संभाजीरावांना साथ द्या, रेल्वेलाईनचे उद्घाटन करायला येतो
-माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे
शिरूर अनंतपाळ-(माध्यम वृत्तसेवा ) : माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्ग झाल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही असा संकल्प केला आहे.या रेल्वे मार्गाला त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे.त्या अनुषंगाने सर्वेक्षाणासाठी आपण टोकन अमाऊंट म्हणून ५० कोटी रुपये दिले आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या.या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाला मी स्वतः येतो, असे अभिवचन माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले.
माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेचा शनिवारी आठवा दिवस होता.ही यात्रा शिरूर अनंतपाळ येथे आली असता माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे बोलत होते.यावेळी आ.सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर बेंबळगे तर प्रमुख उपस्थितांमध्ये माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर,गणेश धुमाळे,किरण उटगे,माजी जिप उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके, सभापती शिवकुमार चिंचनसुरे,नरसिंग बिरादार,चेअरमन दगडू सोळुंके,गुंडेराव जाधव, संजय दोरवे,गोविंद चिलकुरे,शेषराव ममाळे,धोंडीराम सांगवे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,कुमोद लोभे,
शहराध्यक्ष संतोष शेटे उपस्थित होते.
पुढे बोलताना दानवे म्हणाले,देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबविला.गरिबीची जाण असल्यामुळे त्यांनी देशातील ८० कोटी जनतेला स्वस्तात राशन, शेतकऱ्याच्या खात्यावर १२ हजार रुपये,१०० रुपयांमध्ये ११कोटी कुटुंबाला गॅस कनेक्शन दिले.घर,शौचालय,वीज, राशन,आरोग्याच्या उत्तम सुविधा दिल्या. गरिबांसाठी ५ लाख रुपये पर्यंतची वैद्यकीय सुविधा मोफत केली.
अतिवृष्टी,दुष्काळ,रोगराई यामध्ये शेतकऱ्यांना १ रुपयात विम्याचे संरक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना म्हणाले, भारत कृषी प्रधान देश आहे.शेतकऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहून बजेट आखले पाहिजे.जोपर्यंत सरकारची गुंतवणूक शेतीमध्ये येणार नाही तोपर्यंत शेती सुधारणार नाही त्याचप्रमाणे आपल्या संसारातही शासनाचा सहभाग राहिला पाहिजे. २०१४ नंतर पंतप्रधान मोदींनी या सर्व क्षेत्रात शासनाचा सहभाग वाढवल्यामुळे देशात सुधारणा होत आहेत.
काँग्रेसच्या राहुल गांधी यांना शेतीतले काय कळते? असा टोला मारून ते म्हणाले की,संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्या मातीतला माणूस आहे. त्यांना सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या प्रश्नाची जाण आहे.गेल्या ७५ वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील कोणत्या आमदाराने जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अशी ३०० किलोमीटरची पदयात्रा मतदारसंघात काढली होती का?असा सवाल करून ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या.लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो,असे अभिवचनही रावसाहेब दानवे यांनी दिले.
आ.धस यांचे लक्ष्यवेधी भाषण …
माजी मंत्री आ.सुरेश धस यांनी ग्रामीण शैलीत व शेलक्या शब्दात केलेल्या भाषणाने शिरूर अनंतपाळ येथील जनतेचे, महिलांचे लक्ष्य वेधले. माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्यावर बोलताना धस म्हणाले,कोरोना काळात त्यांना खूप करता आले असते परंतु विदेशात जाऊन संधी त्यांनी गमावली.ग्रामीण भागातील ९० टक्के संसार माय माऊल्यांमुळे चालतात.मतदार राजा आहे.आम्ही सालगडी आहोत.संभाजीराव वॉट्सप,फेसबुकवरील कमेंट वाचू नका.त्यांना उत्तर देऊ नका.अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपणाला कोण अडचणीत आणेल हे सांगता येत नाही असा सल्लाही धस यांनी दिला.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातून ३१० कोटींचा महामार्ग …
शिरुर आनंतपाळ तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत.शहरात रस्त्याची कामे झाली आहेत.त्याचबरोबर या तालुक्यातून व शहरातून ३१० कोटीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला असून त्याचे तात्काळ काम चालू करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
लातूरकरांचा घरणीच्या धरणातील पाणी पळवण्याचा डाव आहे. जोपर्यंत संभाजीराव आहे तोपर्यंत या धरणातील एक थेंबही जाऊ देणार नाही, असा दमही शेवटी संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश धुमाळे यांनी तर सूत्रसंचलन किरण कोरे यांनी केले.
वरूणराजाचा आशीर्वाद …
आ.संभाजीराव पाटील यांच्या जनसन्मान पदयात्रेला वरूणराजानेही आशीर्वाद दिला.रविवारी सकाळी शिरुर अनंतपाळ येथून यात्रा रवाना होताना पाऊस सुरू झाला.निटूर येथे पोचेपर्यंत पाऊस सुरुच होता.पाऊस पडत असतानाही आ.संभाजीराव थांबले नाहीत. ते चालतच राहिले.गावोगाव त्यांच्या स्वागतासाठी नागरिकही भर पावसात थांबलेले होते.भर पावसात नागरिकांचा उत्साह कुठेही कमी झाल्याचे दिसले नाही.वरुणाराजाही संभाजीरावांच्या पाठीशी असल्याचे यातून दिसून आले.