– माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
● मराठवाडा, विदर्भ विभागात ओला दुष्काळ जाहिर करा●
● मेट्रो नको मराठवाडा वॉटर ग्रीडला निधी द्या●
● गाळपाअभावी शिल्लक ऊस राहणार नाही याचे नियोजन व्हावे●
● रेणापूर येथे कायदा मोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी●
मुंबई प्रतिनीधी : महाविकास आघाडी सरकारने घेतेलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाला विद्यमान सरकारने स्थगिती देऊन राज्याच्या विकास प्रक्रियेला एक प्रकारे खिळ घातली आहे, असे नमूद करुन किमान सर्वसामान्याच्या प्रश्नांशी निगडीत असलेल्या निर्णयावरील स्थगिती तातडीने उठवावी अशी मागणी माजी मंत्री वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली.
माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज राज्यातील विद्यमान सरकारच्या वैधतेवर आणि घेतल्या जात असलेल्या तुघलकी निर्णयावर घणाघाती टिका केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सत्तांतर होऊन असे सरकार पहिल्यांदाच स्थापन झाले आहे की, ज्याच्या वैधतेबाबत सर्वोच्य न्यायालयात लढाई सुरु आहे. या सरकारने सत्तेत येताच महाराष्ट्राच्या हिताच्या अनेक निर्णयाला स्थगिती दिली आहे. सरकार बदलले म्हणून जनतेचे प्रश्न बदलत नसतात याची जाणीव ठेऊन सरकारने स्थगिती आदेश उठवणे गरजेचे आहे. मंत्रीमंडळाच्या 50 टक्के जागा रिक्त असून अजून जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेली नाहीत. त्यात मागील निर्णयाला स्थगिती असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ही परिस्थिती लवकरात लवकर बदलने आवश्यक आहे. सत्तेत आज कोण आहे? उद्या कोण येणार आहे. या पेक्षा जनतेच्या प्रश्नांवर काम होणे गरजेचे आहे.
मराठवाडा, विदर्भ विभागात ओला दुष्काळ जाहिर करा
अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे मराठवाडा व विदर्भातील मोठे नुकसान झाले आहे. विद्यमान कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार यांनी या आपदगृस्त भागाचा पाहणी दौराही केला आहे. अतिवृष्टी बरोबरच गोगलगायी आणि येलो मोझॅक प्रार्दुभावामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झालेले त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ विभागात ओला दुष्काळ जाहिर करावा व या विभागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
मेट्रो नको मराठवाडा वॉटर ग्रीडला निधी द्या
मराठवाडा विभागात कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ असतो या संकटावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भरघोस निधी देऊन लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याला न्याय द्यावा असे सांगत आम्ही मेट्रो मागत नाही असे सांगत मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी भरीव निधी द्यावा अशी मागणी आमदार देशमुख यांनी यावेळी केली.
गाळपाअभावी शिल्लक ऊस राहणार नाही याचे नियोजन व्हावे
मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यात ऊसाचे उत्पादन भरघोस येणार आहे. त्यामुळे सरकारने आताच उपाययोजना आखुन गाळपाअभावी ऊस शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी. साखर कारखान्यांना आवश्यक ती मदत करावी. त्याच बरोबर केंद्र सरकारला विनंती करुन साखर निर्यातीचे धोरण जाहिर करण्यास सांगावे अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
कायदा मोडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी
राज्यात मागच्या दोन महिन्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारला लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे राज्यात अनेक अप्रिय घटना घडत आहेत. पोलिस विभागाकडूनच कायदा मोडला जात आहे. असे सांगुन लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे क्लबवर धाड टाकणाऱ्या पोलिसांनी तेथे अमानुष् मारहाण केल्याचे आमदार देशमुख यांनी निर्दशनास आणून दिले. कायदा मोडणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी या वेळी केली.
———————————————-