भावपूर्ण श्रद्धांजली
सामाजिक, कौटुंबिक, साहित्यिक, प्रश्नांची जाण असलेल्या ‘नारी प्रबोधन मंच’च्या संस्थापक सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, गोदावरी शाळेतील विज्ञाननिष्ठ व विद्यार्थी प्रिय माजी शिक्षिका साहित्यिका स्मृतिशेष मालतीताई देउळगावकर. ५ ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले त्या आपल्यातून निघून गेल्या. परंतु त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्या आजही आपल्या सर्वांच्या सोबत आहेत.
मालतीताई मूळच्या कर्नाटकातल्या, त्यांचे शिक्षण आंध्रप्रदेश मध्ये झाले आणि त्यांची कर्मभूमी मराठवाडा होती. परिवर्तनाचे वारे भारत स्वातंत्र्यानंतर ही थोडे उशीराच मराठवाड्यात पोहचले कारण मराठवाड्यातील सात जिल्हे निजामाच्या जोखडा खाली सुमारे अडीचशे वर्षे दबलेले होते. १७ सप्टेंबर १९४८ साली हा परिसर स्वतंत्र झाला. सर्वस्व पणाला लावून मुक्तीसाठी लढणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ इ. नेत्यांनी मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य समोर ठेवून शिक्षण, ग्रामोद्योग आदि क्षेत्रांत नव्या उमेदीने काम करण्यास सुरुवात केली या कार्यात सहकार्य करण्यासाठी अनेकजण सहभागी झाले. ज्यांनी शिक्षकीपेशा व्यवसाय म्हणून न स्वीकारता, परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून स्विकारला अशापैकी एक म्हणजे प्रा. चंद्रकांत देऊळगावकर व त्यांची अर्धांगिणी मालतीबाई देऊळगावकर. मालतीताई पूर्वाश्रमीच्या देशपांडे, त्या गुलबर्ग्यात होत्या तेव्हा त्यांचे बंधू मधुकर देशपांडे यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर ही पडला. त्यांचे बंधू व वहिनी पुष्पा देशपांडे यांनी १९९० साली अमेरिकतून भारतात येऊन, ‘विज्ञानवाहिनी’ ही संस्था स्थापन केली. संचालक व निर्माते मधुकर देशपांडे हे मालतीताईंना नेहमी सहकार्य करत असत. सोबतच सजग ही करत असत. या भावा-बहिणी मध्ये कधीच कौटुंबिक चर्चा होत नसे पत्राद्वारे सुद्धा ते नेहमी विचारत नवीन काय वाचले? कुरुंदकर, दुर्गाबाई यांच्या सारख्या प्रखर बुद्धीच्या व प्रगल्भ लेखन करणाऱ्या साहित्यिकांच्या पुस्तकावर त्यांची चर्चा होत असे. इतकेच नाहीतर विज्ञानवाहिनी द्वारे विज्ञान प्रयोग घेऊन ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग दाखवत असत. ८, ९, १० वीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल उत्पन्न कौतुहल क्षमवण्यासाठी तसेच विज्ञानाबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी ते सातत्याने गेली अनेकवर्ष काम करत आहेत. या संस्थेच्या त्या संस्थापक सदस्य व कार्यकारिणीवर ही होत्या, विश्वस्त ही होत्या. विचाराला तर्काचे अधिष्ठान पाहिजे’ या विचाराबद्दल त्या आग्रही होत्या. त्यांनी ‘विज्ञान’ प्रसाराला महत्त्व दिले.
