आमदार धिरज देशमुख यांचे मत; काटगाव येथे सभागृहाचे लोकार्पण व विविध विकासकामांचे झाले भूमिपूजन
—
लातूर : शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचला पाहिजे, सर्वसामान्यांचे हित झाले पाहिजे, हा काँग्रेस व येथील नेतृत्वाचा ध्यास आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य भाग असूनही अनेक विकासकामे लातूरात आजवर झाली. त्यातून इथल्या ग्रामीण भागाचा विकास झाला. हीच परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाला व आपल्या नेतृत्वाला खंबीर साथ द्यावी, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी येथे केले.

लातूर तालुक्यातील काटगाव येथे आमदार विकास निधीतून बांधलेल्या खंडोबा मंदिर सभागृहाचे लोकार्पण तसेच, हनुमान मंदिर ते दर्गा मार्गावर सिमेंट रस्ता, नाली बांधकाम अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थ, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, लातूरमधील उद्योगांची क्षमता वाढत आहे. ऊस व इतर पिकांची उत्पादन क्षमता वाढत आहे. प्रक्रिया उद्योग वाढत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणार होते. पण, सध्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे हित जपत #लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसू नये म्हणून बिनव्याजी कर्ज देत आहे. उत्पादन खर्च वाढला म्हणून कर्जाची मर्यादा वाढवत आहे. शेतकऱ्यांना अडचण येवू नये या उद्देशाने बँक कार्यरत आहे.

मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले. अनेक अडचणींवर मात करीत सर्व उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप होईपर्यंत व नंतरही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांनी बारीक लक्ष ठेवले. सर्व ऊस गाळप होण्याआधी कारखाना बंद होवू नये, याची त्यांनी काळजी घेतली. गळपाची सांगता होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा आला पाहिजे, याचीही तत्परता त्यांनी दाखवली, असेही आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.

यावेळी रामकृष्ण महाराज लोखंडे, रवींद्र काळे, प्रमोद जाधव, राजेसाहेब सवई, बादल शेख, गोविंद बोराडे, अनंत बारबोले, दत्ता शिंदे, कैलास पाटील, भैरवनाथ सव्वाशे, अनिल पाटील, सरपंच दत्तात्रय गायकवाड, व्यंकट पिसाळ, नरेश पवार, सुरेश चव्हाण, गुणवंत सरवदे, गोविंद बोराडे, सुरेश चव्हाण उपस्थित होते.
—