वाढदिवस विशेष
उघड्या डोळ्यांनी समाजात वावरलो तर आपल्या आसपास घडणाऱ्या विविध घटनांचा अर्थ आपण लावू शकतो.पण अशा घटनांकडे नुसते पाहून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा गोरगरीब आणि गरजवंतांना शक्य ती मदत करणे गरजेचे असते.ही मदत करण्यासाठी हवं असतं ते अडीअडचणी, दुःख व संकटांना पाहून हेलावणारं हृदय.आमचे मित्र, पत्रकार तथा समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले निजामभाई शेख हे असंच एक व्यक्तिमत्त्व.सामान्य नागरिकांच्या अडचणींना धावून जाणारे,पदरमोड करून मदत करणारे निजामभाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
मदतीची भावना मनातून असेल तर त्याला कसलीही अडचण येत नाही.वेळ,पैसा या बाबी दुय्यम ठरतात.नाव किंवा प्रसिद्धीसाठी मदत करणारे अनेक सापडतात पण प्रसिद्धीची कुठलीही अपेक्षा न ठेवता संबंधित माणसाचं काम झालं पाहिजे यासाठी निजामभाईंचा आग्रह असतो.
तसं पाहिलं तर पदरमोड करून लोकांना मदत करण्यासारखी परिस्थितीही नाही.दिड-दोन एकर शेत, वडील ग्रामपंचायतीच्या नोकरीत,व्यवसाय म्हणाल तर पत्रकारिता.त्यात काय आणि किती मिळणार ? हे सर्वांनाच ठाऊक.असं असतानाही कोणाचा रुग्ण दवाखान्यात ॲडमिट असेल तर संबंधित डॉक्टरांना दूरध्वनी करून,प्रत्यक्ष भेटून योग्य उपचार करण्याची विनंती निजामभाई करतात. दवाखान्याचे बिल कमी करावे यासाठी स्वतः डॉक्टरांकडे जातात. एखाद्याला पुण्या-मुंबईला जायचे असेल आणि रेल्वेचे आरक्षण मिळत नसेल तर स्वतःचे पत्र देऊन आरक्षण मिळवून देण्याचं काम निजामभाई करतात. त्यासाठी दर्जी बोरगावहून लातूरचा प्रवास,फॅक्ससाठी लागणारे पाच-पन्नास रुपये स्वतःच्या खिशातून घालतात. अशा हजारो प्रवाशांचा प्रवास त्यांनी सुखकर केलाय.
गावाच्या विकासाची तळमळ सहाजिकच.गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ते आग्रही राहिले.
पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ते करत राहतात.निराधार योजना,श्रावणबाळ आदी योजनाच्या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासकीय कार्यालयात त्यांचा नेहमीच वावर असतो.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे रेल्वे बोर्डावर काम करण्याची संधी निजामभाई यांना मिळाली.या संधीचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं. रेल्वेमध्ये दिसणारे इको फ्रेंडली टॉयलेट ही निजाम शेख यांचीच देण.रेल्वे बोर्डावर निवड झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत त्यांनी हा प्रश्न मांडला होता.त्याचा पाठपुरावाही केला.तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी निर्णय घेतला आणि देशभरासाठी रेल्वेने ही योजना अंगीकारली.रेल्वे बोगी कारखान्याबाबतही निजामभाईंचे योगदान आहेच.लातूर-मुंबई रेल्वेला मुरुड येथे थांबा मिळवून देण्यासाठी निजामभाई यांनी सतत पाठपुरावा केला.हा थांबा अखेर मंजूरही झाला.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांचा कार्यकर्ता ही ओळख निजामभाई आवर्जून सांगतात.मुंडे साहेबांच्या नंतरही त्यांच्या परिवारावर निजामभाईंची तेवढीच श्रद्धा आहे.पंकजाताईंच्या ते सतत संपर्कात असतात.
सांगण्यासारखं खूप काही आहे पण किती आणि कसं सांगावं ? हाच खरा प्रश्न आहे.जात-धर्म याच्या पलीकडे जाऊन निजामभाईंचे काम सुरू असते.जात हा घटक कधीच आडवा येत नाही.मुस्लीम असूनही हिंदू सण-उत्सव साजरे करणारे,एकादशी करणारे आणि ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांचे नियमित पारायण करणारे निजामभाई हे एक वेगळंच रसायन आहे. आमच्या या मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! चिन्मयानंद स्वामींच्या कृपेने त्यांच्या हातून यापुढे अशीच जनसेवा घडत रहावी याच शुभेच्छा!
–नवनाथ भोसले
माजी जिल्हा सरचिटणीस भाजपा, लातूर
संचालक पन्नगेश्वर साखर कारखाना पानगांव ता.रेणापूर
माजी उपसभापती पंचायत समिती, रेणापूर ,जिल्हा लातूर