राष्ट्रसेवादल, कुटुंबातील वातावरण, दूरदृष्टी,अभ्यासक वृत्ती, समाजभान यातूनच १९५५ साली श्री. चंद्रकांतजी देऊळगावकर यांच्या सोबत मालतीताई स्वनिर्णयाने विवाहबद्ध झाल्या. मनाजोगा साथीदार मिळाल्याने त्यांचे व्यक्तिमत्व फुलले, बहरले, जगाकडे कुतुहलाने पहाण्याची वृत्ती आणि चाणाक्ष नजर यातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग त्या कागदावर – उतरवू लागल्या, याला कै. नांदापूरकर व प्रा. भगवंत देशमुख यांनी उत्तेजन दिले. अगदी कमी वयातच त्यांचे लेखन सुरु झाले होते. यातूनच मराठवाडा, साधना, सकाळ, लोकमत, प्रतिष्ठान, लोकप्रभा, अनुबंध इ. मधून त्यांचे लेख, ललितलेख प्रकाशित झाले. लेखना बद्दलची मालतीताईंची भावना ही होती कि, आपण लिहितो ते मनाचे विरेचन व्हावे म्हणून! स्वान्त सुखाय. चंद्रकांत देऊळगावकर यांच्या सोबतच्या पन्नास वर्षाच्या सहप्रवासात योग जमून आला आणि त्यांच्याच आग्रहामुळे सहप्रवासास ५० वर्ष होत असताना निवडक लेखांचा संग्रह प्रकाशित झाला तो म्हणजे ‘मनाचिये गुंफी’, त्यांचा ‘अजब आर्शिवाद आणि गजब गोष्टी’ हा छोट्या दोस्तांसाठीचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. ‘मनाचिये गुंफी’लेख संग्रहास प्रस्तावना व पाठराखण प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व डॉ.शैला लोहिया यांची आहे.
१९८० साली ‘लोकविज्ञान’ संघटनेने संकल्पना देशभरातील ‘सर्वसामान्यांसाठी विज्ञान’ राबवली गेली. तीन दिवस राजस्थान शाळेत हा जथ्था मुक्कामी होता. व्याख्यान, चित्र प्रदर्शन, ध्वनिचित्रफिती असा भरगच्च कार्यक्रम होता. याचे प्रमुख होते आगीवरून चालत जाणे, गालातून सुई आरपार घालणे, नारळातून लाल पाणी काढणे यासारख्या जादूमागील हातचलाखी त्यात उलगडून दाखवली होती. मा. जयंत वैद्य सर आणि सोबत होते मा. सौताडकर सर, मा. अनिरुद्ध जाधव सर, मालतीताई इ. या सर्वानी जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना एकत्र आणले होते. त्यामुळे इतर शाळा ही समृद्ध झाल्या.
स्वातंत्र्यसेनानी पू. बाबासाहेब परांजपे यांनी स्थापन केलेल्या मुरूड येथील ‘जनता विद्यालयात’ प्रथम त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. येथे बहुउद्देशीय शिक्षण दिले जात असे, शेती व औषधी बाग यासारखे विषय होते स्वत: साठी लागणारे धान्य स्वत:च पिकवायचे भाजीपाला मुला-मुलींनीच लावायचा व काढायचा यामुळे श्रमाची लाज वाटत नसे. यातुनच कुटुंबात ही काम करण्याची सवय लागत असे. शेती करणे, शेतीला बांध घालणे, मॅकनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इ. कौशल्य विकसित केली जात. या काळात विद्यार्थ्यांनी शिकवणी वर्ग लावणे हा शिक्षकांचा अपमान समजला जाई. त्यामुळे विद्यार्थ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक सदैव आपली दारे खुली ठेवत असत. त्यांच्या नात्यात आत्मियता, वात्सल्य भाव होता. त्याचबरोबर आदरयुक्त भिती ही असे. करडी शिस्त ही असे. त्यामुळे त्यातूनच विद्यार्थी घडण्याची प्रक्रिया पूर्ण होत असे.
मालतीताईंना खोटी स्तुती आवडत नसे. त्या स्पष्ट वक्त्या होत्या. अगदी परखड बोलत असत. त्यांनी कधी ही कोणाची अवास्तव मनधरणी केली नाही. जे सत्य आहे, बरोबर आहे ते त्या निर्भिडपणे मांडत असत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘मुलगी झाली हो’ या नाटकात त्या काम करत असत. एकदा नाटकाचा प्रयोग आटोपून मुलींना घेऊन परत येताना रात्रीची वेळ होती. पोलिसांनी रेणापूर जवळ त्यांचा टेंपो अडवला, या प्रसंगी हातावर काहीबाही देऊन स्वतःची सुटका न करता महिला कार्यकर्त्यांनी कणखर भूमिका घेतली.
