काही व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व हे राजकारण व पक्ष विरहीत असते. त्यामुळे अशा व्यक्तींना सर्वमान्यता असते. निवडणुकीपुरते राजकारण व त्यानंतर समाजकारण हे अशा व्यक्तींचे वागणे असते. विरोधकांना माहीत असते की ह्यांचे आपल्याला मत मिळत नाही. तरीही विरोधक अशा व्यक्तींचे मित्र असतात. अशा व्यक्ती कोणावरही नाराज होत नाहीत. माफ करणे सोडून देणे ,वाईट बाबी विसरणे हे ह्या व्यक्तींचे गुणधर्म असतात.
राजकीय विरोधकही अशा व्यक्तींचे कट्टर मित्र असतात. प्रत्येक गावामध्ये असे एक दोन व्यक्ती असतातच.
प्रत्येक व्यक्तीमध्ये उर्जास्रोत असतो. उर्जा ह्या दोन प्रकारच्या असतात. सकारात्मक उर्जा (+Ve Energy), आणि नकारात्मक उर्जा (-Ve Energy). सकारात्म उर्जा असलेली व्यक्ती एखाद्या ठिकाणी येताच तेथील वातावरण आनंदी करतात. अशा व्यक्तीच्या उपस्थितीमुळे सर्व वातावरण प्रफुल्लित होते. सर्वांना अशा व्यक्ती हव्याहव्याशा वाटतात.
काही व्यक्ती येताच सर्व वातावरण गंभीर होते. ताणतणाव निर्माण होतो.तेथील उपस्थितीत सर्व दबावाखाली काम करतात. वातावरण गंभीर होते. अशा व्यक्तीपुढचा व्यक्ती कोण आहे याचे तारतम्य न ठेवता
अधिका-याची दबावाची भाषा बोलतात. त्यातून पुढील व्यक्ती तणावात येते. खरेतर तो बोलून घेणारा व्यक्ती त्या बोलणा-या व्यक्तीपेक्षा शिक्षण, वय, चारित्र्य, विचार, अध्यात्मक्षेत्रात वरचढ असूनही तो शांत बसून हे सर्व सहन करत असतो. कारण बोलणारी व्यक्ती त्या संस्थेचा अधिकारी असते किंवा त्याच्या पेक्षा ज्येष्ठ असते.
ज्यांना प्रगती करायची आहे,संस्थेचा विस्तार करायचा आहे अशांनी सर्वमान्यता असलेल्या व्यक्तींना जोडले पाहिजे. संस्थेची वाढ होत असताना अशा व्यक्तींना संस्थेशी जोडल्याने संस्थेबद्दलचे समाजात पोषक वातावरण निर्माण होते.
संस्था म्हटले, की सर्वच कामे नियमातच होतील याची शक्यता नसते.अशा वेळी संस्थेचे विरोधक संस्थेच्या विरोधात कुरघोड्या करतात. जर अशा संस्थेचा संचालक गावातील उच्चशिक्षित, प्रतिष्ठित, संस्कारित, सामाजिक बांधिलकी जपणारा, सर्वमान्य व्यक्ती असेल तर विरोधकही संस्थेच्या विरोधात जात नाहीत. त्यांच्यावर सर्वमान्य व्यक्तीचा प्रभाव असतो व त्या प्रभावामुळे संस्थेवरील संकट टाळता येते.
संस्था म्हणजे काय? संस्था म्हणजे मोठमोठ्या इमारती, जागा व पैसा नाही तर संस्था म्हणजे –
• संस्थेच्या स्थापनेमागचा विचार.
• संस्थेमध्ये काम करणारा कर्मचारी वृंद.
• सगळ्यात महत्त्वाचे संचालक मंडळ.
• संचालक मंडळातील सदस्याचा त्याग
• संचालकांची प्रतिष्ठा,
• संचालकाचा व्यवहार, चारित्र्य, व्यक्तिमत्त्व, त्यांचे शिक्षण, अनुभव, सामाजिक कार्य.
वरील सर्व बाबी म्हणजे संस्था..
एखाद्यावेळेस संचालक मंडळातील सदस्य निवडीत चूक झाली तर समाजातील विविध संघटना, राजकीय लोक त्या संस्थेवर वेगवेगळ्या प्रकारे आघात करतात व संस्थेची प्रतिमा मलीन करतात. यासाठी सार्वजनिक संस्थेवर त्या गावातील सकारात्मक दृष्टिकोन असणारा, सर्वमान्य, सर्व राजकीय पक्षात मित्रत्वाचे संबध असणाऱ्या व्यक्तीची निवड केली तर असे प्रकार होत नाहीत.
प्रत्येक व्यक्ती उपयोगी असतो त्याचा संस्थेसाठी उपयोग करून घेता आला पाहिजे. नाहीतर एखादा थोडा चुकला की फुली मारण्याने संस्थेचे अतोनात नुकसान होते व बदनामीला सामोेरे जावे लागते.
ज्यांना स्वतःमध्ये सकारात्मक (+Ve ) उर्जा निर्माण करायची आहे त्यांनी सकारात्मक राहा. सर्वमान्य होण्याचा प्रयत्न करा. सर्व विचाराच्या लोकांशी मित्रत्वाचे संबंध वाढवा. सकारात्म विचार करा. सगळ्यांना आपले व्यक्तीमत्त्व हवेहवेसे वाटावे असे आचारण करा.
अतुल ठोंबरे
atulthombare@yahoo.com
Mob: 09422071641