ज्येष्ठ सहकार – शेतकरी नेते
शंकरराव कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
………..
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे आणि त्याला बौद्धिक, वैचारिक आधार देणारे ज्येष्ठ नेते,
सहकार क्षेत्राचे अग्रणी असलेले शंकरराव गेनुजी कोल्हे यांचे आज पहाटे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाल्याची दुःखद बातमी काही वेळापूर्वी समजली.
ते काही काळ नाशिकच्या सुश्रुत इस्पितळात होते,तेथेच आज पहाटे त्यांचे निधन झाले.
कोल्हेसाहेबांना माझी
भावपूर्ण श्रद्धांजली!
महाराष्ट्राच्या सहकार शेती आणि पाणी या क्षेत्रात ज्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने आणि शेतकऱ्यांची बाजू घेत ती भूमिका लढवत सातत्याने कार्य केले, अशा काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक मोठे नेते होते.

कोल्हे साहेबांना सहकार मंत्री असताना, महसूल मंत्री असताना त्यांच्या गाडीतून अनेकदा प्रवास करण्याचा योग आला. नवनवीन विषय त्यांच्या बोलण्यात असायचे. गोदावरीचे पाणी, त्या पाण्याचा विनियोग आणि वाटप, उसाची शेती, आपल्या कृषी विद्यापीठांची कामे आणि संशोधन सहकार क्षेत्राचे अवलंबित्व असे अनेक विषय ते सांगत असत.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे संजीवनी सहकारी साखर कारखाना त्यांनी सुरू केला. त्या कारखान्याची सुमारे पंचवीस ते तीस वर्षांची वाटचाल संपत असताना एका अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संपादन करण्याची जबाबदारी कोल्हे साहेबांनी माझ्यावर टाकली.
‘महाराष्ट्र :विकासाचे नवे प्रवाह,या शीर्षकाचा सुमारे चारशे पानांचा ग्रंथ १९९४ साली कोपरगाव येथे प्रकाशित झाला. या ग्रंथात शेती, सहकार, पाणी, कृषी विद्यापीठ, शेतकरी चळवळ, सहकारी संस्था ,साखर कारखाने असे अनेक विषय होते. त्या निमित्ताने माझा अनेक नेत्यांशी आणि विद्वान मंडळींशी नव्याने परिचय झाला. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द.ना. धनागरे,डॉ.कुमुद पोरे,
डॉ.गो.स.कामत, डॉ. शंकरराव मगर, डॉ.माधवराव चितळे,असे कितीतरी लोक यानिमित्ताने भेटले, त्यांच्याशी मला बोलता आले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या संपदा मासिकाचे संपादक असलेले आणि इंग्रजीचे प्राध्यापक, माझे मित्र सुधाकर जोशी यांनी या ग्रंथांमध्ये संजीवनी मार्ग म्हणून एक विस्तृत असा पन्नास ते साठ पानांचा भाग समाविष्ट केला आहे ,त्यातून शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी साखर कारखाना सुरु करताना आणि तो विस्तारताना जो विचार पुढे ठेवला, त्याचा तपशीलवार प्रवास यात आपल्याला वाचायला मिळतो.
यानिमित्ताने कोल्हे साहेबांशी खूप चर्चा झाली, खूप गप्पा झाल्या. मुंबईत मंत्रालयात मी आणि सुधाकर जोशी बोलायला जात असू ,याखेरीज संजीवनी कारखान्याच्या कोपरगावमधील विश्रामगृहात कोल्हे साहेबांना आम्ही अनेकदा भेटत असू. पांढरा स्वच्छ पोशाख आणि डोक्यावर एक कडक पांढरी टोपी या पोशाखात कोल्हेसाहेब काही वेगळेच दिसायचे. त्यांचा रांगडेपणा, त्यांची स्पष्टवक्ती भूमिका आणि या सर्वातून त्यांचा दिसणारा अभ्यास असे हे एक वेगळेच रसायन होते.
लोकसत्तामध्ये काम करत असताना इंदापूरमधील सहकार क्षेत्रातल्या काही प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार होते, त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. तेथे साखर कारखान्याने एका मंगल कार्यालयाच्या हॉलचे उद्घाटन केले होते.शरद पवार यांनी भाषणात याचा उल्लेख केला आणि असे सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांनी कोणती कामे करावीत आणि कोणते पदार्थ निर्मिले पाहिजेत याचा अभ्यास करण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शंकरराव कोल्हे यांच्या संजीवनी कारखान्याला भेट द्या! ते अतिशय बरोबर असे होते.
कोल्हेसाहेबांनी अनेक छोटी मोठी उपपदार्थांची उत्पादने संजीवनीच्या माध्यमातून सुरु ठेवली होती. त्याचा फायदा साखर कारखान्याला मिळत होता.
काँग्रेसमधील राजकारणात आणि त्यातही कोपरगावमधील राजकारणात कोल्हे साहेबांची बरीच शक्ती आणि बुद्धी खर्च झाली, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तेथील काळे – कोल्हे वादाचे स्वरूप काही जरी असले तरी या स्वरूपाच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांचा निश्चितच काही काळ गेला. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राच्या राजकारणातील या गोष्टी मोठ्या प्रमाणात झाल्या नसत्या तर त्या त्या विभागांचे सर्वांगीण विकासाचे एकूण चित्र अधिक बदलले असते, असे वाटते.
अर्थात कोल्हेसाहेबांनी यावरही मात करून अनेक गोष्टी केल्या. त्यांनी कारखान्याच्या आधाराने दुग्ध व्यवसाय वाढवला, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. सहकार क्षेत्रातील एक जाणता नेता म्हणून मी त्यांना नेहमीच आदराने पाहत असे.
गेल्या काही वर्षात त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना आज भेटायला जाऊ,उद्या भेटायला जाऊ असे करत मला जमले नाही. काही वेळापूर्वीच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली आणि त्यांचे एक
मनमोकळे आणि तरीही तडफदार असलेले व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभे राहिले.
कोल्हेसाहेबांच्या सर्व कुटुंबियांना आम्हा सर्वांच्या सहसंवेदना. संजीवनी साखर कारखाना परिवारातील सर्वांना सहसंवेदना.
अरुण खोरे, पुणे.
(बुधवार,दि.१६ मार्च,२०२२).