जाती-भेद, धर्म-भेद त्यांनी कधी मानला नाही. अडचणीत असलेल्या अनेक महिलांना त्यांचा आधार वाटत असे. अंतरजातीय विवाह केलेल्या सदस्यांना त्या सतत पाठिंबा देत. त्यांच्या पाठिब्यांमुळे त्या बेघर आणि अनाथ जोडप्यांना आपलं कोणी तरी आहे हा विश्वास वाटत असे. यातून त्यांचे पुरोगामित्व स्पष्ट होते.
मालतीताईंनी सुरुवातीला मुरुड येथील जनता विद्यालयात काम केले. त्यानंतर त्या बंकटलाल विद्यालय व गोदावरी विद्यालय, तसेच उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयात ही कार्यरत होत्या. उदयगिरी महाविद्यालयाचा सुडे नामक विद्यार्थी ज्याच्या डोळ्यात फूल असल्यामुळे तो अंध विद्यार्थ्यांमध्ये मोडत असे, त्याने पुण्याच्या अंधशाळेत वायरचे विणकाम करण्याची कला आत्मसात केली. तो मालतीताईंना सोफासेटची उसवलेली वायर विणून देतो म्हणून आला. ते काम दिवाळीत काम पूर्ण करून देण्याचे अभिवचन दिले. परंतु ते काम त्याना लवकर करून हवे होते आणि दुसरे म्हणजे लो मजुरी घेणार नाही म्हणून त्यांनी इतर कोणाला ते काम देण्याचे ठरवले. पुढे कामाच्या ओघात त्यांचे हे काम करून घेण्याचे राहून गेले.काही महिने त्या राजर्षी शाहू महाविदयालयात कार्यरत होत्या. महाविदयालयातील शिक्षण घेणारा अंध विद्यार्थी जो नियमित महाविदयालयात येत असे त्याला त्यांनी केनवायर विणकामाबद्दल विचारल आणि त्याने ते पूर्ण करून देण्याचे कबूल केले. आपल्या मित्रा मोबत तो काम पूर्ण करायला येऊ लागला. एकुरगे आणि त्याचा परभणीच्या कृषी विद्यापीठातील अंध मित्र उबाळे यांच्या बोलण्यात डोळस माणसाचा आत्मविश्वास व तडफ होती. भाषेचा ओघ अस्खलित होता. सर्वजण गप्पा ऐकण्यात गुंग होत असत. त्यांनी रोटरीचे सभासद होण्याविषयी विचारणा केली. आणि ते एवढे स्वाभिमानी होते की त्यांना रोटरी फी मध्ये सवलत ही नको होती. कारण सवलत आली की सहाभूतीच्या, उपकाराच्या ओझ्यामुळे स्पष्ट बोलता येत नाही असे त्यांचे म्हणणे होते. त्याच बरोबर या आंतरराष्ट्रीय संस्थे द्वारे अंध बांधवांची आंतरराष्ट्रीय संघटना तयार करण्याविषयी ते बोलत होते. इतकेच नाही तर केलेल्या कामाची मजूरी घेण्यास त्यांनी नकार दिला. बाईंनी त्यांच्या ऋणातून मुक्त होणासाठी अनेक पद्धतीने पैसे देऊ केले परंतू त्यांनी ते घेतले नाहीत. मग त्यांनी या अंध विदयार्थ्याला शिक्षणसाठी मदत करून त्याची परिक्षा सुसहय केली. त्याला लेखनिक मिळवून दिला, जी समस्या त्याच्या बोलण्यातून अगदी सहज समजली होती. एवढ्या बारकाईने त्या सामान्यांच्या समस्यांना समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत.
