माझे मित्र दिलीप धारूरकर यांचे निधन ही माझ्यासाठी फार मोठी धक्कादायक बातमी होती. मी 24 तास तिच्यातून स्वत:ला सावरू शकलेलो नाही. आता त्यांच्यावर चार शब्द लिहीत आहे. दिलीप धारूरकर हे कसे चमत्कार वाटावे असे व्यक्तिमत्त्व होते हे सांगावेसे वाटते.
उमरग्याचे धारूरकर म्हणजे अनिल, विजय आणि दिलीप हे बंधू त्या परिसरात अतीशय बुद्धिमान भावंडे म्हणून ओळखले जात होते. शिवाय ते रा. स्व. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक. त्यांच्या घरची स्थिती फार गरिबीची होती आणि ते मी जवळून पाहिले आहे. मी अ.भा. वि.प, चे काम करीत असताना उमरग्याला गेलो की, मुक्काम त्यांच्याच घरी असायचा. त्यावेळी दिलीप धारूरकर हे सातवीत किंवा आठवीत होते. या भावंडांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रक्तात पत्रकारिता होती. ती पत्रकारिता प्रकट करण्याचे साधन म्हणजे सोलापूरचा दैनिक संचार. विजय धारूरकर त्यात काही बाही लिहीत. त्याचाच संस्कार दिलीपराव यांच्यावर झालेला.
ते लातूरला तंत्रनिकेतनात सिव्हिलचा डिप्लोमा करायला आले. पण डिप्लोमाला असलेला हा विद्यार्थी पत्रकारितेपासून दूर राहू शकला नाही. त्या काळात मी लातूरच्या सिद्धेश्वर समाचार मध्ये काम करीत होतो आणि धारूरकर हे कॉलेज संपले की संध्याकाळी राजधर्म या दैनिकांत येऊन बसायचे. कारण पत्रकारितेत सतत काही तरी करण्याची ऊर्मी त्यांना गप्प बसू देत नसे. मग कधी भेट झाली की आपण राजधर्म मध्ये काय काय गमती करीत आहोत हे ते सांगायचे. या कामातून त्यांना काही मानधन मिळत असे. शिक्षणाचा खर्च निघावा हाही त्यामागे हेतू असायचाच..
शिक्षण संपवून ते आधी सोलापुरात दोन तीन वर्षे नोकरी करीत होते. नंतर त्यांची बदली नगरला झाली. तिथेही चांगली सरकारी नोकरी असताना ते सायंकाळी केसरीच्या कार्यालयात बसलेले असायचे. काही तरी लिहिण्याचा त्यांचा छंद तिथे भागायचा. मात्र त्यांची कधी भेट झाली की, पत्रकारितेत करीत असलेल्या गंमतीच सांगायचे.
दरम्यान त्यांचे लग्न झाले होते. त्याचीही माहिती त्यांनी गप्पा मारता मारता सांगितलेली. धारूरकर हे उमरग्याला शास्त्री यांच्या वाड्यात रहायचे. शास्त्री यांची आर्थिक स्थिती चांगलीच होती. संगीता ही त्यांची म्हणजे धारूरकरांच्या घरमालकांची मुलगी. ती सोलापूर तरुण भारतची महाविद्यालयीन प्रतिनिधी म्हणून उमरग्यात काम करायची. एका भेटीत ही माहिती धारूरकरांनीच दिलेली.
संगीताचे शिक्षण संपले आणि तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली तेव्हा तिने एके दिवशी, आपण दिलीपशी लग्न करणार आहोत असे जाहीर करून टाकले. लग्नाचे स्थळ म्हणून तिला कितीतरी आकर्षक ऑफर आल्या असत्या पण तिने ही निवड का केली हे कोणाला पटकन कळले नाही पण या दोघांत पत्रकारितेचा जर्म आहे हेही कारण असेल.
1994 साली देवगिरी तरुण भारतची नगर आवृत्ती काढायचे ठरले तेव्हा त्याची तयारी करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. मी या आवृत्तीसाठी धारूरकरांचे नाव सुचविले. ते मान्य झाले आणि धारूरकर कामाला लागले. त्यांच्यातला इंजिनियर संपला. या आवृत्तीच्या निमित्ताने मी आणि धारूरकर तीन चार दिवस सारा नगर जिल्हा पालथा घातला. तेव्हा त्यांनी केसरी आणि संघाचे काम यातून त्या जिल्हाभरात किती संपर्क प्रस्थापित केले आहेत याचे दर्शन मला घडले. आम्ही ज्या गावात जाऊ तिथे धारूकरांच्या संपर्कातला कोणी तरी असायचाच.
नंतर तरुण भारतात त्यांची कशी कशी प्रगती झाली हे सर्वांना माहीत झाले आहे. त्यांनी तरुण भारत सोडल्यावर प्रेस टाकला आणि त्यात युगंधर हे मासिक काही वर्षे काढले आणि उत्तमरित्या चालवले. पण शिक्षणाने इंजिनियर आणि प्रवृत्तीने पत्रकार असलेल्या धारूरकरांवर एकदम वेगळ्या क्षेत्रातली म्हणजे माहिती आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. किती वेगळे क्षेत्र होते ते. पण त्यातही त्यांनी सर्वांना चकित करून टाकणारी कामगिरी बजावली. त्यांच्या हातून अजून बरेच काम झाले असते पण नियतीला हे मान्य नव्हते.
दिलीप धारूरकर हे सर्वांना चटका लावून गेले.
अरविंद जोशी
9370408926