सशस्त्र सेना ध्वजदिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा गौरव
• सैनिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रम, योजनांसाठी होतो निधीचा वापर
मुंबई, दि. ०७ ( माध्यम वृत्तसेवा):– लातूर जिल्हा प्रशासनाने गतवर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करीत मराठवाड्यात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या कामगिरीबद्दल आज, सशस्त्र सेना ध्वजदिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्यासह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद प्रकाश पांढरे (नि.) यांना राजभवन येथे गौरविण्यात आले.
फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंग, व्हीएसएम जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा, एअर व्हाइस मार्शल रजत मोहन, माजी सैनिक विभागाच्या प्रधान सचिव अंशु सिन्हा यावेळी उपस्थित होत्या.
देशाच्या सुरक्षिततेसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैन्य दलातील जवान, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यासाठी दरवर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलित केला जातो. सर्वसामान्य नागरिकांना सैन्यदलाप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातून मिळते. माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी ७ डिसेंबर हा ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्ताने ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलित केला जातो.
देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडी-अडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसाह्य व्हावे, यासाठी त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. लातूर जिल्ह्याला सुमारे ४१ लाख रुपयांचे उद्दिष्ट असतानाही ‘संकल्प हीच सिद्धी’ या संकलपनेतून १ कोटी १२ लाख रुपये ध्वजदिन निधी संकलित करण्यात आला.
सैनिकांसाठीच्या उपक्रमाविषयी झालेला गौरव सर्वाधिक आनंददायी : जिल्हाधिकारी
देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचा धाडसाने सामना करून आपले रक्षण करणाऱ्या सैन्य दलाप्रती प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराची भावना आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी योगदान देण्याचा प्रयत्न लातूर जिल्हा प्रशासनातील प्रत्येक घटकाने केला. लातूर जिल्हा प्रशासनाच्या या योगदानाची दखल घेवून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज जिल्हा प्रशासनाची प्रतिनिधी म्हणून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले. सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल झालेला हा गौरव सर्वाधिक आनंददायी असल्याची भावना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केली.