लातूर ; दि.१२ ( प्रतिनिधी ) —
शेतीच्या वर्तमान अस्वस्थेसह समग्र व्यवस्थेची चिकित्सा करणारं आपल्या सगळ्यांच्या अभावाचं गाठोडं म्हणजे शेषराव मोहिते यांचे ‘अधले मधले दिवस’ हे ललित लेखन होय. दोन अडीच दशकात बदललेल्या ग्रामीण महाराष्ट्राची कुस डॉ.शेषराव मोहिते नेमकेपणाने उलगडतात. ते शिक्षण, शेती व शेती प्रश्नांकडे भाबडेपणाने न पाहता त्याची अचूक कारणमीमांसा मांडतात, असे मत प्रसिद्ध साहित्यिक, अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार आसाराम लोमटे यांनी मांडले.

ते मराठवाडा साहित्य परिषदेने राजर्षी महाविद्यालय, लातूर येथे आयोजित ज्येष्ठ कादंबरीकार शेषराव मोहिते लिखित ‘अधले मधले दिवस’ या ललितलेख पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख भाष्यकार म्हणून बोलत होते. या प्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून सन्मानीय डॉ. जनार्दन वाघमारे, प्रमुख पाहुणे डॉ. अनिरुद्ध जाधव, डॉ. शेषराव मोहिते, मसापध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव, सचिव, डॉ. दुष्यंत कटारे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना लोमटे म्हणाले, “‘अधले मधले दिवस’ मधून मोहिते अवतीभवतीचा संघर्ष मांडून थांबत नाहीत तर उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने तरूणाईच्या समोर सकारात्मक पध्दतीची उगवती पहाटं मांडू पाहतात. खेड्यातील माणसांना, मातृभाषेला सन्मान देवू पाहतात. मोहिते यांचे जीवनासंबधीचे चिंतन मुलगामी असल्याने या लेखनीत कुठेही एकसुरीपणा जाणवत नाही ” ते ग्रामीण नव्हे तर भारतीय संस्कृतीच्या अस्वस्थेचे चित्रण ते ललित लेखनातून करतात.ग्रामीण समाजाची अभावग्रस्तता मांडून ते या अभावग्रस्तेची कारणमीमांसा करतात.ग्रामीण समाजाचे उद्ध्वस्त पण ते परखडपणे मांडतात.

.
अनिरुद्ध जाधव यांनी आपल्या भाषणात शेषराव मोहिते यांच्या शेतीविषयक आस्थेतून आलेल्या लेखनीचे विशेष कौतुक केले. शिक्षणतज्ज्ञ म्हणून समाजात मी सुपरिचित असलोतरी शेतीमातीचा गोतावळा माझ्या आवडीचा प्रांत असल्याने हे पुस्तकं विशेषत्वाने भावल्याचे प्रांजळपणे कबुल करतात. या प्रसंगी डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी ‘अधले मधले दिवस’ ललित लेखाचे मूलगामित्व नेमकेपणानं अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. जनार्दन वाघमारे यांनी “काही पुस्तकं चवीसाठी असतात. काही पुस्तकं चघळण्यासाठी असतात तर काही पुस्तकं पचवण्यासाठी असतात. डॉ. शेषराव मोहिते यांचे ललितलेखन पचवण्याच्या सदरात मोडते. मोहिते यांचे बहुतांश लेख शेतीविषयक चिंतन मांडणारे आहेत. या लेखात शेतकऱ्यांच्या जीवनातील ताण-तणाव, संघर्ष मोठ्या प्रमाणात येतो. शेतकरी जीवनावरचे साहित्य हेच खरे भारतीय साहित्य म्हणून ओळखले जाते. मोहिते यांचे सूक्ष्मलक्षी चिंतन,चळवळीचा अनुभव पाहता त्यांनी ललित लेखनावर समाधानी न राहता वैचारिक लेखन करावं असं मतही त्यांनी व्यक्त केले.

या प्रकाशन सोहळ्याचे औचित्यपूर्ण प्रास्ताविक करताना या लेखाचा सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध मसापध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव स्पष्ट केला. सूत्रसंचालन कवी प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे तर आभार प्रदर्शन मसापचे सचिव डॉ. दुष्यंत कटारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर मसाप कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी प्राचार्य डॉ नागोराव कुंभार,अॅड.मनोहरराव गोमारे,रामराजे आत्राम, सुनीताबाई अरळीकर, दिलीप अरळीकर, डॉ.राजशेखर सोलापुरे, डॉ.सतीश यादव, डॉ.रणजीत जाधव,प्रा.नयन राजमाने, डॉ.सुधीर गरड,रमेश चिल्ले, योगीराज माने, नरसिंग इंगळे, रामदास कांबळे,अर्जुन जाधव,प्रा.डी.के.देशमुख,प्रा.झरीटाकळीकर, डॉ.किशनराव भोसले,उषा भोसले, विमल मुदाळे,शैलजा कारंडे, प्रा.संदिपान मोरे तहसीन सय्यद बहुसंख्येने जाणते श्रोते व विद्यार्थी उपस्थित होते.
