदार दिनेश मोहनिया ,माजी मंत्री आ. दत्ता भरणे, अण्णासाहेब डांगे,आ. शहाजीबापू पाटील, यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोल्याच्या नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रा. पी.सी. झपके,छायाताई मेटकरी,स्वातीताई मास्केयांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. धनगर सारा एक या विषयावरील परिसंवादात ख्यातनाम साहित्यिक संजय सोनवणी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर धनगरांचा गौरवशाली इतिहास या विषयांवर प्रा. राम लाड, अविनाश धायगुडे आपले विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रकांत हजारे हे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही डॉ. टकले यांनी सांगितले. संमेलनाचे उपाध्यक्ष संभाजीराव सूळ यांनी यावेळी बोलताना दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध विषयावरील परिसंवाद,चर्चासत्र, कवी संमेलन,सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे सांगितले. कोणतीही शासकीय मदत न घेता समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्याने हे संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन सांगोला येथे घ्यावे अशी दिवंगत आ. गणपतराव देशमुख यांची इच्छा होती. म्हणून यावर्षीचे हे संमेलन त्यांच्या नावे संपन्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या साहित्य संमेलनास राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी प्राचार्य मधुकर सलगरे, सांगोल्याचे विस्तार अधिकारी टकले , केसाळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. चंद्रकांत हजारे यांनी या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली. ———————–