पोळा : एक आठवण !
सन्मित्रहो … नमस्कार .
आज पोळा … शेतकऱ्यांच्या दैवतांचा सण ..माझ्या कायम स्मरणात असलेला – एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणूनही आणि कुटुंबाच्या उपजीविकेला मदत म्हणून लहानपणी बैल चारायला रानात घेऊन जायचे आनंददायी काम करायचो म्हणूनही !
शहरात आलो , शिकलो , मुंबई शहरात नोकरी केली , गज़लनं जग दाखवलं पण मी कधी ‘ शहरी ‘ झालो नाही , गाववालाच राहिलो – माझ्या आष्टगावच्या मातीशी जोडलेलाच राहिलो .
म्हणूनच माझ्या बाबतीत –
अपने खेतों से बिछडनेकी सजा पाता हूँ ,
अब मै राशन की कतारों में नज़र आता हूँ
असं कधी झालं नाही …
असो !
पोळा आला की , मातीचे बैल बनवणं हा लहानपणीचा आवडता छंद ..
मागच्या वर्षी लॉकडाऊनमुळे अक्षरशः नऊ महिने आणि नऊ दिवस सहकुटुंब गावी रहायला मिळालं .
एवढा प्रदीर्घ मुक्काम बालपणानंतर पहिल्यांदाच घडला .
अशातच पोळा आला …
बैल बनवायची फर्माईश झाली .
लहानपणीचा हुनर कामी आला ..आणि कशीबशी पुरी केली फर्माईश …
त्या वेळेसचं गाणं सुद्धा आठवलं ,
आम्ही सर्वांनी मिळून म्हटलं ..
पहा सजविले कसे देव हे पराधान्या-राजा
करावयाची आज तयांची सगळ्यांनी पूजा …
हे मातीचे बैल नंतर शेतात नेऊन ठेवतात .
पाऊस पडला की माती मातीत मिसळून जाते …
आज पोळा ..आठवण जागली ,
ती शेअर करतोय तुमच्यासोबत …
गझलकार
भीमराव पांचाळे