आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध गजलकार सदानंद डबीर यांच्या ‘सांज’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन आज संध्याकाळी ग्रंथालीच्या बॅंन्ट स्टॅन्ड येथील ग्रंथाली प्रतिभांगणात मोठ्या दिमाखाने संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झाले.
त्यानिमित्ताने डबिरांच्या गजलांच्या विविध गायकांनी केलेल्या गायनाचा कार्यक्रमही झाला.
पार्ल्यावरून मी, लेखिका दीपा मंडलिक आणि चारुलता व दिगंबर काळे दाम्पत्य गेलो होतो. कार्यक्रम खूप रंगला.
ग्रंथाली प्रतिभांगण ही नवीन जागा बँडस्टॅन्ड जवळ सुप्रसिद्ध मन्नत या बंगल्याजवळ आहे. साधारण 90 लोक बसू शकतील अशा जागेत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रम फक्त निमंत्रितांकरता होता.

कार्यक्रमाचे सुरेख निवेदन समीरा गुजर हिने केले. सदानंद डबीर हे पूर्वी रेल्वेत काम करत असत त्यामुळे तिन्ही एक कोटी अशी केली की ”सदानंद डबीर यांची गझल पटरीवरनं खाली उतरलेली नाही”. समीराची निवेदनशैली नेहमी खुसखुशीत आणि प्रभावशाली असते. तिचा वावरही प्रसन्न असतो. कार्यक्रमात तिचीही भेट झाली तेव्हाच तिने मला शुभ वर्तमान दिले की ती आता माझ्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहायला आलेली आहे. माझ्या घरी येण्याचे निमंत्रण मी तिला लागलीच दिले.
गझलकार सदानंद डबीर हे आमच्या पार्ले येथील ”पार्ले कट्ट्याचे” सभासद आहेत त्यामुळे त्यांची नियमित भेट होते. इतकेच काय मी कोलडोंगरीच्या बाजारात काही खरेदी करता जातो तिथेही ते अवचित रस्त्यात भेटतात. मग आम्ही रस्त्यात गप्पा मारत उभे राहतो. अत्यंत गुणी परंतु अतिशय साधे असे ते आहेत. त्यांची गझलची इतकी पुस्तकं झाली असतील याची मला कल्पनाही नव्हती. तसेच त्यांच्या कवितांना आणि गजलांना अनेक जणांनी चाली लावलेल्या आहेत हे देखील मला माहित नव्हते.

एक संध्याकाळ अतिशय सुंदर अशा सांस्कृतिक वातावरणात गेल्याचा आनंद आम्हाला लाभला.
ग्रंथालीतर्फे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी, धनश्री धारप, महेश खरे आदींनी पाहुण्यांची नीट उठबस केली.
धन्यवाद.
- राजेंद्र मंत्री,
- 7 ऑक्टोबर 2022