आंतरभारती हे साने गुरुजींचे स्वप्न. त्या स्वप्नाला आकार देण्याचा प्रयत्न चंद्रकांत शहा करत असत. ५० ते ६० शिक्षकांना दर वर्षी ते गुजरात दर्शन किंवा केरळ दर्शन घडवून आणत. शिक्षकांचा विदयार्थ्यांशी जवळचा संबंध असतो. अशा शिक्षकांना जर गांधीजींच्या विचारसरणीवर चालणाऱ्या शाळा, मूलोदयोगावर आधारित नवे नवे प्रयोग अनुभवता आले तर ते आपल्या विद्यार्थांना सजग करु शकतील. अशा शाळा दाखविल्या तर विद्यार्थांपर्यंत ही दृष्टी पोहचेल या दृष्टिकोणातून ते हे कार्य करत. या कार्यात ही मालतीताई सहभागी होत असत.
त्या विज्ञानाच्या पदवीधर असूनही मराठी विषयाच्या एम. ए. होत्या. प्रा. चंद्रकांत देऊळगावकर हे मराठीचे प्राध्यापक होते. त्यामुळे अनेक व्याख्याने,उपक्रम, कार्यक्रम, साहित्य संमलने यात त्यांचा सहभाग असे. त्या निमित्ताने नामवंत लेखक, कार्यकर्ते, कलाकार घरी येत असत. ते फक्त कार्यक्रमास येत असत असे नाही तर बऱ्याच वेळा वास्तव्याला रहात असत मग चर्चा होत, विचारांचे आदान-प्रदान होत असे. या मध्ये हमिद दलवाई, सुधीर बेडेकर, पुष्पा भावे, वसंत पळशीकर, मे. पु. रेगे, कवी अनिल, प्रभा अत्रे, विंदा करंदीकर, यदुनाथ थत्ते, पन्नालाल सुराणा, कुमार केतकर, अरुण साधू, नंदा खरे, चंद्रकांत शहा, इ. नामवंत व्यक्तिमत्त्व असत.
तसा १९७० ते ८० च्या दशकातला काळ हा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. ७० च्या दशकात नाट्यक्षत्रातील नामवंत व्यक्तिमत्व लातूर मध्ये येऊन गेली… त्यात विजय तेंडूलकर, चि. त्रं. खानोलकर, ह. मो. मराठे हे येथे आल्यानंतर नाटकातल्या नाट्यक्षेत्रातल्या व्यक्तींशी सुसंवाद साधत असत चर्चा घडत असत. इतकेच नाही तर १९६७ साली पहिले मराठवाडा साहित्य संमेलन लातूर मध्ये संपन्न झाले. त्यानिमित्ताने प्रसिद्ध साहित्यिक विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील इ. मान्यवरांचे लातूर मध्ये आगमन झाले होते. या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मा. शिवराजजी पाटील साहेब होते तर सचिव प्रा. चंद्रकांतजी देऊळगावकर होते या काळात विजय दबडगावकर, रामानुज रांदड यांच्या सारखे अनेक साहित्य प्रेमी सक्रिय सहभागी झाले होते. ते पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत होते.
मालतीताई गेली २५ ते ३० वर्षे स्री जागृती, स्रीवादी चळवळीत सक्रिय सहभागी होत्या. त्यांनी नारी प्रबोधन मंच च्या माध्यमातून ही बालकांच्या व महिलांच्या विकासासाठी काम केले. त्या संस्थेच्या संस्थापक सदस्य होत्या. त्यांनी स्व. सिंधूताई परांजपे, स्व. वसुधा पाटील, स्व.लीलाबाई गांधी, स्व. भागीबाई कामदार, चंद्रकला, भार्गव, सुमतीताई जगताप, हेमलता शहरकर, सुलोचना नोगजा, हेमलता वैदय या संस्थापक सदस्यां सोबत कार्य केले. तसेच नवीन पिढीला त्यांच्या सोबत कार्य करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सुनंदा मग्गीरवार, नयन राजमाने, अनुराधा देऊळगावकर, रश्मी जगताप, कुसुमताई मोरे इ.सदस्यांना त्यांच्या सोबत फिल्डवर जाऊन काम करण्याची संधी मिळाली.
अशा सातत्याने विद्यार्थी, समाज घडविण्यासाठी कार्यरत असणा-या मालतीताईंना कोटी-कोटी प्रणाम !
प्रा. नयन भादुले -राजमाने
- ‘ॐ’ निवास, पंचवटी नगर, बार्शी रोड, लातूर
-413512